बुद्ध तत्वज्ञान

प्राचीन जातक कथेतून दिसणारे बिझनेस मॅनेजमेंट

अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला जातक कथेतून झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. व्यवस्थापन म्हणजे नियोजन, एकत्रीकरण, निरीक्षण, सर्व घटकांचे मार्गदर्शन व मदतीचा स्त्रोत या सगळ्याचा परिपाक आहे.

उद्योगधंद्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रमुखाकडे असावी लागते आणि ती साधनेच्या अविरत अभ्यासाने प्राप्त होते हेच मोठे इंगित आहे. The Buddha himself used Jataka stories to emphasis the importance of certain moral values. The stories have also been used in corporate management.

बुद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीतील सार पाहून त्याचा वापर व्यवसाय व्यवस्थापनात ( Business Management ) कसा करावा याचे अनेक धडे जातक कथेत आढळून येतात. अनेकांनी बौद्ध तत्वज्ञान आणि व्यवस्थापन यावर संशोधन केले आहे. आणि त्यातूनच कामगारांचे, आर्थिक बाबींचे, खरेदी-विक्रीचे आणि उत्पादनाचे व्यवस्थापनबाबत अलीकडे लिहिण्यात येऊ लागले आहे. व्यवस्थापनाबाबत जेंव्हा ही माहिती विविध बुद्ध गाथांमधून, जातक कथांमधून सामोरी येते तेव्हा सामान्यजनांस व्यवसायाचे बाळकडू मिळते.

योग्य गुणवत्तेच्या मालाची किंवा वस्तूची विक्री करताना चांगली वर्तणूक, मधुर आणि चतुर संभाषण आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो. जो सचोटीने या बाबी पाळून व्यवसाय करतो त्याची अध्यात्मिक उन्नती होतेच त्याचबरोबर व्यवसाय वृद्धिही होते. द्रव्यांची, मालाची, सहकार्याची उणीव भासत नाही. मदतीचा ओघ चारी दिशेकडून वहात राहतो. यातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग हा गरीब घटकांसाठी सुद्धा खर्च झाला पाहिजे असे अनेक ठिकाणी जातक कथा सांगतात.

पंचशीलाचे पालन आणि ध्यानसाधना यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होत असल्याचे दाखले आहेत. त्याचबरोबर व्यसनाधीनता, तंटे, अपघात यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येते. काही लोकांना वाटते की धनाचा अपहार करणे, द्रव्य घेऊन पळून जाणे, देणी बुडविणे या गोष्टींमुळे संपत्तीत वाढ होईल. परंतु यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची अधोगती होत असते. तरी व्यवसाय सचोटीने केल्यास तो भरभराटीला येतो. म्हणूनच दोन हजार वर्षांपूर्वीपासून भारतखंडातील सर्व बंदरे व्यापारी गलबतांनी गजबजलेली होती. त्याकाळी भारताचा सर्व प्रमुख देशांशी व्यापार चालत होता. आणि म्हणूनच व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारी मार्गावर बौद्ध लेण्यांच्या निर्मितीसाठी भरघोस दान दिले होते.

‘अपणंक’ आणि ‘वंणूपथ’ जातक कथेत बोधिसत्व व्यापाऱ्यांचा तांडा घेऊन मोठे निर्जल वाळवंट पार करून दुसऱ्या देशात माल कसा विकतो हे सुंदररीत्या सांगितले आहे. ‘नंदीविसाल’ आणि ‘कण्ह’ जातककथेत परिश्रम केल्याशिवाय धन प्राप्त होत नाही याची स्फूर्तिदायक कथा सांगितली आहे. ‘सेरिववाणिज जातक’ कथा दारोदारी फिरणाऱ्या प्रामाणिक विक्रेत्यास सुवर्णपात्र कसे प्राप्त झाले हे सांगते. ‘कंचनक्खदं जातक’ कथेतून प्राप्त झालेल्या धनाचे चार वाटे करून कामासाठी, कुटुंबासाठी, भविष्यासाठी व दानधर्मासाठी कसे खर्च करावेत याची माहिती मिळते.

जातक कथेत उपदेशिलेल्या या बाबींवर आता जगभर संशोधन होत आहे. डॉ. जसबीर चावला यांनी देखील जातक कथेत सांगितलेल्या मॅनेजमेंट बाबत संशोधन करून ग्रंथ लिहिला आहे. नुकतेच त्यांचे लेक्चर खारघर ( नवी मुंबई ) येथे ऐकण्याचा योग आला. शीख धर्मीय असून देखील त्यांचा श्रमण संस्कृतीचा आणि साधनेचा अभ्यास दांडगा असल्याचे दिसून आले. बुद्ध सर्व मानवजातीचे होते आणि आहेत. त्यांच्या अलौकिक तत्वज्ञानाचे सर्वांना आकलन होवो अशी मी या निमित्ताने प्रार्थना करतो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)