जगभरातील बुद्ध धम्म

नूतनीकरणासाठी धरणाचे पाणी कमी केले आणि ६०० वर्षे जुनी ‘बुद्धमूर्ती’ जगासमोर आली

चीनमध्ये शतकानुशतके कन्फ्यूशियानिझम आणि टाओइझम बरोबरच बौद्ध धर्म चिनी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. सोशल मीडिया तसेच गूगलवर आपण एक बुद्धमूर्ती पाहिलं असेल जी पाण्यामध्ये एका खडकामध्ये कोरलेल्या बुद्धमूर्तीच्या डोके आपल्याला दिसते. नेमकं या फोटो मध्ये दिसणाऱ्या बुद्ध मूर्तीचा इतिहास आपण जाणून घेऊ…

पूर्व चीनच्या जियांग्झी प्रांतातील हाँगमेन जलाशयाच्या धरणाच्या गेटचे नूतनीकरण करण्यासाठी जलाशयातील पाणी पातळी कमी करण्यात आली होती. ६०० वर्षांपूर्वीचा धक्कादायक इतिहास जगासमोर आला. भगवान बुद्धांची खडकात कोरलेली मूर्ती समोर आली. ही कोरीव मूर्ती सुमारे 12.5 फूट (3.8 मीटर) उंच आहे. कोरीव मूर्तीच्या प्राथमिक अभ्यासानुसार ही मूर्ती ६०० वर्षांपूर्वी कोरलेली असून मिंग राजवंशाच्या सुरुवातीच्या काळात तयार केले गेले असावे असे जिआंग्सी प्रांताच्या रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पुरातत्व संस्थेचे संचालक जू चँगकिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बुद्धमूर्ती कोरण्यामागचा इतिहास स्थानिक लोक सांगतात की, दोन नद्या एकत्रित होत असलेल्या ठिकाणी जलप्रवाहाला शांत करण्यासाठी अध्यात्मिक संरक्षक म्हणून बुद्ध पुतळा प्राचीन लोकांनी तयार केला होता. १९५२ साली येथील ग्रामस्थ हुआंग केपिंग यांनी ही बुद्धमूर्ती पाहिली होती. २०१७ मध्ये ती पुन्हा पाण्याबाहेर आल्यामुळे जुन्या आठवणी समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाँगमेनचे धरण १९६० मध्ये बांधण्यात आले असून त्यावेळी ही बुद्धमूर्ती पाण्याखाली गेली होती. कारण त्यावेळी स्थानिक लोकांना व अधिकाऱ्यांना देशातील सांस्कृतिक वारसा संरक्षणाविषयी माहिती नव्हती.

तसेच ज्या ठिकाणी खडकावर कोरलेली मूर्ती समोर आली आहे त्या ठिकाणी पूर्वी बौद्ध विहार होते. पाण्याखाली त्याचे अवशेष ही आढळले आहेत. पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार हे जलाशय प्राचीन जिआंग्सी टाउनशिपच्या अवशेषांवर तयार केलेले आहे. जिआंग्सी आणि फुझियान प्रांत पूर्वी व्यापार केंद्रासह जलवाहतुकीचे महत्त्वपूर्ण केंद्र होते. पुरातत्व विभाग आता पाण्याखाली असलेले प्राचीन शहर आणि बुद्धमूर्तींचा शोध घेऊन जतन करणार असल्याचे म्हटले आहे.

जर ही खडकावर कोरलेली बुद्धमूर्ती पाण्यात नसती तर या मूर्तीला हवामान, ऑक्सिडेशन किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागला असता. तसेच चीन मधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात 1960 च्या दशकात अनेक सांस्कृतिक अवशेष नष्ट करण्यात आले होते. ही मूर्ती पाण्यात असल्यामुळे आजही टिकून आहे.

6 Replies to “नूतनीकरणासाठी धरणाचे पाणी कमी केले आणि ६०० वर्षे जुनी ‘बुद्धमूर्ती’ जगासमोर आली

Comments are closed.