बातम्या

मुसळधार पावसादरम्यान मोहेंजोदडोच्या भूमीत प्राचीन बुद्धाची मूर्ती समोर आली

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली असून मोहेंजो दारोचा इतिहास बदलणारी पुरातत्वशास्त्रीय महत्त्वाची मानली जाणारी प्राचीन धातूची वस्तू समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मोहेंजो दारोच्या डीके परिसरात बुद्धाच्या आकाराची धातूची वस्तू आढळून आली आहे. त्या वस्तूचे काळ आणि वर्ष निश्चित करण्यासाठी तज्ञांची मते मागवली जात आहेत.

मोहेंजो दारोच्या पुरातत्व स्थळाच्या अगदी जवळ असलेल्या धांड गावातील रहिवासी इर्शाद अहमद सोलंगी या खाजगी पर्यटक गाईडने ही प्राचीन वस्तू गुरुवारी उघडकीस आणले आहे. दोन दिवसापूर्वी (3 ऑगस्ट) झालेल्या पावसात नवीन खोदण्यात आलेल्या खंदकात त्यांना ही बुद्धाच्या आकाराची धातूची वस्तू सापडली होती. इर्शाद अहमद सोलंगी यांनी त्वरित साइट ऑफिसर नावेद संगा यांना या नवीन सापडलेल्या धातूच्या वस्तू बद्दल कळवले.

या धातूच्या वस्तूचे परीक्षण केल्यानंतर पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे माजी मुख्य अभियंता आणि सध्या एंडोमेंट फंड ट्रस्ट (EFT) चे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले मोहन लाल यांनी या धातूच्या वस्तूला ‘बुद्ध पेंडंट’ असे म्हटले आहे. त्यांनी या बद्दल मत व्यक्त करताना म्हटले की हे एक अद्वितीय प्राचीन ‘बुद्ध पेंडंट’ असू शकते. “हा दुर्मिळ शोध हरवलेल्या इतिहासाच्या दुवा शोधण्यासाठी पुढील अभ्यास करण्याचे संकेत दाखवतो, असे ते म्हणाले,”

पाकिस्तानी संस्कृती विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने डॉन वृत्तपत्रास सांगितले की, ही धातूची वस्तू लोकांच्या गळ्यात घातलेल्या पेंडेंटसारखी दिसते. या ठिकाणचा हा एक दुर्मिळ शोध असून ते ‘बुद्ध पेंडंट’ कांस्य किंवा इतर धातूचे बनलेले आहे की नाही हे तज्ञांनी अभ्यास केले पाहिजे, त्यासोबत त्याचे ऐतिहासिक किंवा पूर्व-ऐतिहासिक मूल्य देखील तपासू शकतात.

या नवीन शोधामुळे मोहेंजो दारो परिसरातील बौद्ध संस्कृतीचा इतिहास जगापुढे येत आहे.