आज आपण अशा एका वेगळ्या बौद्ध स्थळाची माहिती घेणार आहोत की बौद्ध साहित्यातील त्याची माहिती वाचल्यावर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अनेकांना त्या स्थळाची माहिती म्हणजे कपोलकल्पित कथा वाटते. पण सम्राट अशोक यांनी तेथे उभारलेला हत्तीमुद्रेचा स्तंभ आणि स्तूप पाहता या ठिकाणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते.

काही गोष्टी या आकलनाच्या पलीकडे असतात. आपल्या आजूबाजूस असलेली हवा आपण पाहू शकत नाही. त्या हवेला गंध नाही पण तिची झुळूक आपण अनुभवतो, तिचा स्पर्श आपल्याला जाणवतो. त्याच प्रमाणे ज्या साधकांनी शील आणि समाधी यांची जपणूक करून अंर्तप्रज्ञा जागृत करण्याचा अभ्यास केलेला आहे, स्रोतापन्नाची पायरी गाठली आहे असेच भिक्खू या जागेची कंपने ओळखू शकतात. या जागेचे महत्त्व जाणू शकतात. म्हणूनच कंबोडिया, थायलंड, सिरिलंका, जपान आणि म्यानमार देशांतील अभ्यासू भिक्खुंच्या मार्गदर्शनानुसार येथे मोठे सुंदर विहार बांधले गेले आहेत.

हे सुंदर आणि पवित्र असलेले ठिकाण म्हणजे उत्तरप्रदेश राज्यातील फारुखाबाद जिल्ह्यातील ‘संकिशा’ स्थळ होय. ही एक भारतातील प्राचीन नगरी आहे. तिथे अस्तित्व भगवान बुद्धांच्या काळापासून आहे. प्राचीन पालि ग्रंथात असे म्हटले आहे की तुषित देवलोकांत अभिधम्माचा उपदेश करून यास्थळी बुद्ध भूमीवर उतरणार याची जाणीव मोग्गलांन यांना अगोदर झाली. व जेंव्हा बुद्धांना घेऊन इंद्र आणि ब्रम्हा संकिशा येथे उतरले तेव्हा त्यांचे स्वागत सारिपुत्त यांनी केले.

ही गोष्ट अनेकांना काल्पनिक वाटण्याचा संभव आहे. पण इंद्रियांच्या पलीकडील अवस्थेची अनुभूती इंद्रियांच्या माध्यमातून कशी समजावून सांगता येईल ? आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते इतरांना ते कसे समजणार? इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या अनुभूतीचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडतात. त्यामुळे ही घटना सर्व समान्यजनानां आकलन होण्यापलीकडील आहे एवढेच तूर्तास ध्यानी घ्यावे. म्हणूनच या स्थळाचे पावित्र्य जाणून सम्राट अशोक यांनी त्यांच्या कारकिर्दीत इथे हत्ती शिल्पाचा स्तंभ, स्तूप आणि विहार उभारले. येथील कंपने स्रोतापन्न आणि सकदागामी अवस्था प्राप्त केलेल्या भिक्खुंनी जाणल्यामुळे अनेक पुर्वेकडील देशांनी इथे विहारे उभारली.

परंतु आज भारतीय अज्ञजनांनी इथेच स्तूपाच्या जागेवर ‘विषारी’ देवीचे मंदिर उभे केले आहे. परंतु हा फोलपणा मंदिराखाली असलेल्या प्राचीन विटांचे अवशेष पाहून उघड होतो. हे ठिकाण थोडे आडबाजूला असल्यामुळे व तेथे सुविधांचा अभाव असल्याने भारतीय पर्यटक कमी संख्येने येतात. पण बौद्ध राष्ट्रातून येणारे भाविक हे ठिकाण बिलकुल चुकवीत नाहीत. फाहियान आणि हुएनत्संग यांनी देखील संकिशा पाहिल्याचा उल्लेख त्यांच्या प्रवासवर्णनात केला आहे.

अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी हे स्थळ सन १८४२ साली उजेडात आणले. अनागारिक धम्मपाल यांनी देखील येथे भेट दिली होती. १९५७ पासून श्रीलंकेच्या भिक्खुंनी येथे बौद्ध शाळा चालविली आहे. गेल्या दोन हजार वर्षात असंख्य बौद्ध स्थळांची नावे बदलली गेली. पण संकिशा हे नाव तसेच राहिले आहे. आता फक्त या ठिकाणाला ‘संकिसा बसंतपुरा’ असे म्हटले जाते.

2) ठेकेदाराने ASI च्या क्षेत्रात घुसून खोदकाम केले. तेव्हा काही प्राचीन अवशेष मिळाले.
3) वेदिका स्तंभावरील कमलपुष्प.
अशा या संकिशा नगरीत मागील वर्षी एप्रिलमध्ये रस्त्याचे खोदकाम चालू असताना वालुकामय पाषणांचे स्तंभ मिळाले. त्यावर कमलपुष्पे आणि मनुष्य प्रतिमा कोरलेल्या आढळल्या. इथे पुरातत्व विभागातर्फे स्तुपाचे जागी योग्य उत्खनन झाल्यास अनेक नवीन गोष्टी उजेडात येऊ शकतील. थोडक्यात आठ मुख्य बौद्ध स्थळांपैकी संकिशा स्थळाचे महत्व आजही तितकेच अबाधित राहिले आहे.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)