जगभरातील बुद्ध धम्म

आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले; झांजीबारचा बुध्दिझम

‘पेडगावचे शहाणे’ हा राजा परांजपे यांचा एक जुना मराठी चित्रपट आहे.( १९५२ ) त्यामध्ये “झांजीबार.. झांजीबार..”असे एक गाणे होते. शाळेत असताना १९७५ मध्ये तो दूरदर्शनवर पाहिला. हिंदी महासागरात बेट असलेल्या या आफ्रिकेतील देशाची गाण्यातून ओळख झाली. दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय विशेष करून गुजराथी व्यापारानिमित्त तेथे स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक सुद्धा तेथे नोकरी-धंद्यासाठी गेले आणि स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक जेथे जातील तेथे एकत्र येऊन बुद्ध विहार उभारतात.

१९१५ मध्ये सुद्धा त्यांनी जागा विकत घेऊन बुद्ध विहार उभारले व तेथे सम्राट अशोक राजाची मुलगी स्थविर संघमित्रा यांनी अनुराधापूर येथे लावलेल्या बोधिवृक्षाची एक फांदी आणून रुजविली. आज त्याचा अवाढव्य वृक्ष झांजीबारला झाला आहे. आज मितीस आफ्रिका खंडामधील टांझानिया, केनया, मालवी, साऊथ आफ्रिका, युगांडा आणि बोटस्वाना येथे बौद्ध विहारे उभी राहिली आहेत. स्थानिक लोकांमधूनच बौद्ध भिक्खुं आणि भिक्खुंणी तयार झालेले आहेत. ते बुद्धिझमचा प्रसार तिथल्या स्थानिक भाषेतून करीत आहेत.

या पाठीमागे बौद्ध भिक्खुंनी घेतलेले परिश्रम आहेत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आता सुद्धा काही प्रमाणात कायम आहे. भूक भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांना तेथे सर्रास मारले जाते. शिवाय युरोपियन देशांना मांस निर्यात होते. गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे चोऱ्या होतात. ड्रगस खुलेआम उपलब्ध असल्याने लहान मुले देखील त्याच्या आहारी जातात. रोगराई, HIV-Aids सारखे रोग तेथील समाजात पसरले आहेत. अशा परिस्थितीत पंचशीलाचे पालन कसे होणार ? उद्या काय खावे याची जेथे भ्रांत असते तो समाज धम्म कसा समजू शकेल ? पण श्रीलंकन भिक्खू पन्नासेखरा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. धम्म हा लोकांच्या भाषेतूनच शिकविला पाहिजे या बुद्धांच्या शिकवणीनुसार स्थानिक भाषेतून धम्माचा प्रसार सुरू केला. इथल्या समाजात घेण्याची प्रवृत्ती आहे, देण्याची नाही. त्यामुळे दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. चायना व कोरिया सोडल्यास कुठल्याही बौद्ध देशाने धम्माच्या प्रसारासाठी इथे मदत केली नाही. त्यामुळे बुध्दिझमचा प्रसार मंदगतीने होत आहे.

झांजीबारचे बौद्ध विहार हे आफ्रिकेचे पाहिले विहार असल्याने ते केंद्रस्थानी राहिले आहे. तेथे नियुक्ती झालेले मुख्य भिक्खुंना झाम्बीया, दक्षिण आफ्रिका, केनिया, बोटस्वाना आणि मालवी येथे धम्मप्रसार व धार्मिक कार्यक्रमासाठी जावे लागते. तेथील विहारात स्थानिक गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, वाचनालय सुरू करण्यात आले आहे, जेणे करून अधिकाधिक मुले विहारात येतील. त्यांना धम्माची गोडी लागेल. अशा या झांजीबारमध्ये १९६४ साली क्रांती झाली आणि टांझानिया देश अस्तित्वात आला. अनेक राज्ये त्यात विलीन झाली.

बुध्दिझमचा आफ्रिकेत प्रसार करताना मुख्यत्वे खालील अडचणी दिसून आल्या. गरिबी, अन्न व सुरक्षितता यांचा अभाव, शिक्षण नसल्याने अंधश्रद्धा, जनमानसात रुजलेली देवाची संकल्पना, इतर धर्मियांकडून मिळत असलेले साहित्य व प्रलोभने, रोगराई, सुसंस्कृतीचा अभाव, मुबलक नशिले पदार्थ, धम्म सेवकांची कमतरता – अशा बाबींमुळे धम्म म्हणावा तितका अद्याप रुजला गेला नाही. आतापर्यंत श्रीलंकेतील बारा भिक्खुंनीं टांझानियात राहून कार्य केले आहे.

सद्यस्थितीत आफ्रिका खंडातील ५४ देशापैकीं ५ देशांत बुद्ध विहारे उभारली गेली आहेत. शिक्षणामुळे २०१० नंतर बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले असून स्वेच्छेने अनेकजण येत आहेत. बुद्ध तत्वज्ञान समजावून घेत आहेत. ध्यानमार्गाचे धडे घेत आहेत. तरी अफ्रिका खंडात धम्म प्रसाराचा अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे. तेथील प्रत्येक देशात एकएक बुद्ध विहार उभारण्याचे टांझानिया बुद्धिष्ट असोसिएशन पुढे मोठे आव्हान आहे.

१)https://www.youtube.com/watch?v=yjC-_qRYbi8 ( दारे-इ-सलाम येथील विहार आणि भिक्खू निवासस्थान उदघाटन )
२)https://www.youtube.com/watch?v=EqOdXiP0wpA ( ‘पेडगावचे शहाणे’ चित्रपटातील झांजीबार गाणे )

– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)