ब्लॉग

२९ एप्रिल – अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन

१७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता, बौद्ध धम्माचा प्रसार करणार असा निर्धार केला. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले.

वयाच्या २५व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी आले. तेथील महाविहार हे शैव महंतांच्या ताब्यात पाहून त्यांना खूप दुःख झाले व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला, मारेकरी पाठविण्यात आले, प्रसंगी जीवावर बेतले पण धम्मपाल मागे हटले नाहीत.

१८९२ साली त्यांनी येथील महंतांवर पहिली कोर्ट केस दाखल केली. येथील बौद्ध स्थळांना पुन्हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कोलकत्ता येथे महाबोधी सोसाटीची स्थापना केली. याच माध्यमातून अनेक शाळा व वसतिगृह सुरु केली जी आजही सुरु आहेत. महाबोधी महाविहाराच्या जागृती बद्दल त्यांनी जगभर प्रवास केला आणि ब्रिटिश सरकारवर दबाव वाढविला.

बौद्ध धम्म आणि पालि भाषेच्या प्रसारासाठी ते अहोरात्र झटले. वयाच्या ६९व्या वर्षी, २९ एप्रिल १९३४ साली अनागारिक धम्मपालांचे परिनिर्वाण झाले. महाबोधी महाविहार शैव महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. १८९२ साली, महाबोधी महाविहारासाठी दाखल केलेल्या पहिल्या कोर्ट केसचा आजही – १२७ वर्षानंतर निकाल लागलेला नाही. इतर पंथांची प्रार्थना स्थळे त्या त्या लोकांच्या संपूर्ण ताब्यात आहेत…पण महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही ही या देशाची व देशावर राज्य करणाऱ्यांची मानसिकता आहे.

महाबोधी महाविहारासाठी आयुष्यभर झगडा देणाऱ्या अनागारिक धम्मपालांना त्यांच्या ८५व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.

अतुल भोसेकर 
(लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *