जगभरातील बुद्ध धम्म

‘आबा सैब चेना’ या बौद्धस्थळावर सापडले स्तूप आणि विहाराचे अवशेष

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक यांनी स्वात खोऱ्यातील “आबा सैब चेना” या बौद्ध स्थळी नुकतेच उत्खनन चालू केले आहे. या स्थळी बौद्ध संस्कृतीचे असंख्य अवशेष सापडले आहेत. तसेच तेथील टेकडीखाली मोठा स्तूप आणि संघारामचे अवशेष दिसून आले.

स्वात खोऱ्यात पूर्वी घनदाट जंगल होते. आबा सैब चेना हे स्थळ देखील जंगलात हरवलेले होते.

पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद खान यांनी याबाबत सांगितले कि या स्थळी पहिल्यांदाच पुरातत्त्व विभागातर्फे शास्त्रशुद्ध उत्खनन होत असून पहिल्याच दिवशी तेथे चार मोठे स्तूप, विहार आणि असंख्य छोटे स्तूप असल्याचे दृष्टीस पडले आहे.

पाकिस्तान KP प्रांतांतील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांची उत्खननाच्या जागी भेट

‘या उत्खननामुळे या प्रांतातील बौद्ध इतिहासाची नवीन माहिती प्राप्त होईल व त्यामुळे या भागात बौद्ध पर्यटनास चालना मिळेल’ असे समद यांनी पुढे सांगितले. येथे प्राप्त झालेल्या काही पुरातन वस्तू या पहिल्या शतकातील असाव्यात. तसेच तेथें नाणी, बुद्ध शिल्पे, भांडी आणि भित्तिलेपचित्रे ( Fresco – ओल्या गिलाव्यावर काढलेले चित्र आणि सुकू दिलेला रंग ) मिळाली आहेत. हे उत्खनन अजून चार महिने चालणार आहे. येथे मिळत असलेले बौद्ध संस्कृतीचे अवशेष पाहता ‘खैबर पख्तूनख्वा’ या क्षेत्राचे पुरातत्वीय महत्त्व अजून अधोरेखित होईल व बौद्ध संस्कृतीच्या इतिहासावर नवा उजेड पडेल.

जॉर्डन देशाचे राजदूत देखील आपल्या परिवारासह ‘तक्त ही बाही’ हे बौद्ध संघाराम बघण्यास आले. बौद्ध संस्कृतीची आवड पाश्चात्य देशात वाढत आहे.

मात्र ही बातमी पाहून अखिल भारतीय दिगंबर जैन वारसा जतन संघटना, नवी दिल्लीचे अध्यक्ष निर्मल कुमार जैन सेठी यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी डॉ.अब्दुल समद खान यांना कळविले आहे की ” सर्व प्राचीन पुरातन स्थळे ही श्रमण संस्कृती म्हणजेच आमच्या जैन धर्मियांची आहेत. परंतु साम्य दिसत असल्यामुळे लोक दुसऱ्या संस्कृतीचे नाव घेतात. तरी मिळालेल्या अवशेषांची काळजीपूर्वक तपासणी करा. अन्यथा दुसऱ्या पुरातत्ववेत्त्यानां आम्ही पाठवू.” पुरावे व स्तूप पाहूनही निर्मल कुमार यांनी लिहिलेले हे पत्र बुद्धिभेद करणारे आहे. पाकिस्तानी पुरातत्ववेत्त्यांना कमी लेखण्याचा उद्योग त्यांनी केल्यामुळे त्यांचीच बालबुद्धी दिसून येते. तरी त्यांचा ईमेल येथे देण्यात येत आहे. जमल्यास त्यांना वाचकांनी उत्तर पाठवावे. digjainmahasabha@gmail.कॉम

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *