आंबेडकर Live

आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी आपले सारे आयुष्य ग्रंथांच्या सहवासातच घालविले, ग्रंथांचे वाचन करत असताना त्यांना तहान, भूक, झोप यांची पर्वा नसायची. पुस्तकांसाठी त्यांनी अगणित पैसा खर्च केला होता. कधी कधी उपाशीपोटी राहून काटकसरीने पैसे वाचवून ते पैसे त्यांनी पुस्तकांसाठी खर्च केले होते.

आपली पुस्तके दुस – यांना देणे त्यांच्या जीवावर येत असे. एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते. तसेच ‘ पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितला होता. यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. कारण ‘ आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे. ‘ असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके त्यांचे पुस्तकांवर प्रेम होते.

आपल्या या प्राणप्रिय पुस्तकांसाठी त्यांनी ‘राजगृह’ हा बंगला कर्ज काढून उभारला होता. खास पुस्तकांसाठी तयार केलेला हा संपूर्ण जगातील एकमेव बंगला आहे. या बंगल्यामध्ये हजारो ग्रंथांचा अफाट संग्रह त्यांच्याजवळ होता. यात अनेक भाषांचे आणि अनेक विषयांचे विविध ग्रंथ होते.

बाबासाहेबांच्या ग्रंथालयातील ग्रंथांची विषयवार विभागणी खालीलप्रमाणे होती. १) राजकारण ३००० पुस्तके, २) इतिहास २६०० पुस्तके, ३) कायदा ५००० पुस्तके, ४) धर्मशास्त्रे, २००० पुस्तके, ५) चरित्रे १२०० पुस्तके, ६) अर्थशास्त्र १००० पुस्तके, ७) तत्त्वज्ञान ६००० पुस्तके, ८) युद्धशास्त्र ३००० पुस्तके, ९) इतर ७९०० पुस्तके, १०) अहवाल वृत्तांत १००० पुस्तके, ११) मराठी ८०० पुस्तके, १२) भाषणपत्रे ६०० पुस्तके, १३) हिंदी ५०० पुस्तके, १४) संदर्भविषयक ४०० पुस्तके, १५) संस्कृत २०० पुस्तके, १६) हिस्टॉरियन, हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड २५ भाग, १७) एनसायक्लोपीडिया, सोशल सायन्सेस १५ भाग, १८) बौद्ध धर्म, पाली साहित्य, मराठी साहित्य २००० पुस्तके.

वरील पुस्तकांप्रमाणेच दिल्लीतील निवासस्थानामध्येदेखील जवळपास २०,००० ग्रंथांचा अफाट संग्रह त्यांनी केला होता. यातील काही ग्रंथ राजगृहातून आणलेले होते. तर बरेचसे ग्रंथ त्यांनी दिल्लीमध्येच खरेदी केले होते. बाबासाहेब रात्रंदिवस अखंडपणे वाचन करायचे. त्यांच्या बंगल्यामध्ये सर्वत्र ग्रंथच असायचे. त्यांच्या ग्रंथालयात, डायनिंग टेबलवर, लिहिण्याच्या टेबलवर इतकेच नाही तर त्यांच्या पलंगावरदेखील ग्रंथांचा ढीग असायचा. आपल्या बायको मलांपेक्षाही ग्रंथांवरच त्यांनी जिवापाड प्रेम केले आयुष्याच्या अखेरच्या काळातसुद्धा ते ग्रंथांच्याच सान्निध्यात होते. बाबासाहेबांना ज्ञानाची असीम भूक होती. ते आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले.

One Reply to “आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे…

Comments are closed.