जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात २३०० वर्षांपूर्वीचे प्राचीन बुद्ध विहार सापडले

इटालियन पुरातत्त्ववेत्ते आणि पाकिस्तानी खोदकाम टीम यांनी संयुक्तरीत्या २३०० वर्षांपूर्वीचे एक बौद्ध विहार पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील स्वात खोऱ्यामध्ये शोधून काढले. हे विहार तक्षशिल विद्यापीठाच्या अगोदरचे असावे असे हिंदुस्तान टाईम्सने देखील म्हटले आहे. बझीरा या प्राचीन क्षेत्रांमध्ये हे उत्खनन झाले असून सध्या त्याचे नाव बारीकोट असे आहे आणि ते खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये आहे. पुरातत्त्ववेत्ते यांनी शोधून काढलेले हे विहार चार मीटर उंच असून अतिशय सुंदर आहे. प्राचीन बझीरा शहराच्या प्रवेशद्वारावर हे विहार असावे असे दिसून आले आहे.

इटलीतील Ca’ Foscari युनिव्हर्सिटी मधील पुरातत्व विभाग आणि इटालियन पुरातत्ववेत्ते यांनी संयुक्तरित्या पाकिस्तानच्या सहकार्याने हे विहार शोधून काढले. नोव्हेंबर २०२१ मध्ये खोदकामास प्रारंभ करण्यात आला आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे विहार मिळाले. एकेकाळी हा प्रांत गंधारा संस्कृतीचा प्रांत असावा असे पुरातत्ववेत्ते डॉ. मायकेल मिनार्डी यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे येथे राजा मिलिंद यांची खरोष्टी भाषेतील चांदीची प्लेट, काही नाणी आणि सुशोभित केलेल्या काही धातूच्या पट्ट्या सापडल्या, ज्याच्यावर ग्रीक शिक्के, मजकूर दिसून आला. येथे काळ्या मातीची पात्रे सुद्धा सापडली. बझीरा हे ३-४ थ्या शतकातील मोठे भरभराटीला आलेले बौद्ध संस्कृतीचे स्थळ होते. परंतु कुशाण काळामध्ये झालेल्या भूकंपानंतर हे स्थान रिक्त झाले असावे.

थोडक्यात दर महिन्याला आशिया खंडात कुठेना कुठेतरी उत्खननातून बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळत असल्याची बातमी प्राप्त होते आहे आणि खरा इतिहास उजेडात आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ इतिहास अभ्यासक)