इतिहास

तामिळनाडूतील पेरंबलूर – बौद्ध संस्कृतीचे केंद्र

तामिळनाडूत पेरंबलूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बुद्धमूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी या प्रदेशात बौद्ध संस्कृती बहरलेली होती हे दिसून येते. पेरंबलूर जिल्ह्यातील थियागनूरची बुद्धमूर्ती ही आजपर्यंत सर्वाना माहीत होती. परंतु तेथील दुसऱ्या काही गावांत सुद्धा बुद्धमूर्ती मिळाल्याचे दिसून आले आहे.

इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या राजवटीत बौद्धधर्म दक्षिण भारतात पसरू लागला होता. दक्षिण भारतातील अनेक राजवटीत त्यास आश्रय मिळाला होता. नागपट्टिनम येथेही मोठे बौद्ध केंद्र होते. व ते मिळालेल्या बुद्धशिल्पामुळे आता समोर आले आहे. ११ ते १३ व्या शतकापर्यंत बुद्धिझम तेथे बहरला होता. त्रिची आणि तंजावर पासून उत्तरेकडे पेराम्बलुर जिल्ह्यापर्यंत अनेक बौद्ध संस्कृतीच्या खुणा आढळून येत आहेत. पेराम्बलुर जिल्ह्यात ओगलूर आणि परवाई गावात प्राचीन बुद्धमूर्ती मिळाल्या आहेत. बौद्ध संस्कृतीबाबत इथला गावातला समाज हा अनभिज्ञ असल्याने या बुद्धमूर्ती सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बुद्धमूर्त्यांबाबत अंधश्रद्धा पसरविल्याचे दिसते.

परवाई गावकरी बुद्धमूर्ती सोबत

येथील ओगलूर गावात असलेल्या बुद्धमूर्तीला ‘दुबई बुद्धा’ असेही म्हणतात. या गावातील कुणालाच ही बुद्धमूर्ती कुठून आणि कशी आली याचा इतिहास माहीत नाही. तेथील रस्त्याच्या चौकाजवळ एका बाजूस ही बुद्धमूर्ती लहानपणापासून अनेक जणांनी बघितल्याचे सांगितले.

हे पण वाचा : तामिळनाडूतील नागपट्टिनम – एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र

सन २००१ मध्ये एकाला दुबईला जाण्यासाठी व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांने बुद्धमूर्तीला पुष्पहार अर्पण करून तीची पूजा केली. आणि लगेचच दोन दिवसात त्याला व्हीसा मिळाला. ही बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे या प्रांतातील जे कामधंद्यासाठी गल्फ देशांत जातात ते बुद्धमूर्तीला फुले, पुष्पमाला वाहू लागले. बुद्धांची पूजा करु लागले. अशी प्रथा तेथे रूढ झाल्याने निदान बुद्धमूर्तीची व्यवस्थित काळजी घेण्यात येऊ लागली. पूजा होऊ लागली. दुबईवरून आलेल्या लोकांनी त्यासाठी चौथरा बांधून त्याभोवती लोखंडी कुंपणाचे बांधकाम केले. अशा तऱ्हेने “दुबई बुद्धा” हे नाव तेथील गावात रूढ झाले आहे. जे जे या मूर्तीचे दर्शन घेऊन परदेशाला गेले त्यांची परदेशवारी चांगली झाली अशी धारणा तेथे पसरली आहे.

पेरूमथुर गाव येथील रस्त्याच्या चौथऱ्यावरील जैन तीर्थंनकरांची मूर्ती.

ओगलूर गावापासून परवाई गाव १० कि.मी. दूर आहे. या गावात देखील चौकाजवळ रस्त्याच्या कडेला बुद्धमूर्ती असून अनेकांना ती तिथे कशी आली याची काही माहिती नाही. लहानपणापासून ती मूर्ती तिथेच बघितल्याचे अनेक बुजुर्ग मंडळीनी सांगितले. ४ फूट उंच असलेली ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. मूर्तीसाठी चौथरा बांधला असून काहीजण येवून फुले,पुष्पमाला वाहतात. परवाई गावा पासून ९ कि.मी. अंतरावर पेरूमथूर गाव असून तेथे मात्र महावीर यांची मूर्ती रस्त्याच्या कडेला उभारलेल्या चौथऱ्यावर आहे.

ओगलूर गावातील बुद्धमूर्ती. (सोबत योगी प्रबोद्धा)

तामिळनाडू राज्यात अनेक गावात सापडलेल्या बुद्धमूर्ती काही ठिकाणी पुरातत्व खात्याने ताब्यात घेतलेल्या आहेत. मात्र अद्यापही काही मुर्त्या आडगावात, रानात पडून आहेत असे समजते. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश हा किनारीपट्टा एकेकाळी बौद्ध संस्कृतीने समृद्ध होता याची साक्ष येथे सापडत असलेल्या बुद्धमूर्ती देत आहेत.

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.
https://www.wayofbodhi.org/buddhism-in-perambalur-tamil-na…/
Photo Credit : wayofbodhi.org

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *