कृतिशील मैत्री म्हणजे करूणा होय. निव्वळ दया दाखवणे म्हणजे करूणा नव्हे. दयेच्या मुळाशी प्रेमाचा ओलावा असावा लागतो. त्यालाच करूणा म्हणतात. कृतीशुन्य दया ही काहीच कामाची नसते. ज्यावर दया दाखवतो, त्याचेप्रती मनपूर्वक प्रेम असले पाहिजे. बौध्द तत्वज्ञानात करूणा ही महत्वाची संकल्पना आहे.
करूणा ही केवळ मणुष्याप्रतीच नसून, ती सर्वच प्राणी मात्राप्रती असली पाहिजे, प्रज्ञा, शीलाचे संर्वधन झाले तर करूणा वृत्ती वृध्दिगंत होते. करूणा ही मानवी मनाची सर्वश्रेष्ठ अवस्था होय. करूणेतच मानवमात्रांचे सर्वोत्तम मंगल आहे. करूणेतच सर्वाचे कल्याण आहे. करूणेतूनच सेवाभाव जन्मास येतो. करूणेतच मैत्रीभावाला पुष्ट होण्यास साहाय्य मिळते.
गरिब, अनाथ, निराधार, दुःखी, कष्टी, रोगी, वृध्द व अपंगाप्रती, प्राणीमात्रा प्रती, मनात करूणा जागवणे हाच खरा मानवी धर्म होय. आज करूणा, मैत्री, बंधुतेची जागा वैर वैमनस्याने, घृणेने घेतली आहे. म्हणूनच जगात हिंसक प्रवृत्ती वाढते आहे. शांती भंग होऊन अशांती वाढते आहे. यासाठीच करूणेचे संवर्धन अत्यंत अगत्याचे आहे. करूणावंत होणे हे जीवनाचे सर्वोतम उद्दिष्ट असले पाहिजे.
भगवान गौतम बुध्द हे ख-या अर्थाने करूणेचे प्रतिक होत ! त्यांच्या ठायी वसत असलेली करूणा अद्वितीय होती, मंगलदायी, कल्याणमयी होती. इतर जनांच्या दु:ख वेदना बघून बुध्दांचे अंत:करण करून भरले जाई. करूणा हाच बुध्दाचा स्थायी भाव होता. म्हणूनच बुध्दाला महाकारूणिक म्हणतात.