ब्लॉग

वर्णव्यवस्थेनुसार ‘ओबीसी’ जाती कोणत्या वर्णात येतात?

ओबीसी शब्दाचा पहिल्यांदा वापर केव्हा झाला?
१९२८ मध्ये बॉम्बे (आजची मुंबई) सरकारने स्टार्ट कमिटी स्थापन केली होती. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ऑदर बॅकवर्ड क्लास’ म्हणजेच ‘ओ.बी.सी.’ शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. स्टार्ट कमिशनमध्ये बाबासाहेब म्हणाले की ज्या जाती उच्च जाती आणि मागासलेल्या अनुसूचित जातीजमाती यांच्या मध्ये येतात अशा जाती ह्या इतर मागास जाती म्हणजेच ओबीसी आहेत व त्याही हलाखीचेच जीवन जगत आहेत.

मंडल आयोगाप्रमाणे व घटनेतील ३४० व्या कलमातील पात्रतेच्या अटीनुसार देशभरात सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या साडेतीन हजाराच्या आसपास ओबीसी जाती आहेत, त्यात महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशे जाती आहेत. या जाती उच्च जाती नाहीत आणि त्या अनुसूचित जातीजमातीही नाहीत, या जाती मधल्याच आहेत आणि त्या मागासलेल्या आहेत. वर्णव्यवस्थेवर आधारित असलेला समाज आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चार वर्ण, आता प्रश्न असा पडतो की, ओबीसी जाती कोणत्या वर्णात येतात?

वर्णव्यवस्थेसंबंधीचे अज्ञान
भारत हा शेतीप्रधान देश आहे. येथील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती. शेती करणारे व शेती करणारास पूरक काम आणि सहाय्यभूत व्यवसाय करणाऱ्या जातीस बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार म्हणतात. त्यांना ‘अया पगड जाती’ म्हणायची पध्दत आहे. या जाती आज ओबीसी वर्गात येतात. आता या सर्व जाती वर्णव्यवस्थेतील शूद्र वर्णात येतात असे कुणी म्हणाले तर ओबीसी ते मान्य करायला तयार होत नाही. अंगावर अचानक पडलेली पाल झटकल्यासारखे आपण ते वाक्य झटकतो ! ओबीसींना असं वाटतं की आपण कसे काय शूद्र वर्णाचे असू शकतो? ते महार, मांग वगैरे दलित लोक शूद्र वर्णाचे आहेत. आपण तर उच्च आहोत असे मनोमन गृहीत धरून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो आणि जे अनुसूचित जातीजमातीचे दलित लोक शूद्र वर्णात येत नाहीत त्यांना आपण शूद्र समजून मोकळे होतो. हे ओबीसींना असलेले वर्णव्यवस्थेसंबंधीचे अज्ञान होय.

खरेतर अनुसूचित जातीजमातीचे लोक ( म्हणजे दलित व आदिवासी ) पंचम वर्णात येतात. हिंदू चातुर्वर्ण्यव्यवस्थेत शूद्र हा सर्वात तळाचा आणि सर्वात कनिष्ठ वर्ण आहे आणि दलित-आदिवासी हे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या बाहेरच्या वर्णात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हे संशोधनपूर्ण पुस्तक लिहिले होते आणि ते खूप गाजले होते. आजही ह्या पुस्तकाचा अभ्यास केला जातो. परंतु हे पुस्तक आपल्याविषयी आहे याची जाणीव आज एक टक्का ओबीसींनाही नसेल.

स्वत:ला शूद्र म्हणायला ओबीसींना लाज वाटते, पण लाज वाटून उपयोग नाही. कारण त्यामुळे वस्तुस्थिती लपू शकत नाही वा नष्टही होऊ शकत नाही. हिंदू धर्माच्या प्रमुख ग्रंथांमध्ये वर्णव्यवस्थेची चर्चा नाही असे प्रकरण सापडणार नाही. आजही समाजात वर्णव्यवस्था आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वर्णात आहे. फक्त त्याला त्याची जाणीव नाही. किंवा त्याविषयी संभ्रम आहे, इतकेच!

संदर्भ : शूद्र पूर्वी कोण होते – डॉ.बाबासाहेब आंबेडकर