इतिहास

अमरावती स्तूप भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना

सातवाहनांनी भारतीय संस्कृतीला फार मोठे योगदान दिले आहे. तसेच राजकीय क्षेत्रात वर्षे राज्य करून त्यांनी स्थिर शासनाचा आदर्श निर्माण केला. अनेक इतिहासकार सातवाहन वैदिक धर्माचे अनुयायी असल्याचे म्हणतात. मात्र सातवाहन हे बौद्ध अनुयायी होते याचे ऐतिहासिक पुरावेच नाहीतर त्यांच्या काळात कान्हेरी, कार्ले, भाजे, बेडसा, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा आदी शेकडो लेणी निर्माण केली. सातवाहनकालीन कलेचा महाराष्ट्रात प्रसार होऊन लोकाभिरुची संपन्न झाली. त्यामुळे कलेच्या क्षेत्रात सातवाहन राजवटीची बरोबरी क्वचित केली जाऊ शकते. त्यांच्या कलोत्तेजक भूमिकेतूनच अमरावती कला केंद्राचा व शैलीचा जन्म झाला.

अमरावती (आंध्रप्रदेश राजधानी) केंद्र भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास ते महाराष्ट्र केलेचे विस्तारित केंद्र असल्याचे स्पष्ट होते. अमरावती हे मधुरा व गांधार केंद्राप्रमाणेच भारतीय कलाशैलीचे तिसरे महत्वाचे केंद्र होते. अमरावती कला केंद्राचा विकास उत्तर सातवाहनकाळात झाला असला तरी ते संकल्पनांचे स्थलांतर होते. कारण यापूर्वीच्या कालखंडात शेकडो लेणी, स्तूप व हजारो शिल्पांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनासाठी व उदार आश्रयातून झाली होती.

भव्य स्तूपाचे एक मॉडेल

अमरावती स्तूप

सध्या आंध्र प्रदेशातील राजधानी असलेले अमरावती शहर हे मथुरा आणि तक्षशिला या शहरांप्रमाणे प्राचीन भारतीय कलेचे तिसरे महत्वाचे केंद्र समजले जाते. अमरावतीच्या स्तूपाचा पहिल्याने जेव्हा शोध लागला तेव्हा तो उद्ध्वस्त अवस्थेत होता. येथील सुंदर शिल्पे स्थानिक लोकांनी घरे बांधण्यासाठी सर्रासपणे वापरली होती. उरलेल्या ढिगाऱ्यांतून दडून बसलेले काही सुंदर अवशेष संशोधकांच्या हाती लागले. ते कलेचे उत्कृष्ट नमुने ठरले.

हे पण वाचा : हा बौद्ध स्तूप आज अस्तित्वात असता तर केवळ ताजमहाल या वास्तूशी तुलना करणे शक्य

अर्थात काळाच्या कराल दाढेत त्यांची मोडतोड झाली. तरीही तत्कालीन देदीप्यमान कला-इतिहासाचे ते साक्षीदार आहेत. मद्रास येथील ब्रिटिश संग्रहालयात ती पाहावयास मिळतात. ज्या वेळी हा स्तूप बांधला गेला त्या वेळी तो भारतीय वास्तुकलेचा (शिल्पकलेचा) अप्रतिम नमुना असला पाहिजे. उपलब्ध अवशेषांवरून या स्तूपाच्या भव्यतेची व सौंदर्याची कल्पना करता येते.

स्तूपांचे अवशेष

या स्तूपाचा व्यास १६२ फूट, बाजूच्या कठड्यावरील कोरीव शिल्पाचे क्षेत्र सुमारे १७०० चौरस फूट असावे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या स्तूपांचे बांधकाम संगमरवरी दगडात केलेले होते. मध्यवर्ती स्तूपाच्या दोन्ही स्तंभांवर अलंकृत कोरीव काम केलेले आहे व स्तंभाच्या वरील बाजूस धर्मचक्रे लावली आहेत. त्यावरील आडव्या पट्टीत बुद्धाच्या जीवनावरील जातककथेतील प्रसंग शिल्पांकित केले आहेत.

अमरावती येथील स्तूपावरील बुद्धाचे शिल्पांकन

त्या प्रसंगांच्या शिल्पांकनात बुद्धाचे अस्तित्व प्रतीकांद्वारे सूचित न करता त्याला सगुणरूपात साकार केले आहे. पण त्याचबरोबर काही उठावदार कोरीव शिल्पांत इतरत्र आढळणारे मोकळे सिंहासन, कमळे, पादुका, बोधिवृक्ष ही प्रतीके बुद्ध अस्तित्व सूचित करतात. हा स्तूप भारहुत, सांची, यांच्या परंपरेतील असला तरी बऱ्याच बाबतीत तो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. भारहुत, सांचीप्रमाणे येथे नक्षीकामात विविधता असली तरी कलात्मकतेच्या दृष्टीने ते श्रेष्ठ आहे.