आंबेडकर Live

बाबासाहेबांचे हे स्मारक पाहिलात का?

दिल्ली मध्ये कधी फिरायला गेलात तर २६ अलीपूर रोडवरील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पहायला विसरू नका. या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होते. इ.स. १९५६ ला याच घरात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे हे स्मारक महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते.

१३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले होते. या स्मारकाच्या इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे दिसते, हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे. केंद्रीय सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत असलेल्या पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.

इ.स. १९५१ मध्ये बाबासाहेबांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६ अलीपूर रोड इथल्या सरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले होते. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. याच निवासस्थानी ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणून या वास्तूला ‘परिनिर्वाण स्थळ’ म्हटले जाते.

या जागेवर डॉ बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी १२ वर्षापूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेतली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्रात पुन्हा भाजप सरकार आल्यानंतर २१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले. दोन वर्षानंतर म्हणजेच १२७व्या आंबेडकर जयंतीच्या एक दिवस आधी, १३ एप्रिल २०१८ रोजी पंतप्रधानांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.

झाडाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर गंभीर विचार करतानाची मूर्ती

काय आहेत स्मारकाची वैशिष्ट्ये :

  • राष्ट्रीय स्मारकाच्या प्रवेशद्वारावर भव्य अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
  • इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधान या पुस्तकासारखी आहे.
  • बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम केले जातात.
  • स्मारकात बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा आहे.
  • विशेष म्हणजे थ्री डी इफेक्ट द्वारे प्रत्यक्ष बाबासाहेब आपले विचार मांडताना दिसतात.

One Reply to “बाबासाहेबांचे हे स्मारक पाहिलात का?

Comments are closed.