जगभरातील बुद्ध धम्म

या देशात बुद्ध पौर्णिमेला मद्यविक्री बंद केली जाते; मग भगवान बुद्ध तर भारतातील असूनही…?

या वर्षी बुद्ध पोर्णिमा १८ मे रोजी बऱ्याच देशांत साजरी करण्यात आली. यावेळी आशियातील जवळजवळ सर्व बौध्द देशात मद्यपानगृहे व वारूणी विक्री बंद होती. थायलंड देशात सुध्दा बुद्ध पौर्णिमेचा मोठा महोत्सव असल्यामुळे त्यादिवशी सर्व मद्यगृहे बंद होती. तिथल्या पंतप्रधानांनी दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी आदेशच निर्गमित केले आहेत की देशातील भगवान बुद्धांच्या ५ सणांदिवशी संपूर्ण देशात मद्यविक्री बंद राहील. (थाई देशात शासकीय सुट्टी असलेले पाच राष्ट्रीय सण- माघ पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, वर्षावासाचा पहिला दिवस, अश्विन पौर्णिमा-वर्षावासाचा शेवटचा दिवस)

भगवान बुद्ध तर भारतातील. आणि तरीही भारतात सर्व पौर्णिमांना मद्यविक्री बंद नसते. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीं यांच्या जयंतीनिमित्त जशी मद्यविक्री बंद ठेवणे बाबत आदेश न चुकता काढले जातात त्याच प्रमाणे पोर्णिमेचे महत्व जाणून त्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवली पाहिजे. भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशीलेमध्ये पाचवे शील हे मद्यपान न करणे बाबत आहे. आणि गेल्या अडीच हजार वर्षांपासून बौद्ध पंचशिले जगविख्यात आहेत. सम्राट अशोकाने सुद्धा राष्ट्राच्या उन्नतीसाठी शीलसंवर्धनाचे महत्व प्रतिपादन केले आहे. त्याच्या लेखी हुकुमांना ‘श्रावणम’ अशी संज्ञा होती. त्यामुळे बुद्धपौर्णिमेला मद्यपानगृहे बंद केलीत तर नुसते बौद्ध धर्मीय नव्हे तर, देशातील सर्व धर्मियांचा त्यास पूर्ण पाठिंबा राहील.

भारतातील बुद्ध हा जगाला प्रकाशाकडे नेणारा आहे. आपण भारतीयांनी बुद्ध तत्वांचे पालन योग्यरीत्या केले तर इतर देश वडीलबंधूच्या पावलावर पाय ठेऊन पाठीमागे येतील. तरी सरकारने सर्व पौर्णिमां दिवशी मद्यपानगृहे व मद्यविक्री बंद ठेवावी. सम्राट अशोकराजाची शील-सदाचार लोंकामध्ये रुजावा यासाठी तळमळ होती. म्हणूनच वारूणी ही वाईटच हे सांगायला लाज नसावी. आणि यासाठी निदान पौर्णिमे दिवशीतरी त्यावर बंदी असावी यातच देशाचे व येथील जनतेचे भले आहे.

– संजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *