इतिहास

तामिळनाडूतील नागपट्टिनम – एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र

तामिळनाडू राज्यामधील अनेक गावांत पाषाणातील बुद्धमूर्त्या आढळून आल्या आहेत. तेथील ‘नागपट्टिनम’ जिल्हा म्हणजे एके काळी बौद्ध संस्कृतीने बहरलेले मोठे केंद्र होते. या नागपट्टिनम जिल्ह्यामध्ये ‘पुष्पवंणम’ नावाचे एकांतात वसलेले गाव आहे. तेथे एक सापडलेली प्राचीन बुद्धमूर्ती वडाच्या व पिंपळाच्या झाडाखाली गावकऱ्यांनी ठेवली आहे. ही मूर्ती जवळजवळ ५ फुट ४ इंच उंच असून काळ्या पाषाणात घडविलेली आहे. पुष्पवंणम हे एक निसर्गरम्य ठिकाण असून तेथे पूर्वी विहार असावा असे समजते.

१४ व्या शतकापर्यंत नागपट्टिनम हे बौद्ध संस्कृतीने भरभराटीला आलेले मोठे केंद्र होते. भारतातील अनेक पुरातन बौद्ध स्थळांच्या नोंदी या म्यानमार तसेच थायलंड देशातील अनेक मॉनेस्ट्रीत आढळून येतात. त्यानुसार म्यानमारमधील पुरातन नोंदीन्वये ‘नागपट्टिनम’ हे ठिकाण सम्राट अशोक काळापासून बौद्ध संस्कृतीचे असल्याचे दिसून येते. ११व्या शतकात येथे ‘चुडामणी’ विहार बांधला गेला. १३व्या शतकापर्यंत चोल राजवटीत बुध्दिझम बहरला होता. गेल्या दोनशे वर्षात नागपट्टिनम येथे जवळजवळ धातूच्या चारशे बुद्धमुर्त्या मिळालेल्या आहेत. त्या आता चेन्नई येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत व अजूनही तेथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत.

A Majestic Vestige of Buddhism in Pushpavanam

पुष्पवणंम गावात सापडलेली ही ग्रॅनाईट पाषाणातील बुद्धमूर्ती ८-१० व्या शतकातील असावी. तेथील गावकरी सांगतात की ही मूर्ती पूर्वी वाळूत पूर्णपणे बुडालेली होती. तेथे मुले खेळताना एकाच्या डोक्याला मूर्तीच्या शिरावरील उशनी लागली. तेव्हा शिळा समजून ती बाहेर काढण्यात आली तेव्हा पाषाणातील बुद्धमूर्ती असल्याचे समोर आले. या पुष्पवणंम गावांमध्ये बौद्ध संस्कृती जाणणारे कोणीच नाहीत. त्यामुळे त्या मूर्तीला हिंदू देव समजून तेथील लोक त्याला पूजतात. विभूती फासतात.

नोव्हेंबर २०१८ मध्ये येथे मोठे वादळ आले होते. शेतीचे नुकसान झाले तसेच अनेक झाडांची आणि घरांची पडझड झाली. मोठे वृक्ष उन्मळून पडले. परंतु सुदैवाने या मूर्तीला आणि जवळील वड आणि पिंपळ या वृक्षांना काही झाले नाही. बुद्धमूर्ती अभंग राहिली.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Photo credit : www.wayofbodhi.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *