इतिहास

‘२८ बुद्ध’ ही संकल्पना पूर्णपणे काल्पनिकच?

‘अठ्ठावीस बुद्ध’ ही संकल्पना बौद्ध साहित्यात जैनांना counter करण्याकरिता निर्माण केली गेली. जैन मतानुसार जैन धर्म अतिप्राचीन असून, वर्धमान महावीरापूर्वी २३ तीर्थंकर या धर्मात होऊन गेले. महावीर हे २४ वे तीर्थंकर. तत्कालीन जैन व बौद्ध पंथाच्या श्रेष्ठ -कनिष्ठत्वाच्या व धर्माच्या प्राचीनत्वाच्या तात्विक लढाईत बौद्ध धर्म हा जैनांहूनही अधिक प्राचीन आहे, अशी बौद्धांची धारणा झाली. त्यातूनच मग जैनांचे २४ तीर्थंकर तर बौद्धांचेही २८ बुद्ध, असा नवीनच मतप्रवाह बौद्धांनीही बुद्धाच्या पश्चात रुढ केला आणि ‘२८ बुद्ध’ ही संकल्पना अस्तित्वात आली.

बुद्धाच्या स्तुपांप्रमाणेच काहींचे स्तुपही बांधले गेले. सम्राट अशोकानेही ‘कोणागमन’ तथा ‘कनकमुनि’ बुद्धाच्या स्तुपाचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्याच्या शिलालेखात आढळतो. त्याचप्रमाणे भरहूत येथील स्तूपावरील शिल्पकलेत ‘विपस्सी बोधि,’ ‘ककुसंध बोधि,’ ‘कोणागमन बोधि,’ ‘कसप बोधि’, व ‘साक्यमुनि बोधो’ – असे तत्कालीन धम्मलिपीतील उल्लेख असलेली काही शिल्पेही आढळून येतात. परंतु, पुरातत्वशास्त्राच्या माझ्या अभ्यासानुसार ,माझ्यामते हे उल्लेख त्या- त्या बुद्धांचे नसून, तथागत बुद्धाच्या पश्चात शे -दिडशे वर्षांच्या कालावधीत होऊन गेलेल्या अर्हंत बौद्ध भिक्खूंचे असावेत, ज्यांनी आपल्या विशुद्ध आचरणाने ‘बोधि’ अर्थात बोध, ज्ञान, सत्य प्राप्त करुन घेतले. परंतु, ‘बोधि’ म्हणजे ‘बुद्ध’ नव्हे…

आजही अनेक बौद्ध भिक्खू आपल्या नावापुढे ‘बोधि’ हे उपपद लावतात. उदा. ‘भन्ते राहुलबोधि’, ‘भन्ते वज्रबोधि’, ‘भन्ते कमलबोधि’, ‘भन्ते आनंद बोधि’ वगैरे. याचा अर्थ ते ‘बुद्ध’ आहेत, असा मात्र मुळीच होत नाही. तथागत बुद्धांच्या अनेक नावांप्रमाणे त्याचे शाक्यमुनि, शाक्यसिंह इ. विशेषनामे प्रसिद्ध आहेत. बुद्धाने पूर्वजन्म, पुनर्जन्म, व अवतार- या संकल्पनाच नाकारल्या. ‘मी पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांच्या मार्गाचे अनुसरण करत आहे’ असे जरी बुद्धाने म्हटल्याचे संदर्भ प्राचीन पाली साहित्यात आढळत असले, तरी ते साहित्य बुद्धाच्या पश्चात अनेक वर्षांनी लिहिले गेले आहे.

बहुतांशी या साहित्याचे लेखक , रचयिता हे बौद्ध भिक्खूसंघातील पूर्वाश्रमीचे ब्राह्मणच आहेत. उदा. भन्ते अश्वघोष, आचार्य नागार्जुन वगैरे भिक्खू हे मूळचे ब्राह्मणच होते. भन्ते अश्वघोषाने जे ‘बुद्धचरित्र’ लिहिले, ते बुद्धानंतर सुमारे पाच शतकांनी. त्यात त्याने बुद्धाचे वर्णन सामान्य मनुष्याप्रमाणे न करता, अलौकिक पातळीवर, म्हणजेच असामान्य असेच केले आहे. पूर्वाश्रमीच्या अशाच काही बौद्ध भिक्खूंनी बुद्धाच्या पश्चात बऱ्याच वर्षांनी आपल्या मूळ ब्राह्मणी परंपरेनुसार बुद्धाचेही पूर्वजन्मातील अवतार कल्पून जशा जातककथा निर्मिल्या, तसेच बुद्धाच्या पूर्वी २७ बुद्ध होऊन गेले, आणि ‘शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्ध’ हा त्या परंपरेतील ‘२८ वा बुद्ध’ असल्याचा प्रचार रुढ केला.

तथागतांवरील असीम श्रद्धा व पूज्यभावापोटी तत्कालीन बुद्धानुयांनीही या संकल्पनांचा स्विकार मोठ्या भक्तिभावाने केला. परंतु, बुद्धाच्या व महावीराच्या हयातीतच या दोन्हीही महापुरुषांपैकी श्रेष्ठ कोण, व कोणाचे धर्मतत्वज्ञान अधिक प्राचीन आहे, यावरून त्यांच्या अनुयायांमध्ये वाद उफाळून येत असल्याचे संदर्भ अनेकदा आढळून येतात. त्यातूनच मग जैनांमध्ये ‘२४ तीर्थंकर’ , व बौद्धांमध्ये ‘२८बुद्ध’ ही संकल्पना अस्तित्वात आली, आणि दोन्ही धर्माच्या अनुयायांमध्ये ती रुढही झाली, रुजली. तथापि, पुरातत्वीय दृष्ट्या ना जैनांचे महावीरापूर्वीच्या २३ तीर्थंकराचे कुठले पुरावे मिळाले, ना बुद्धापूर्वी होऊन गेलेल्या २७ बुद्धांचे कसले अस्तित्व सिद्ध झाले. २४ तीर्थंकरांप्रमाणेच ‘२८ बुद्ध’ देखील पूर्णपणे काल्पनिकच आहेत, हे मात्र ‘पुरातत्वीय सत्य’ आहे….. ”

-अशोक नगरे
(पुरातत्वीय अभ्यासक, मोडी लिपी तज्ज्ञ, बौद्ध इतिहास अभ्यासक)