बुद्ध तत्वज्ञान

अवकाशातील विश्वाबद्दल अडीज हजार वर्षांपूर्वीच भगवान बुद्धांनी सांगितले होते

आपली सूर्यमाला एका मोठया ‘मिल्की वे’ आकाशगंगेत आहे. अशा या आकाशगंगेत सुर्यासारखे लक्षावधी तारे आहेत. त्यातल्या हजारो ताऱ्याभोवती आपल्या सारखी ग्रहमाला असू शकेल.आणि अशा अनेक आकाशगंगा एका दीर्घिकेमध्ये आहेत. सध्या एकूण वीस दीर्घिकांचा कळप असल्याचे शास्त्रज्ञानां कळून आले असून अवकाशाचे हे कुरण वाढतच चालले आहे. हबल दुर्बिणीतून असंख्य गोष्टी उजेडात आल्या आहेत.

यातील प्रत्येक दीर्घिके मध्ये कोट्यवधी ग्रहमाला असून नक्कीच तेथे हजारो ग्रहावर वेगळे जग असण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांना ठाम वाटते. फक्त त्या सृष्टीशी संपर्क साधणे हे प्रचंड अंतरामुळे मानवाला शक्य होणार नाही. आता अचंबित करणारी गोष्ट म्हणजे हीच बाब अडीज हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी भिक्खूंना उपदेश करताना सांगितली. सुत्तपिटकामधील अंगुत्तर निकाय या ग्रंथातील पठमकोमल सुत्त पाहूया.

यामध्ये भगवान बुद्ध उपदेश देताना म्हणतात ‘ भिक्खुंनो, जितक्या क्षेत्रात चंद्र, सूर्य फिरत आहेत, भ्रमण करीत आहेत, विश्व त्याच्या सहस्त्रपटीने मोठे आहे. या सहस्त्रपटीने मोठया असलेल्या विश्वात हजारो चंद्र, सूर्य आहेत. हजारो सुमेरू पर्वतराज आहेत. हजारो जांबुद्वीप आहेत. हजारो महासमुद्र आहेत. हजारो चातर्र महाराज (लोक/जग) आहेत. हजारो त्रयोत्रिश (लोक/जग) आहेत. हजारो याम (लोक/जग) आहेत. हजारो तुषित (लोक/जग) आहेत. हजारो निर्माणरति (लोक/जग) आहेत. हजारो परी निर्मित (लोक/जग) आहेत. तसेच हजारो ब्रह्म (लोक/जग) आहेत. तसेच मुख्य ब्रह्म (लोक/जग) आहे. आणि असे असून सुद्धा त्यामध्ये परिवर्तन / बदल होत आहे. काहीच नित्य नाही. सर्व संसार परिवर्तनशील आहे. तरी ज्ञानी श्रावकाने हे जाणून वैराग्य प्राप्त करावे.

बौद्ध मताप्रमाणे ३१ विश्व अस्तित्वात आहेत. आताच्या शास्त्रज्ञांनी २० दीर्घिका शोधल्या आहेत. पण अध्याप नवीन जगाचा शोध लागलेला नाही.तंवतिस, यामा, तुषित, निर्माणरती, परिनिमित्तवस्सवत्ती, ब्रम्हपरिषदलोक, ब्रम्हपुरोहिता, महाब्रम्हलोक, परित्तभा, अप्पमाणाभा, आभासरा, परित्तसूभा, अपरिमित शुभ, सुभकिन्हकाण्ह, वेहफल्ल, अवीहा देवा असे सोळा देवलोक आहेत.

मृत्यू समयी जसे कर्म संस्कार असतील त्याप्रमाणे तरंग तयार होऊन तो उच्च जगात जन्म घेतो. जर वाईट कर्म संस्कार असतील तर त्याचे तरंग दुर्गती लोकीं खेचले जातात. ( पहा ७ ऑगस्ट १७ची विपश्यना पत्रिका ) सर्वज्ञानी असणाऱ्या भगवान बुद्ध यांचा उपदेश हा खरोखर इतर संप्रदायापेक्षा वेगळा आहे. त्यांनी मार्ग दाखविला आहे. आता चांगले की वाईट कर्मसंस्कार करायचे ते आपल्याच हातात आहे. कारण त्याच प्रमाणे या पृथ्वीवरील कार्यकाल संपुष्टात आल्यावर पुढील प्रवास होणार आहे.

– संजय सावंत

2 Replies to “अवकाशातील विश्वाबद्दल अडीज हजार वर्षांपूर्वीच भगवान बुद्धांनी सांगितले होते

Comments are closed.