बातम्या

सन्नती स्थळाची होणार आता उन्नती; लवकरच ‘हा’महाकाय स्तूप उभा राहील

गेल्या वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेले कर्नाटक राज्यातील जिल्हा कलबुर्गी मधील कनगनहल्ली येथील भीमा नदीच्या तीरी असलेले प्राचीन बौद्धस्थळ सन्नती आता नवीन कात टाकीत आहे. या स्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी ३.५ कोटीचा निधी मंजूर झाला असून स्तूप पुन्हा उभा करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. ASI चे विभागीय संचालक जी माहेश्वरी आणि मंडळ अधीक्षक निखिल दास यांच्या देखरेखीखाली या स्थळाचा जीर्णोद्धार (Restoration) करण्यात येत आहे.

सन्नती येथील उत्खननात क्षतिग्रस्त बुद्धमुर्ती प्राप्त झाली. प्राचीन काळी झालेल्या भूकंपामुळे हा महास्तूप ढासळला असावा असा संशोधकांचा कयास आहे.

सन १९८६ मध्ये सन्नती येथील काली मंदिराचे छत कोसळले तेव्हा त्यात अशोकाचा शिलालेख आढळून आला. यामुळे सन्नती येथे अनेक संशोधक, पुरातत्ववेत्ते आणि अभ्यासक गोळा झाले. आणि जे काही तेथे संशोधन आणि उत्खनन झाले त्यातून महाकाय स्तूपाचे अवशेष हाती लागले. त्याच्या विखुरलेल्या अवशेषांची व्याप्ती एवढी झाली की अखेर तेथील २५ एकर जागेत सुरक्षा रक्षकांचा ताफा नेमावा लागला. त्यातच हे अवशेष नुसते स्तुपाचे आढळून आले नाहीत तर त्याचा सबंध थेट सम्राट अशोक यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले. कारण इथे सापडलेल्या असंख्य अवशेषांवर सम्राट अशोक यांच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. ‘राया असोक’ अशी ब्राम्ही लिपीतील अक्षरे मिळाली आहे. तसेच जातक कथा कोरलेल्या प्लेट्स, यक्ष आणि सिंह, बुद्धपद शिल्प, नागफणा शिल्प, बोधिवृक्ष, वज्रासन शिल्प ( रिक्त सिंहासन नव्हे ), नक्षी काम केलेल्या चुनखडी दगडातील पट्ट्या आणि असंख्य ब्राह्मी लिपीतील शिलालेख आढळून आले. पुरातत्ववेत्ते यांच्या म्हणण्यानुसार इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात हा स्तूप उभारण्यात आला असावा.

1) सन्नती येथील नुकतेच प्राप्त शिल्पात सम्राट अशोक हे भोजनदान/ जलदान करीत असल्याचे दिसून येते. 2) सन्नती येथे मिळालेले हे वज्रासन शिल्प. पूर्वी अनेक संशोधकांनी यास रिक्त सिंहासन असे म्हटले आहे. परंतु ते चुकीचे दिसून येते. हे वज्रासन शिल्प असून पाठीमागे बोधिवृक्ष दर्शविण्यात आला आहे.

सन्नती या महास्तुपाचे विखुरलेले अवशेष गोळा करणे सुरू झाले आहे. तसेच काही ठिकाणी उत्खनन देखील करण्यात येत आहे. स्तूप पुन्हा बांधावयाचा असल्याने जुन्या आकाराच्या विटांसारख्या नवीन विटा घडविण्यात येत आहेत. जुना स्तूप चुनखडी मध्ये बांधला होता. स्तूपाचा मधला भाग स्टोन ब्लॉक यांनी भरून काढल्यावर त्याच्या बाजूस गोलाकार रेलिंग करण्यात येईल. सर्व आराखडा तयार झाला असून स्तूप जिर्णोद्धाराचे काम पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षाचा काळ लागेल असे हम्पी मंडळाचे अधीक्षक निखिल दास यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या महाकाय स्तूपाचे नाव युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये येण्यासाठी सर्व कागदपत्रांची तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने येथील २५ एकर जागा या महाकाय स्तुपासाठी वर्ग केलेली आहे.

सन्नती येथे स्तूपाच्या नूतनीकरणाच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली.

सम्राट अशोक यांच्याशी संबंधित असलेला हा महाकाय स्तूप लवकरच उभा राहील. पण त्या अगोदरच सन्नती येथील स्थानिक बौद्ध बांधवांनी या स्तूपासाठी सम्राट अशोक यांचा पुतळा आणि स्तंभ तेथे उभारून त्यांना मानवंदना दिली आहे. हे खरेच कौतुकास्पद आहे. सम्राट अशोक आपल्या उतारवयात दक्षिण भारतात आले होते याचा मोठा दाखला म्हणजे हा महाकाय स्तूप होय. जेव्हा हा स्तूप उभारला जाईल तेव्हा प्रत्येक बौद्ध बांधवाने येथे येऊन त्याचे दर्शन घेतले पाहिजे. भारताच्या इतिहासातून जाणूनबुजून पुसून टाकलेल्या सम्राट अशोक यांचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा झळकला गेला पाहिजे. त्यांचा जयघोष सर्व भारतभर दुमदुमला पाहिजे. जगतगुरू बुद्ध आणि त्यांच्या धम्मासाठी स्वतःस वाहून घेणाऱ्या या महान सम्राटांना माझा प्रणाम.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)