इतिहास

युआंग श्वांगची जगप्रसिद्ध स्मारके; बौद्ध संस्कृती आणि भारत-चीनच्या मैत्रीचे प्रतीक

बुद्ध तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या युआंग श्वांग भिक्खूने बुद्धाच्या जगभर जीवनप्रवासाचा मागोवा घेत ‘भारत यात्रा’ या अनमोल ग्रंथाची रचना केली अन् बुद्धाच्या पवित्र पावन स्थळांची सखोल संस्मरणीय माहिती बुद्धधर्मीयांसाठी संकलित केली. त्याची स्मारके नुसती पर्यटन स्थळे नसून भारत-चीन यांच्या प्रगाढ मैत्रीचे प्रतीक आहेत. भारतीय बौद्ध संस्कृती आणि सभ्यतेचा जणू तो आरसा आहे.

तांग वंशाच्या उदयासोबतच चीनी बौद्धधर्मात एका महान व्यक्तिमत्त्वाचा उदय झाला. तो होता प्रसिद्ध यात्री आणि अनुवादक युआंग श्वांग (५९६-६६४) त्याचे ऐहिक गोत्र नाव ‘चेन’ होते आणि तो कोउ शिहचा रहिवासी होता. गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो बौद्ध भिक्खू बनला. भारतातील पवित्र बौद्ध तीर्थाटनाने पुलकित होऊन सम्राट ताई-त्संग राज्यात चेन कुआन कालीनच्या तिसऱ्या वर्षात (६२९ इ.) स्वतः भारतात जावे आणि विशुद्ध स्वरूपातील मूळ संस्कृत धर्मग्रंथांची संहिता वाचावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्यावेळी शिआनच्या राजाने परदेशात जायला बंदी घातली होती.

युआन श्वांगने व्यापाऱ्याचा वेश परिधान केला आणि तो व्यापाऱ्यांच्या जथ्थात सहभागी झाला. हा जथ्था ‘सिल्क रुट’ने पश्चिमेच्या प्रवासाला निघाला होता. मध्य आशियातील दुर्गम पर्वत रांगा, डोंगर – दऱ्या, वाळवंटाची भयानक यात्रा करताना तो कित्येक वेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडला आणि ६३३ इ. रोजी तो भारतात सुखरूप पोहोचला. भारत यात्रा करणारा तो चीनचा दुसरा प्रवासी होता. तत्पूर्वी फाहियान याने भारताची यात्रा केली होती. नालंदा विद्यापीठात त्याने ज्ञानार्जनाला सुरुवात केली. त्यावेळी कन्नोजचा सम्राट हर्षवर्धन याचे राज्य होते. भारतात त्याने दहा वर्षे घालविले. मायदेशी परतताना त्याने स्वतःबरोबर शेकडो बौद्ध ग्रंथ, बुद्धमूर्त्या ५० घोड्यांवर लादून नेले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भाषांतराचे स्पृहणीय कार्य केले. त्याने तब्बल ७५ भारतीय बौद्ध ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद केला.

युआंग श्वांग स्मृती भवन

युआंग श्वांग स्मृती भवन
नालंदा येथे युआंग श्वांगचे भव्य स्मारक उभारण्यासाठी बौद्धाचार्य जगदीश काश्यप यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. १९५५ साली ते चीनला गेले होते. तेथे पंतप्रधान चाऊ-एन-लाई यांना भेटून श्वांग यांच्या अस्थी भारतात पाठविण्याची विनंती केली. एका भव्य समारंभात श्वांग यांच्या पवित्र अस्थी आणि त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या भवनासाठी ५,७४,४१३ रु. चीनी जनतेच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून काश्यपजींना देण्यात आले. भारत सरकारने आर्थिक मदतीचा हातभार लावित नालंदा येथे ‘युआंग श्वांग स्मृती भवन’ उभारण्याची मुहूर्तमेढ रोवली. १९५७ साली दलाई लामा यांनी युआंग श्वांगचा अस्थीकलश भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे सोपविला.

अस्थीकलश काही वर्षे पटना वस्तू संग्रहालयात ठेवला गेला. आता तो सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नवनालंदा महाविहारात स्थानांतरित करण्यात आला. मुख्य भवनात प्रवेश करण्यापूर्वी एक मोठे कलात्मक पात्र नजरेस पडते. भवनाच्या अंतरंगात मोठे सभागृह असून समोरच ध्यानावस्थेत हुआन श्वांगची भव्य प्रतिमा मनाला मोहित करते. बाजूलाच काष्ठाचा चबुतरा असून तो सुगंधित पुष्पाने सजविला आहे. प्रतिमेच्या समोर तथागत बुद्धांच्या पदकमलाने पुनित एक पाषाण शिला ठेवली आहे. असे म्हटले जाते की, ‘युआन श्वांग यांनी य्वीहुआ महालात बुद्ध सुत्तांचे भाषांतर करतेवेळी बुद्धांच्या पदकमलांचे संचालन करीत लेख उत्कीर्ण केला. ‘युआन श्वांगच्या मुख्य प्रतिमेच्या पाठीमागे पांढऱ्या खडकावर मैत्रेय बुद्धाची आकर्षक प्रतिमा आहे. भिंतीवर मोठमोठे पॅनल लावले असून त्यावर युआन श्वांगचे समस्त जीवन चित्रित केले आहे. सभागृहात युआन श्वांगचे विविध कार्य, प्रवासातील अडचणी, सम्राट हर्षवर्धन सोबत भेट, प्रसिद्ध बौद्धाचार्य शीलभद्र आदि प्रमुख तैलचित्र सुद्धा लावले आहेत.

आतमध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला एक विशाल घंटा खुल्या भवनाच्या खाली लावली आहे. ज्यावर बुद्ध उपदेश देवनागरी आणि संस्कृत भाषेत कोरला आहे. स्मृती भवनाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून ते कास्याचे बनले आहे. निळ्या रंगाचे छत डोळ्यांना सुखावणारे आहे. डाव्या बाजूलाच युआन श्वांगच्या सन्मानार्थ चौकोनी संगमरवरी शुभ्र स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याच्या अगदी समोर काळ्या रंगाची भव्य कास्य प्रतिमा उभी आहे. ज्यावर ‘ युआन श्वांग ( ६०३ ई- ६६४ ई ) जगातील विशिष्ट महापुरुषांपैकी एक होते. ज्यांचा महान उद्देश मानवजातीचे कल्याण आणि मानव सभ्यतेच्या उदात्त मूल्यांची व्याख्या करणे होते’ असे शब्द लिहिले आहेत. स्मृती भवन १९८४ साली बनून तयार झाले. २००१ साली या भवनाला नवनालंदा महाविहाराकडे सोपविण्यात आले. भवनाचे विधिवत उद्घाटन फेब्रुवारी २००७ साली झाले.

दी बिग गूझ पॅगोडा

दी बिग गूझ पॅगोडा
चीन देशात युआंग श्वांगचे स्मारक ‘दी बिग गूझ पॅगोडा’ नावाने प्रसिद्ध आहे. युआंग श्वांगच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले. चीनमध्ये इतर स्मारकांपेक्षा या स्मारकाला अधिक मान आणि प्रतिष्ठा आहे. आजच्या शिआनपासून चार किलोमीटर अंतरावर ‘दा शिआन’ विहाराच्या प्रांगणात हे स्मारक आहे. या विहाराचे मूळ नाव ‘बु लौ सुई विहार’ असे होते. इ.स. ६४८ पर्यंत हेच नाव होते. याच्याच मागेपुढे युआंग श्वांग मायदेशी परतला होता. तत्कालीन लि झी राजाने या विहाराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारानंतर विहाराचे’ दा शिआन विहार’ असे नाव ठेवण्यात आले. त्यावेळी तांग राजघराण्याच्या वैभवाचे हे विहार एक प्रतीक बनले होते. पुढे शिआनच्या परिसरात वारंवार युद्धामुळे हे विहार नष्टप्राय स्थितीत आले.

पुन्हा एकदा या विहाराची पुनर्बांधणी झाली. तेच आजचे भव्य दिव्य २०० फूट उंच युआंग श्वांगचे पवित्र स्मारक’ दी बिग गूझ पॅगोडा’ होय. या स्मारकाला भेट दिल्यानंतर असे लक्षात येते की, विटांचे बांधकाम सिमेंटशिवाय केले आहे. कैच्यांचा उपयोग केलेला आहे. विटांच्या दोन थरातील दरजा आणि स्मारकाच्या प्रत्येक कड्याचे त्रिकोणी कोपरे हे स्पष्टपणे दिसतात. त्याचा उंच आणि भव्य आकार आपल्या मनाला जाऊन भिडतो. दर्शनी प्रवेशद्वाराच्या चौकटीवर राजा आणि बुद्ध यांची सुरेख शिल्पे कोरली आहेत. चौकटीच्या वरच्या बाजूला आतमध्ये जमिनीला समांतर असे आ भाले त्या चौकटींना तोलून धरले आहेत . ही अश्वशिल्पे ठसठशीत आहेत. त्यातील सरळ, वक्र आणि गोल आकार सामर्थ्यशील दिसतो.

बाजूला दोन लहान वास्तू आहेत. पूर्वेकडच्या वास्तूत एक घंटा आहे आणि पश्चिमेकडच्या वास्तूत एक नगारा आहे. मिंग राजवटीवेळी त्या घंटेचे ओतीव काम केले गेले. तिचे वजन पंधरा टन आहे. ती घंटा आणि तो नगारा भिक्खूंना वेळ कळावी म्हणून वाजवले जातात. स्मारकाच्या भव्य गर्भगृहात बुद्धाच्या विविधांगी भावमुद्रेतील शिल्पे आहेत. त्यापैकी मधले शिल्प ‘धर्मकाया’ म्हणून ओळखले जाते.

पश्चिमेकडचे ‘बाओशेन बुद्धा’ तर समोरच्या शिल्पाला ‘यिंग शेन बुद्ध’ म्हणतात. तत्त्वप्रवचन सभामंडपात अमिताभ बुद्ध उभा आहे. दालनाच्या पूर्वेकडील भिंतीवर तीन देहाकृती आहेत. त्यापैकी मधली देहाकृती युआंग श्वांग ( भिक्खू त्रिपिटक) यांची आहे. हाच अनेक धर्मग्रंथ घेऊन शानॉनला आला होता. आपल्या यात्रा प्रवासाने जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या युआंग श्वांगची ही नुसती स्मारके, पर्यटन स्थळे नसून भारत – चीन यांच्या प्रगाढ मैत्रीचे प्रतीक आहेत. भारतीय बौद्ध संस्कृती आणि सभ्यतेचा जणू तो आरसा आहे.

मिलिंद मानकर, नागपूर