बातम्या

महाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ

महाड येथे ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पाऊस झाल्याने सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे निर्माण झालेल्या पुराची भीषणता आणि दाहकता पूर ओसरल्यानंतर समोर आली आहे. नुकतेच राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्स महाड येथे मदत कार्य करण्यासाठी पोहचले आहेत.

पूरग्रस्त महाड व आजूबाजूच्या गावांनाही मदत:
राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या तीन दिवसापासून काम सुरु केले असून महाड शहरा व्यतिरिक्तही ते आजूबाजूच्या गावांनाही भेटी देऊन तिथे जीवनउपयोगी वस्तूंचे वाटप आणि मदत करीत आहेत. कोणत्याही जाति पातीचा, धर्म पंथाचा विचार न करता जवळपास 1000 कुटुंबाना कपडे, धान्य, चादर/चटई, लहान मुलांना ड्रेस, मुस्लिम असो वा हिंदु, बौद्ध असो वा आदिवासी सर्वाना समितीच्या कार्यकर्त्यांनी मैत्री भावना व दानपरिमेतून मदत केली

काळीज आदिवासी वाडी, राजेवाडी, कोंडिवते, गांधार पाली, केंबुर्ली, मोपरागाव, आसनपोई बौद्धवाडी, भोराव बौद्धवाडी आदी गावांमध्ये रात्री वीज नसतानाही जाऊन मदत करीत आहेत. माझीरे गावात 21 जुलैला दरड कोसळली व संपर्क तुटला होता, तिथे जाऊन समितीचे कार्यकर्ते मदत केल्यावर, तिथल्या लोकांनी पहिल्यांदाच कुणी मदत घेऊन आल्याचे सांगून, समितीचे विशेष आभार मानलेत.

समितीच्या वतीने मदत पोहचल्यानंतर ह्या माऊलीच्या चेहऱ्यावरील समाधान दिसत होते. तर काही ठिकाणी टीमचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत.

ऐतिहासिक चवदार तळे परिसर केला स्वच्छ :-
महापूरामुळे महाड येथील ऐतिहासिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या चवदार तळ्यात सुद्धा (जिथे बाबासाहेबांनी हक्काचं, पिण्याचं पाणी सर्वांना खुले करावे ह्यासाठी लढा दिला) प्रचंड चिखल आणि गाळ साचली आहे. तसेच तळ्यातील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ पुराच्या पाण्यासोबत आलेला चिखल/गाळ मोठ्या प्रमाणात साचलेला होता. मुंबईहून आलेल्या व्हॉलेंटीअर्सनी येथील चिखलात स्वतः उतरून, हाती फावडे घमेले घेऊन मेहनतीने स्मारक परिसर स्वच्छ केले आहे. ह्या कामाची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुंबईहून आलेल्या व्हॉलेंटीअर्सनी येथील चिखलात स्वतः उतरून, हाती फावडे घमेले घेऊन मेहनतीने स्मारक परिसर स्वच्छ केले.

समितीची दुसरी टीम सुद्धा पोहोचली
मुंबईहून आलेल्या ५० व्हॉलेंटीअर्सची मदतकार्य व उत्साह पाहून आणि पूरग्रस्तांसाठी अजून आवश्यक लागणारी गरज पाहून मुंबईहून समितीचे अजून 30 व्हॉलेंटीअर्सची दुसरी टीम, 700/800 लहान मुलांसाठी लागणारे कपडे, लेडीज गाऊन्स, मैक्सी, चादर, ब्लँकेट्स, सॅनिटरी पॅड्स आदी सोबत घेऊन गेली आहेत.

महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू आणि मदतकार्यासाठी पोहचलेले राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्स आणि पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठीचे साहित्य.

समितीच्या बुद्धिस्ट युवकांनी घालून दिला एक आदर्श
तीन दिवस सतत दिवस रात्र काम करून सुद्धा ही तरुण मुले बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन कोरोनाच्या कठीण परिस्थिती मध्येही पूरग्रस्त भागात काम करीत असल्याचे सांगून, बाबासाहेबांना ज्यांनी चवदार तळ्याच्या संघर्षाच्या वेळीस मोलाची मदत केली ते नाना टिपणीस (त्या वेळेस महाड नगर परिषदेचे अध्यक्ष) ह्यांचे नातू मिलिंद टिपणीस ह्यांनी सुद्धा समितीचे व्हॉलेंटीअर्स आणि डॉ. हर्षदीप कांबळे ह्यांचे अभिनंदन केले आहे. बौद्ध समाजातील युवकांना एक चांगला आदर्श ह्या निमित्ताने घालून दिला, अश्या चांगल्या प्रतिक्रिया ह्या निमित्ताने येत आहेत.

महाड येथील हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांना जीवन उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.