बोधगया येथील महंतांच्या मठामध्ये असलेल्या अनेक प्राचीन बुद्धमूर्त्यांची नोंदणी १९७६ साली पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आली. यामध्ये आठव्या शतकातील काळ्या ग्रॅनाईट मधील उभी असलेली एक सुंदर बुद्धमूर्ती सुद्धा होती. ती अचानक फेब्रुवारी १९८७ ते मार्च १९८९ च्या दरम्यान नाहीशी झाली. बिहारमधून ही सुंदर मूर्ती थेट अमेरिकेत गेली. मात्र पुरातत्व खात्याच्या माजी संचालिका डॉ. देबला मित्रा यांच्या जागरूकतेमुळे ही मूर्ती मेट्रोपोलिटन म्युझियम, न्यूयॉर्क येथून परत भारतात आणण्यात आली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, डॉ. देबला मित्रा मॅडम, या १९७५ ते १९८३ या काळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या. सेवानिवृत्तीनंतर १९८७ मध्ये त्यांनी बोधगयेला सहज भेट दिली. तेव्हा त्या तेथील ब्राह्मण महंतांचे मठात गेल्या. तेव्हा त्यांनी काळ्या दगडातील एक उभी बुद्धमूर्ती पाहिली. त्यानंतर १९८९ मध्ये त्या परत बोधगया येथे गेल्या असताना महंतांच्या मठातील बुद्धमूर्ती त्यांना नाहीशी झाल्याचे आढळले. त्यांनी त्याबाबत विचारले असता सगळ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. तेथील मठातील लोकांनी त्या मूर्तीची चोरी झाल्याची तक्रार सुद्धा पोलिसांकडे नोंदविली नव्हती.
त्यानंतर एक वर्षाने त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना न्यूयॉर्कवरून Arts of South & South-East Asia चा कॅटलॉग पाठविला. त्यात बोधगया येथील महंतांच्या मठातून नाहीसा झालेल्या बुद्धमूर्तीचा फोटो होता. तो पाहून त्यांनी आपले जुने संदर्भ तपासले तेव्हा महंतांच्या मठातील चोरीला गेलेली मूर्ती व कॅटलॉक मधील बुद्ध मूर्ती फोटो एकच असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ भारतीय पुरातत्व खात्याला ४/०५/१९९० रोजी तसे कळविले.

ASI ने हरवलेली मूर्ती तीच असल्याची खात्री केली आणि लगेच न्यूयॉर्क येथील भारतीय वकिलातीला कळविले. त्यांनी मेट्रोपोलिटन म्युझियमकडे याबाबत विचारणा केली व ती मूर्ती भारतातील बोधगया येथील असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी ती मूर्ती विनाअट देण्याचे मान्य केले. व त्याप्रमाणे ती मूर्ती २३/०३/१९९९ रोजी परत भारतात आणण्यात आली. आणि या कथेवर पडदा पडला.
आता प्रश्न असा येतो की ही बुद्धमूर्ती महंतांच्या मठातून चोरीला गेलीच कशी? बरे गेली तरी मठातील लोकांनी त्यांची पोलिसांकडे तक्रार का नाही केली? मग त्यांच्याविरुद्ध काय कार्यवाही झाली? हे सगळं गुलदस्त्यात आहे. त्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. यावरून आंतरराष्ट्रीय टोळ्या पुरातन बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात कार्यरत आहेत हेच सिद्ध होते. यास्तव पुरातन शिल्पावंर, मुर्त्यांवर लक्ष ठेवणे, तसेच लेण्यांच्या ठिकाणी वारंवार भेट देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
-संजय सावंत (नवी मुंबई)
खूपच अप्रतिम अशी पोस्ट आहे मि नेहमी आपले ब्लॉग्स read करत असतो , आणि मला खुप काही माहिती प्राप्त झाली जी आता पर्यन्त मला नवती माहिती