तथागत बुद्धाच्या शिकवणुकीनुसार जीवन पाच स्कंधामुळे बनलेले आहे. यात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या स्कंधाचा समावेश आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (उष्णता) , आणि वायू या चार धातूंपासून रूप बनलेले असून, याच भौतिक रूपांसोबत वेदना, सज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे चार मानसिक घटक जोडले आहेत.
या नाम आणि रूपाच्या एकत्रीकरणातूनच जीवन बनलेले आहे. याच पाचही स्कंधाचे खरे स्वरूप तथागत बुद्धाच्या धम्मात अशा प्रकारे वर्णिलेले आहे: भौतिक रूप फेसाच्या ढिगासारखे असून वेदना बुडबुड्यांप्रमाणे आहेत. संज्ञा मृगजळाप्रमाणे असून संस्कार केळीचा झाडासारखे आहेत आणि विज्ञान तर भ्रामक असे मोहजाल आहे. जीवनाचे असे विश्लेषण लक्षात घेता जीवनाचा उद्देश आणि वास्तविकता निश्चितपणे ठरवणे खरोखरच अवघड बाब आहे.
जीवनाबद्दलच्या या विश्लेषणाने एकेकाळी बर्याच धर्मगुरूसमोर किंवा धार्मिक मान्यतेसमोर मोठेच आव्हान उपस्थित केले होते. कारण तथागत बुद्धाच्या मते या जगात अशी कोणतीही अमर वस्तू किंवा जीव (व्यक्ति) नाही, ज्याचे पृथक्करण होत नाही किंवा त्यात सतत परिवर्तन येत नाही.(म्हणजेच सर्वच गोष्टी परिवर्तनशील आहेत) शरीर म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून रासायनिक घटक किंवा तत्त्वांची सतत बदलणारी अमूर्त प्रक्रिया (संयोग) आहे. जीवन सतत वाहणाऱ्या नदीतील एक थेंब आहे आणि जीवनाच्या महाप्रवासाला हातभार लावणारा तो एक भाग मात्र आहे.