ब्लॉग

22 प्रतिज्ञा हा कट्टरवाद, जातीयवादी लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच”

आप पक्षाचे मंत्री राजेंद्र गौतम यांना बावीस प्रतिज्ञा साठी आपला राजीनामा देण्यास त्यांच्याच पक्षाने भाग पाडले, संविधान, बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांच्या विधानाचे सोयीने दाखले देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे खरे रूप आतातरी लोकांना कळायला हवे, संविधान आणि बाबासाहेब हे फक्त आपल्या सोयीनुसार “वापरण्या करता” उपयोगात आणले जातात, पण “स्वीकारण्या करता” जी विवेकबुद्धी लागते ती ह्यांच्या जवळ नाही, उलट ह्यांनी “Dead ambedkar is more dangerous than alive” हे वाक्य खरे करून दाखवले आहे.

खरंतर हा मुद्दा खूप मोठा आहे पण नेहमीप्रमाणे मीडियाने याला महत्व दिले नाही, अर्थात आपला तिळपापड झालाय व एक प्रकारची धास्ती आपण घेतली आहे हे त्यांना व त्यांच्या तथाकथित आकांना सार्वजनिक रित्या दर्शवायचे नाही. तसेच असे केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून काय करू शकतो ह्याचा ही घाट घालण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी राजीनामा घेऊन दिला आहे.

धर्मांतर करून, बावीस प्रतिज्ञा म्हटल्याने जर राजीनामा काढून घेत ह्यांच्या तथाकथित संस्कृतीला हादरे बसत असतील तर ह्या विषयाचे गांभीर्य इथल्या आंबेकरी समाजाने, युवक-युवतींनी, कार्यकर्ते व त्यांच्या नेत्यांनी ओळखायला हवे, ही धर्मांतराची ज्योत तेवत ठेवायला हवी, पण आपण ह्या महत्वाच्या विषयाला बगल देऊन अमुक नेत्यांचा मेळावा, त्यांचे वाद-विवाद, तसेच आपल्या नेत्यांचे वादग्रस्त विधान यांचीच पाठराखण करीत पालखीचे भोई होण्यात धन्यता मानतो.

राजरत्न आंबेडकरानी उचललेले हे पाऊल महत्वाचे आहे, महाराष्ट्रातील आंबेडकरी नेते ह्या बाबत का उदासीन आहेत हे एक गमकच आहे. उलट आपण आपल्या व्यक्त होण्याच्या मार्गाने ह्या विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे, हा विषय चर्चेत ठेवला पाहिजे. केजरीवाल सारखी लोकं तुम्हाला पावलोपावली भेटतील,कोणी बाबासाहेबांचे नाव घेऊन गुणगान गाईल, जयभीम घालेल,पण आपल्याला भावनिक न होता माणूस आणि त्याचे राजकारण व त्या मागील त्याचा फायदा ओळखता यायला हवा, इथे जयभीम म्हणून लोकांना फक्त भावनिकच बनवले नाही तर, जयभीम म्हटल्यामुळे, रिंग टोन वाजल्यामुळे खून ही करण्यात आलेत ही बाब आपल्याला विसरून चालणार नाही.

बाबासाहेबानी 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचा ही चुकीचा अर्थ घेतला जातो, काही स्वयंघोषित अभ्यासक म्हणतात की, बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा कालबाह्य झाल्या आहेत,त्या प्रतिज्ञा म्हणजे कट्टरवाद आहे,तर अशा नर्मदेतील गुळगुळीत गोट्यांना सांगू इच्छितो की, बावीस प्रतिज्ञा हा कट्टरवाद नसून त्या मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या,संपूर्ण गावाला वाळीत टाकणाऱ्या, नग्न धिंड काढणाऱ्या व जीवे मारणाऱ्या लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच” आहे.
………jay