साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सामाजिक बांधिलकेचे जाज्वल्य निशाण आहे. त्यांचे साहित्य मराठी साहित्य विश्वाचा अभिमान वाटावा असा भाग तर आहेच पण त्याहून अधिक ते भारतीय समाज संस्कृतीचे संचित आहे. एखाद्या लेखकाची साहित्य तेव्हाच संचित बनते जेव्हा लेखकाला समाजाबद्दल मूलभूत आस्था आणि अतूट असे प्रेम असते. समाज म्हणताना केवळ स्व:ताची जात असा त्याचा संकुचित अर्थ नसतो. तर सबंध मानवी समाजाच आपला आहे आणि आपण या व्यापक मानवी समाजाचे घटक आहोत, ही भावना या ठिकाणी महत्वाची ठरते. आपण ज्या समाजाचा घटक आहोत त्या समाजातील शोषण, दमन, दु:ख, अत्याचार नष्ट व्हा, तो समाज सुंदर व्हावा, सुखी व्हावा ही स्वप्न त्या लेखकाला पडू लागतात. अण्णा भाऊंचे साहित्य याच जाणिवेतून प्रकटले आहे. म्हणून त्यांचे साहित्य हे विशिष्ट समाजाचे साहित्य नाही तर ते माणसांचे साहित्य आहे.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ही एक युग प्रतिभा होती. आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे त्यांनी शोषित वंचितांच्या दु:खाला जळजळीत उद्गार दिला. ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्या मातीत गळालेले श्रमिक कष्टकर्यांीचे घाम, अश्रू आणि सांडलेले रक्त यांच्याशी कायम ईमान ठेवून त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली. अण्णा भाऊ साठे यांनी शोषितांच्या जगण्याशी एकरूप होऊन शोषकांच्या सत्तास्थानाला सुरुंग लावत तळपत्या तलवारीसारखी आपली लेखणी कायम परजली.
सौन्दर्य संपन्न निसर्गाचे वरदान लाभलेल्या वारणेच्या खोऱ्यातील वाटेगाव (जि. सातारा ) या गावाच्या गावकूसाबाहेरील वस्तीत भाऊराव आणि वालूबाई यांच्या पोटी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. उपेक्षित वस्तीत जन्मलेल्या अण्णा कडे होते तरी काय ? होती ती केवळ दारिद्र्य, वंचना नि मानखंडना. अण्णा भाऊंचे शालेय शिक्षणात मन रमले नाही हे खरे ! गुरुजींनी तुला काहीच कसे येत नाही म्हणत दुसर्यावच दिवशी अण्णांच्या उलट्या हातावर छड्या मारल्या. दुपारपर्यन्त शाळा करून अण्णांनी गुरुजींच्या दिशेने एक दगड भिरकावला आणि शाळेकडे पाठ केली. जेमतेम दीड दिवस शाळेत ते जाऊ शकले. पण त्यांनी शाळा सोडली हे विधान करतांना आपण एका बाबीकडे दुर्लक्ष करतो. खरेच अण्णा भाऊ यांनी शाळा सोडली की कोणत्याही स्वाभिमानी मुलाने शाळा सोडून द्यावी अशी ती व्यवस्था होती.
शाळा आणि तिथली मानखंडना इतकी तीव्र स्वरूपाची होती की शिक्षणाची अदम्य ओढ असूनही त्यांना या क्रूर व्यवस्थेने शाळा सोडायला लावली, असेच म्हणणे योग्य ठरते. गावकुसाबाहेरील अशा कित्येक प्रतिभा ह्या व्यवस्थेने निर्दयपणे खुडून टाकल्या. पण अण्णा अशी सहज खुडता यावी अशी प्रतिभा नव्हती. त्या प्रतिभेचे पाणी व्यवस्थेला पुरून उरणारे होते. अण्णा भाऊंची शिक्षणाची उमेद परत जागविली त्यांच्या मावस भावाने. मावसभावाकडे ” पांडवप्रताप “, “रामविजय ” या सारख्या असंख्य पुस्तकांचे भांडार पाहून अण्णा हरखले. आपल्या निरक्षरतेचे शल्य त्यांना टोचू लागले. भावाकडून त्यांनी अक्षर ज्ञान मिळविले. मग काय अण्णा नी वाचनाचा चंगच बांधला. रोजची वर्तमानपत्रे , साप्ताहिके , पुस्तके असे मिळेल ते तन्मयतेने वाचले. आणि स्वत:ला प्रयत्नपूर्वक रचले.
अण्णा भाऊंनी आपल्या कुटुंबियांसोबत वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी (१९३२) वाटेगाव ते मुंबई हा दोनशे मैलांचा प्रवास उपाशी पोटाने आणि अनवाणी पायांनी केला. पायी प्रवास करणे ही साधी वाटचाल नव्हती. सरंजामी व जातीय जगण्यातून वाट्यास आलेल्या दमनकारी जगण्यातून भांडवली वर्गीय शोषणावर आधारलेल्या जगाकडे टाकलेले ते पाऊल होते. पण जातीचा जाच या नव्या जगात ही अखेर पर्यन्त त्यांना काचत राहिला. मुंबईला येऊन ते माटुंगा लेबर कॅम्प मध्ये स्थिरावले तिथेच त्यांच्या जीवन दृष्टीला आकार मिळाला. या लेबर कॅम्प मध्येच त्यांची प्रतिभा फुलून आली. त्यावेळी तिथे दोनच राजकीय पक्ष प्रामुख्याने होते. एक म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शेडुल्ड कास्ट फेडरेशन आणि दूसरा कम्युनिस्ट पक्ष. आंबेडकरी चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळ अशा दोन्हीचे पर्यावरण अण्णा भाऊंना लाभले. पण त्यांचा ओढा कम्युनिस्ट चळवळी चळवळीकडे राहिला.
अण्णा भाऊ साठे हे जीवनदानी कम्युनिस्ट होते ही गोष्ट खरी आहे. या कम्युनिस्ट विचारधारेतून त्यांच्या जीवन जाणिवा आणि लेखन प्रेरणा आपसूक प्रभावित झाल्या. साहित्यिक म्हणून मिळणार्या भौतिक आणि लौकिक प्रतिष्ठेला धिक्कारून त्यांनी दलित पददलितांचा कैवार घेतला. त्यांच्या उन्नयनाचा विचार केला. पण असे असले तरी त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या चळवळीशी त्यांनी आपलेपणा सदोदित जपला. काही अभ्यासक म्हणतात की जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर अण्णा भाऊ यांच्या लेखनात आंबेडकरी जाणिवा प्रकट झाल्या. पण खरे पाहू जाता १९४६ साली त्यांनी “देशभक्त घोटाळे” हे जे तिसरे लोकनाट्य लिहिले त्यात, “जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव” हे त्यांचे अत्यंत गाजलेले गीत आढळते. हे केवळ कवण नाही ती अण्णा भाऊंनी समाज बदलाच्या आंबेडकरी प्रवाहाप्रतीची एक अतूट बांधीलकीच होती.
आपली सर्वश्रेष्ठ ‘फकिरा’(१९५९) कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दलित सवर्ण यांच्या संबंधात झालेल्या उलथापालथीला ही आपल्या कथेतून त्यांनी प्रभावीपणे रेखाटले. ‘मेलेली गुरे ओढू नका’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशामुळे दलित सवर्ण यांत उद्भवलेला संघर्ष आणि त्यांची सोडवणूक ‘ सापळा’ या कथेत ज्या विलक्षण सामर्थ्याने आली आहे, त्याला तोड नाही. “उपकारा फेड” ही कथा मळू महार आणि शंकर चांभार यांची कथा जातीव्यवस्थेने शोषितांनाही कसे आपापसात दुभंगून टाकले आहे. याची व्यथित करणारी कहाणी रेखाटली आहे.
हे पण वाचा : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे बाबासाहेबांवर असलेले प्रेम…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत केलेले धर्मांतर ही आधुनिक काळातील एक ऐतिहासिक घटना या घटनेला प्रतिसाद म्हणून आलेली अण्णा भाऊ यांची ‘बुद्धाची शपथ’ ही कथा महत्त्वाची आहे. तर डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणांनंतर झालेल्या निवडुकीसाठी जमा करण्यात येणार्या फंडात आपले सारसर्वस्व असणारा ‘सोन्याचा मणी’ देणारी बना ही स्त्री व्यक्तिरेखा पाहता अण्णा भाऊ साठे यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव अधिक लख्ख होतो. स्वाभिमानी, कर्तबगार, निडर व हक्कासाठी संघर्ष करणारे नायक, कणखर आणि नीतिमान नायिका यातून देखील ही बाब लक्षात येते. वर्ग आणि जात या दोन्ही विरुद्ध अण्णा भाऊ साठे यांची पात्रे उभी राहतात ही अनोखी बाब आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यातील वैश्विक मानवतावादाची मूल्ये समजून घेत नव्या समाजासाठी आसुलेले अण्णा भाऊ साठे यांचे एकूणच साहित्य हा आपला मोठा सांस्कृतिक ठेवा आहे, आणि त्यातून प्रकटणारा परिवर्तनाचा ध्यास हा आपला कायम अभिमान वाटावा असा समृद्ध वारसा आहे. अण्णा भाऊ साठे ही जग बदलू पाहणारी असीम चेतना होती. आणि चेतना कधीच मरत नसते !
-डॉ.राजेंद्र गोणारकर
सहयोगी प्राध्यापक
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड
९८९०६१९२७४