या पृथ्वीतलावावर बुद्ध शासनाचा कार्यकाल पाच हजार वर्षाचा आहे, असे म्यानमार बुद्धिष्ट मानतात. यातील अडीच हजार वर्षे निघून गेली आहेत. म्हणजे अजून अडीच हजार वर्षे या पृथ्वीवर बुद्धांचे शासन राहणार आहे. आणि ते टिकवून ठेवण्यासाठी म्यानमारमध्ये प्रत्येक बौद्ध भिक्खूचा तसा प्रयत्न असतो. म्यानमारमध्ये १००० च्यावर मॉनेस्ट्री आहेत. त्या बौद्ध शिक्षण प्रसारणाचे काम करतात. पालि भाषेतील त्रिपिटकाचे ही तेथे खूप अध्ययन केले जाते. त्याचबरोबर ध्यान साधनेची शेकडो केंद्रे येथे स्थापित आहेत. म्यानमार मधील हरेकजण अशा मॉनेस्ट्री मधुन शिकत असलेल्या भिख्खूंना खूप महत्त्व देतो.
हे पण वाचा : म्यानमारमधील महामुनी विहार; प्रत्यक्ष बुद्धांच्या चेहऱ्याशी साम्य असलेली मूर्ती
पालि भाषेतील संपूर्ण त्रिपिटक आज बर्मी भाषेत लिपिबद्ध आहे. व भारतापेक्षा जास्त महत्त्व त्यास तेथे आहे. तेथे या भाषेच्या अनेक परीक्षा होतात. त्यातील ‘त्रिपिटक परीक्षा’ ही सर्वात प्रसिद्ध आणि उच्च दर्जाची समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण असते, कारण ह्या त्रिपिटकाच्या अभ्यासक्रमांमध्ये एकूण ७९८३ पानांचे अध्ययन करावे लागते.
या परीक्षेचा उद्देश हाच आहे की पालि त्रिपिटकाचा स्कॉलर यातून तयार व्हावा, ज्यास त्रिपिटकाचे सर्व खंड लक्षात आणि तोंडपाठ राहतील. या अभ्यासक्रमात पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी विनयपिटकाचे २२६० पानांचे अध्ययन करावे लागते. तिसऱ्या वर्षी सुत्तपिटकाचे ७३६ पानांचे अध्ययन करावे लागते. चौथ्या वर्षी अभिधम्मपिटकाचे भाग एक मधील १३९० पानांचे अध्ययन केले जाते व पाचव्या वर्षी अभिधम्मपिटक भाग दोन मधील ३५९७ पानांचे अध्ययन करावे लागते. अशा तर्हेने हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास एकूण पाच वर्षे लागतात. त्यानंतर शेवटी तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा घेतली जाते. या वेळी संपूर्ण त्रिपिटकातील कोणतीही गाथा विचारून विद्यार्थ्यांचे ज्ञान अजमावले जाते.
हे पण वाचा : शुद्ध स्वरुपातील धम्म पहावयाचा असेल तर म्यानमार देशाला आवश्य भेट द्या!
अशा तऱ्हेने या अभ्यासक्रमातून तावून-सुलाखून प्रत्येक वर्षी अनेक पालि विद्वान बाहेर पडतात. आणि त्यामुळे धम्माची शुद्धता कायम राखली जाते. हे गेली कित्येक पिढ्या न पिढ्या, हजारो वर्षांपासून घडत आहे. यास्तव म्यानमार देश हा बौद्ध संस्कृतीचा एक महत्त्वाचा द्वीप झाला आहे. आणि म्हणूनच पाचवी व सहावी धम्मसंगिती भरवून यशस्वी करणे त्यांना अवघड गेले नाही. अशा या धम्म देशात पुनर्जन्म व्हावा असे प्रत्येक जाणकार आणि अभ्यासू व्यक्तीस वाटले तर नवल नव्हे.
– संजय सावंत
खूपच चं पिस्ट आहेत असाच कहि नागपुर आने पूर्ण
इंडिया मधे झाल पाहिजे
Nice