इतिहास

शिकागो येथील १८९३ च्या विश्वधर्म परिषदेत अनागारिक धम्मपाल यांच्या भाषणाचा प्रभाव

२ सप्टेंबर १८९३ ला त्यांचे जहाज न्यूयॉर्कला पोहोचले. तेव्हा धम्मपालांचे भव्य स्वागत तेथील थियाॅसाॅफिस्टांनी केले. २७ वर्षांचा हा तरूण इतका विद्वान कसा? याचे अनेकांना आश्चर्य वाटले. शेवटी ६ सप्टेंबर १८९३ ला धम्मपाल शिकागो येथे पोहोचले. परिषदेला ४-५ दिवसांचा अवधी असल्यामुळे त्यांचे विचार ऐकण्याची तेथील जनतेला उत्सुकता होती. काही लोकांनी ‘युनिटेरियल चर्च’ मध्ये त्यांचे स्वागत करावयाचे ठरविले. धम्मपालांनी संमती दिली. सत्कारास उत्तर देताना धम्मपालांनी ‘शुध्द जीवन’ या विषयावर भाषण दिले. त्यांचे भाषण ऐकून ते एक विश्वविख्यात वक्ता असल्याचे जनतेमध्ये मान्यता पावले.

कोलंबसच्या सदनात त्यांचे भाषण ऐकण्याकरिता चार हजार लोक उपस्थित होते. शतकानुशतकापासून समस्त आशिया खंडात चालू असलेला शांतीचा संदेश धम्मपालांच्या मुखातून ऐकण्यासाठी श्रोतुवर्ग आतुर झाला होता. बुद्धाच्या धम्मक्रांतीने आजवर जगात शांती प्रस्थापित केली, या आशयाचे त्यांचे व्याख्यान खरोखरच ऐतिहासिक स्वरूपाचे होते.

दिनांक १८ सप्टेंबर १८९३ रोजी विश्वधर्म परिषदेत अनागारिक धम्मपाल उभे होताच प्रेक्षकांतून टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांच्या बाजूला एका मेजवर भगवान बुद्धाची धीरगंभीर अशी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील एक मूर्ती ठेवली होती. त्यांनी ‘बौध्द धम्माचे विश्वावरील ऋण’ हा निबंध वाचावयास घेतला होता. त्यांचे भाषण धम्मविचाराने परिप्लुप्त होते. विश्वधर्म परिषदेत विचार व्यक्त करताना अगदी सरळ व सोप्या भाषेचा वापर केला. चमत्कारपूर्ण भाषण करणे त्यांना मुळीच आवडत नसे. ते स्वतःला ‘भगवान बुद्धाचा विनम्र सेवक’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असत.

विश्वधर्म परिषदेतील त्यांच्या भाषणाचा प्रभाव श्रोत्यांवर पडला. वर्तमानपत्रांनी त्यांच्या भाषणाला ठळक अक्षरांत प्रसिद्धी दिली. एका वर्तमानपत्रात (डेली सेंट लुईस आॅब्झरवर) लिहिले की, ‘शांतीच्या आंदोलनाचा प्रमुख भगवान बुद्धाच्या शिष्यसमूहास शक्तीशाली बनविण्याकरिता एकसारखी धडपड करीत असून, अशा दिव्य रुपधारी पुरूषास साजेसे सौंदर्य लाभलेले आहे, हे पाहून अनेकांना धन्यता वाटत होती.

त्यांना मंचावर पाहून कोणाही पाहणाऱ्यास येशू ख्रिस्ताची आठवण झाली असल्यास नवल ते कसले? या भाषणाचा श्रोतवृंदावर असा ठसा उमटला की, बौध्द धर्मावरील त्यांचे व्याख्यान म्हणजे कठीण सिद्धांताची सुगम शब्दांत मांडणी होती.’ त्यांचे भाषण ऐकून न्यूयॉर्क येथील सी टी टाॅस नावाचे प्रसिद्ध व्यापारी बौध्द धम्माची दीक्षा घेण्यास तयार झाले आणि त्यांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली.

थियाॅसाॅफिकल सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या शिकागोला येथील सत्कार समारंभात अनागारिक धम्मपाल यांचा गौरव करण्यात आला. अमेरिकेत आलेल्या भगवान बुद्धाच्या धम्मप्रचारकामधील ‘सर्वश्रेष्ठ धम्मप्रचारक व महाबोधी सभेचा महान संरक्षक’ अशी त्यांची स्तुती करण्यात आली.

संमेलनाच्या शेवटच्या दिवशी अनागारिक धम्मपालांनी निरोपाचे भाषण केले. ‘मी पुन्हा दोन वर्षांनी अमेरिकेस येऊन बौध्द धम्माचे शासन प्रस्थापित करीन,’ हे त्यांचे निरोपाचे शब्द ऐकून सर्वांना आनंद झाला. धम्मपालांचे विचार श्रेष्ठ व सहजगम्य होते. ते म्हणाले की, “प्रत्येकाने निष्पक्षपणे विचार करावयास शिकले पाहिजे. समस्त प्राणिमात्रांवर प्रेम करावे. आपले विचार लोकांसमोर निर्भयपणे मांडावेत. शुध्द जीवन जगावे. कुटिलता दूर करावी. याप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हांला अवश्य सत्यसूर्याचा प्रकाश दिसून येईल.”

२७ सप्टेंबर १८९३ रोजी ही ऐतिहासिक परिषद संपली तरी धम्मपालांची भाषणे सुरूच होती. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी आॅकलँड व सेन् फांसिस्को येथे भाषणे केली. त्यांनी तेथील लोकांना सुखी जीवनाच्या वाटचालीत बौध्द धम्माचे स्थान स्पष्ट करुन दिले. याच धर्म संमेलनात स्वामी विवेकानंद यांना बोलण्याची संधी अनागारिक धम्मपाल यांनी मिळवून दिली होती. तेव्हापासून विवेकानंद धम्मपालांना अतिशय सन्मान देत होते.

संकलन – इंजि सुरज तळवटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *