बातम्या

राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती सापडली

विजयवाडा: आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वयुयुरू तालुक्यातील मेदुरू गावात राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना गुरुवारी ‘ध्यानमुद्रेतली’ भगवान बुद्धांची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती सापडली आहे. याबाबत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी यांनी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या ‘पुरातन वारसा जतन’ चा भाग म्हणून या मूर्तीची पाहणी केली आहे.

यावेळी पुरातत्वशास्त्रज्ञ रेड्डी म्हणाले की, गावाच्या मध्यभागी राम मंदिराच्या निर्मिती दरम्यान ही मूर्ती जमिनीखाली सापडली आहे. मूर्तीच्या उजव्या पायावर आणि उजव्या हातावर धम्मचक्र असून “ध्यानमुद्रा” मध्ये बसलेली भगवान बुद्धांची मूर्ती आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांचे मते ही बुद्ध मूर्ती ‘अमिताभ बुद्ध’ सारखी असून अंदाजे इसवी सन १२ व्या ते १३ व्या शतकातील आहे. तसेच याच काळातल्या ‘अमिताभ बुद्ध’ मूर्ती गुंटूर, अमरावती, प्रकाशम, मोटोपल्ली, नेल्लोर मधील कंथेरु आणि कोल्लापट्टू परिसरात सापडल्या आहेत.”

सीसीव्हीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी या बुद्ध मूर्तीबद्दल माहिती देताना म्हणाले की, या मूर्तीच्या छातीच्या वरचा काही भाग तुटलेला असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंटद्वारे ते डागडुजी केले. तसेच ग्रामस्थांनी मूर्तीचे सरंक्षण व्हावे म्हणून ही बुद्ध मूर्ती राम मंदिरात ठेवली आहे.

2 Replies to “राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती सापडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *