ब्लॉग

भारतातील प्राचीन लिपींचा परिचय

भारतात सर्वत्र ठिकठिकाणी प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपट आढळून येतात. या प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपटांचे अध्ययन केले असता, असे ज्ञात होते , की भारतामध्ये पहिल्यांदा दोनच लिपी मुख्यत्वेकरून लिखाणासाठी प्रचलित होत्या -एक ‘ ब्राह्मी ‘ व दुसरी ‘खरोष्ट्री ‘.जरी भारतीय ग्रंथांमध्ये या दोन लिपींव्यतिरीक्त इतरही अनेक लिपींचे वर्णन येत असले, तरीही त्या लिपींबद्दल प्रमाण मिळत नाही. सम्राट अशोकाच्या धम्म अभिलेखांमध्ये ‘ ब्राह्मी ‘ आणि ‘ खरोष्ट्री ‘ लिपींचाच वापर जरी केला गेला असला, तरी या लिपींचे नांव मात्र कुठेही आढळून येत नाही.

जैन सूत्रांमधील लिपींची नावे

अशोकाच्याही पूर्वी जैन सूत्रांमधून, जसे- ‘समवायांग सूत्र’, ‘पन्नवणासूत्र’, आणि ‘भगवतीसूत्र’ या जैन ग्रंथांमध्ये १८लिपींच्या नावांचा उल्लेख आढळतो. लिपींची ती नावे अशी -१) बंभी, २)जवणालि, ३) दोसापुरिया,४) खरोट्ठी, ५) पुक्खरसारिया, ६) भोगवइया, ७) पहाराइया, ८) उपअन्तरिक्खिया ,९) अक्खरपिट्टिया, १०) तेवणइया , ११) गिराहइया, १२) अंकलिवि , १३) गणितलिवि, १४) गंधव्वलिवि, १५)आदंसलिवि, १६) माहेसरी, १७) दामित्नी , १८) पोलिंदी.

वर्णकसमुच्चय या ग्रंथामधील लिपींची नावे –

१) उड्डी, २) कीरी, ३) चणक्की, ४) जक्खा ,५) जवणी, ६) तुरक्की, ७) द्राविडी ,८) नडी, ९) निमित्री, १०) पारसी, ११) मूलदेवी, १२) रक्खसी, १३) लाडलि, १४) सिन्धविया, १५) मालविणी, १६) हंस लिपी, १७) जवणालिया, १८) दामिलि.

विशेषावश्यकसूत्र या ग्रंथामधील लिपींची नावे

१) हंस लिपी, २) मुअ लिपी, ३) जक्खातट लिपी, ४) रक्खी लिपी, ५) उड्डी लिपी, ६) जवणि लिपी, ७) तुरक्की लिपी, ८) किरी लिपी, ९) द्राविडी लिपी. १०) सिन्धविया , ११) मालविणी, १२) नडी लिपी,१३) नागरी लिपी, १४) लाड लिपी, १५) पारीसी लिपी, १६) तहअनिमितिय लिपी,१७) चाणक्की लिपी. १८) मूलदेवि लिपी.

‘समवायांग सूत्र’ आणि ‘विशेषावश्यकसूत्र’ यांमध्ये उल्लेखिलेल्या १८ लिपींच्या नावांतही बराच फरक आहे. ‘समवायांग सूत्र’ या ग्रंथात ‘ब्राह्मी’ आणि ‘खरोष्ट्री’ लिपीचा उल्लेख आढळतो, जो ‘विशेषावश्यकसूत्र’ या ग्रंथात आढळत नाही. परंतु, ‘विशेषावश्यकसूत्र’ मध्ये ‘नागरी लिपी’चा उल्लेख सर्वप्रथमच आढळतो. ‘विशेषावश्यकसूत्र’ मध्ये आशिया आणि भारतातील प्रदेशांच्या नावावर आधारित लिपींची नांवे आढळून येतात. वात्सायनाच्या ‘कामसूत्र’ या ग्रंथात देखिल या लिपींचा उल्लेख आढळतो. परंतु, बौद्ध ग्रंथ ‘ललितविस्तर’ मध्ये मात्र तब्बल ६४ लिपींचा उल्लेख आढळून येतो. बालपणी शिक्षणासाठी गुरुकुलात दाखल झाले असता, तथागत गौतम बुद्ध यांनी आपले आचार्य विश्वामित्र यांना प्रश्न केला, की, “हे आचार्य, मला आपण कोणती लिपी शिकवणार आहात….? असे विचारुन तथागत बुद्धांनी ६४ ज्या लिपींची नावे घेतली, ती पुढीलप्रमाणे –

बौद्धग्रंथ “ललितविस्तर” मधील लिपींची नावे

१) ब्राह्मी, २) खरोष्ट्री, ३) पुष्करसारी, ४) अंग लिपी, ५) बंग लिपी, ६) मगध लिपी, ७) मांगल्य लिपी, ८) मनुष्य लिपी, ९) अंगुलीय लिपी, १०) शकारि लिपी, ११) ब्रह्मवल्ली लिपी,१२) द्राविडी लिपी, १३) कनारि लिपी, १४) दक्षिणी लिपी, १५) उग्र लिपी, १६) संख्या लिपी, १७) अनुलोम लिपी, १८) उर्ध्वधनु लिपी, १९) दरद लिपी, २०) खास्य लिपी, २१) चीन लिपी, २२) हूण लिपी, २३) मध्याक्षर -विस्तर लिपी, २४) पुष्प लिपी, २५) देव लिपी, २६) नाग लिपी, २७) यक्ष लिपी, २८) गन्धर्व लिपी, २९) किन्नर लिपी, ३०) महोरग लिपी, ३१) असुर लिपी, ३२) गरुडलिपी, ३३) मृगचक्र लिपी, ३४) चक्र लिपी, ३५) वायुमरु लिपी, ३६) भौमदेव लिपी, ३७) अन्तरिक्षदेव लिपी, ३८) उत्तरकुरुद्वीप लिपी , ३९) अपरगौडादि लिपी, ४०) पूर्वविदेह लिपी, ४१) उत्क्षेप लिपी, ४२) निक्षेप लिपी, ४३) विक्षेप लिपी, ४४) प्रक्षेप लिपी, ४५) सागर लिपी, ४६) वज्र लिपी, ४७) लेठ-प्रतिलेख लिपी, ४८) अनवृत्त लिपी, ४९) शास्त्रावर्त लिपी, ५०) गणावर्त लिपी, ५१) उत्क्षेपावर्त लिपी, ५२) विक्षेपावर्त लिपी, ५३) पादलिखित लिपी, ५४) द्विरुत्तरपदसंधिलिखित लिपी, ५५) दशोत्तरपदसंधिलिखित लिपी,५६) विमिश्रित लिपी, ५७) सर्वरुत्संग्रहणी लिपी, ५८) विद्यानुलोम लिपी, ५९) अध्याहारिणी लिपी, ६०) ऋषितपस्तप्त लिपी, ६१) धरणीप्रेक्षणी लिपी, ६२) सर्वोषधनिष्यन्द लिपी, ६३)सर्वसारसंग्रहणी लिपी, ६४) सर्वभछतरुद्ग्रहणी लिपी.

– अशोक नगरे
मोडी तज्ज्ञ, धम्म लिपी ब्राह्मी, व धम्मभाषा पाली अभ्यासक,
बौद्ध लेणी, बौद्ध शिल्पकला, व बौद्ध इतिहास अभ्यासक, पारनेर, अहमदनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *