इतिहास

१४०० वर्षांपूर्वी नोंद केलेली ही ‘बुद्ध’मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी ‘बुद्ध’मूर्ती असेल

धम्मचक्र टीम: अफगाणिस्तान मधील बामियान शहराजवळ चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. ताज्या इतिहासातील सर्वात मोठे शोकांतिक उदाहरण म्हणजे या विशाल बुद्ध मूर्तींचा नाश करण्याचा प्रकार होय.

१९६३ मध्ये मोठी बुद्धमूर्ति आणि २००८ मध्ये विनाशा नंतर.

या भव्य बुद्ध दोन मूर्ती असलेल्या जवळच्या परिसरात जमिनीखाली ३०० मीटर लांबीची (जवळपास १००० फूट लांब) बुद्धांची झोपलेल्या स्थितीत असलेली मूर्ती असल्याची नोंद ६ व्या शतकात या मार्गावरून गेलेला चिनी बौद्ध भिक्खू ह्युएन-त्सांग याने प्रवासवर्णनात केली होती. त्यामुळे या मूर्तीचा शोध अफगाणिस्तान सरकार घेत आहे. यासाठी पुरातत्व विभाग काम करत आहे. (कदाचित ही मूर्ती सापडली असेल मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे अफगाण सरकार याबाबदल माहिती जगासमोर येऊ देत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे)

सिल्क मार्गावरून व्यापार आणि विचारांची देवाण-घेवाण

बामियान ऐतिहासिकदृष्ट्या रेशीम मार्गा वर स्थित हिंदुकुश पर्वतरांगांच्या बामियानच्या खोऱ्यात वसलेले शहर आहे. येथे अनेक बौद्ध मठ होते आणि यामुळे हे धर्म, तत्वज्ञान आणि कला यांचे समृद्ध केंद्र म्हणून विकसित झाले होते. बौद्ध भिक्खूंचे आसपासच्या लेण्यांमध्ये वास्तव्य होते आणि या लेण्या रंगीत भित्तीचित्रांनी सजवल्या होत्या. या मार्गावरून व्यापार किंवा वस्तूंची देवाणघेवाणच झाली नाही तर विचारांचीही झाली त्यामुळे बौद्ध धर्म रेशीम (सिल्क) मार्गावरून भारताबाहेर पसरू शकला.

अलेक्जेंडर बर्नस द्वारा १८३२ मध्ये बमियानच्या बुद्धांचे चित्रण.

अनेक चिनी बौद्ध यात्रेकरू रेशीम मार्गावरून प्रवास करत भारतातील बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर पोहोचले. यातील काही यात्रेकरूंनी अगदी जशास तसे प्रवासवर्णनांची नोंद ठेवली होती. बौद्ध भिक्खू ह्युएन-त्सांग यापैकी एक चिनी प्रवाशी होता ज्याने प्रवास वर्णन लिहून ठेवले होते. त्यामुळे तिसऱ्या बामियान बुद्धमूर्तीबद्दल आज ही चर्चा होत आहे. तिसरी बामियान बुद्धमूर्ती ही ३०० मीटर लांब (जवळपास १ हजार फूट लांब) झोपलेल्या अवस्थेत असल्याचे वर्णन केले आहे. जर ही मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी बुद्ध मूर्ती असेल.

चिनी बौद्ध भिक्खू ह्युएन-त्सांग

पुरातत्वशास्त्रज्ञांना अवशेष सापडले?

बामियान येथे तालिबान्यांनी दोन विशाल बुद्ध मूर्ती स्फोट करून फोडल्यानंतर सात वर्षानंतर अफगाणच्या पुरातत्व विभागाने तिसऱ्या विशाल बुद्धाचे अवशेष शोधून काढले आहेत.

मुख्य पुरातत्वशास्त्रज्ञ प्राध्यापक झेमेरीली टार्झी यांनी या परिसरात ३०० मीटर लांब महाकाय ‘स्लीपिंग’ बुद्धमूर्ती शोधण्यात अनेक वर्ष घालवले आहेत. कारण चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग यांनी इसवीसन ६३० मध्ये आपल्या प्रवास वर्णनात या परिसरात ही विशाल मूर्ती असल्याचे लिहून ठेवले होते.

मुख्य पुरातत्वशास्त्रज्ञ प्राध्यापक झेमेरीली टार्झी

पुरातत्वशास्त्रज्ञ टार्झी या मूर्तीबद्दल माहिती देताना सांगतात की, ६ व्या शतकात ज्या ठिकाणी बौद्ध मठ होते तेथे मी गेली सात वर्षे उत्खनन करीत आहे, “मला असे वाटते की तिथे अनेक बुद्धमूर्ती असू शकतात, परंतु मी अजूनही ३०० मीटर स्लीपिंग बुद्ध शोधत आहे.”

बामियानच्या विशाल बुद्धमूर्तीचे पुरातत्वशास्त्रज्ञ टार्झी हे जगातील सर्वात जाणकार तज्ञ आहेत. यापूर्वी त्यांनी तीन दशके या क्षेत्राचा अभ्यास केला होता आणि ५५-मीटर आणि ३८-मीटर उभी असलेल्या बुद्धांच्या मूर्तीची दुरुस्ती केली होती.

पुरातत्वशास्त्रज्ञ टार्झी म्हणतात, ३०० मीटर लांबीची बुद्धमूर्ती शोधण्याची आशा मला या शोधकामासाठी प्रेरणा देते. तिसऱ्या विशाल बुद्ध मूर्तीबद्दलची चर्चा नवीन नाही. १९७५ ते १९७६ च्या सुमारास मी अफगाणिस्तानात राहत असताना ३०० मीटर स्लीपिंग बुद्धांच्या अस्तित्वाची शक्यता अभ्यासली होती. पण ते काम संपण्यापूर्वी मी देश सोडला आणि मला अफगाणिस्तानात परत येण्याची अपेक्षा नव्हती. ”

चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग यांनी १४०० वर्षांपूर्वी या परिसराबद्दल प्रवासवर्णनात लिहल्या प्रमाणे दोन उभे बुद्धांचे वर्णन अत्यंत अचूक होते. तसेच या पासून जवळपास असलेल्या जमिनीखाली विशाल झोपलेल्या अवस्थेतील बुद्धाच्या मूर्तीबद्दल ह्युएन-त्सांग यांनी केलेले वर्णन असून सुद्धा ही मूर्ती शोधण्यास मदत मिळाली नाही.

मी सध्या एका विशाल बुद्ध मूर्तीचा शोध घेत आहे, मला वाटते ही मूर्ती सुमारे ३०० मीटर लांबीची असून झोपलेल्या अवस्थेत आहे. (मुळात खूप मोठ्या बुद्ध विहारात आहे) आम्ही योग्य बुद्ध विहार शोधत आहोत आणि उत्खनन चालू आहे.हा लहान परिसर नाही, म्हणून आम्ही एक वर्ष किंवा दोन वर्षातही आपले उत्खनन पूर्ण करू शकलो नाही. आम्ही योग्य मार्गाने उत्खनन करत असून आम्हाला धीर धरायला पाहिजे असे पुरातत्वशास्त्रज्ञ टार्झी म्हणतात.

मुख्य पुरातत्वशास्त्रज्ञ प्राध्यापक झेमेरीली टार्झी आणि त्यांची टीम उत्खनन करताना.

हे बुद्ध विहार बामियानच्या प्राचीन शाही शहराच्या पूर्वेस १.५ किमी अंतरावर आहे. ते विहार माझ्या पुरातत्व टीम शोधून काढत आहेत. तिसऱ्या विशाल बामियान बुद्धांचे वर्णन अचूक आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही इसवीसन ६३२ साली ह्युएन-त्सांगने लिहलेल्या प्रवास वर्णनाचा अभ्यास करीत आहोत.

पुरातत्व कामात कोणताही अपेक्षित निकाल कधीच १०० टक्के हमी देणारा नसतो. पण आम्ही आमचे काम सुरूच ठेवले आहे. जर आपल्याला ती विशाल मूर्ती सापडली तर जगातील सर्वात मोठा बुद्ध पुतळा असेल.

मागील तीन-चार वर्षांत पूर्वेच्या विहाराजवळ टार्झी यांच्या टीमने केलेल्या उत्खननात देखील डझनभर बौद्ध पुतळ्यांची डोके सापडली आहेत. यामुळे टार्झी आणि त्यांच्या टीमला ३०० मीटर लांबीची बुद्धमूर्ती सापडण्याची आशा वाढली आहे.

– धम्मचक्र टीम

8 Replies to “१४०० वर्षांपूर्वी नोंद केलेली ही ‘बुद्ध’मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी ‘बुद्ध’मूर्ती असेल

  1. I see your website dhammachakar.com.. very nice your project in views of future… l love lord buddha… i hope this is very necessary to expand the span of lord buddha’s knowledge and his dhamma….

  2. आपण दिलेली माहिती खुप प्रेरणादायी आहे.
    आसीच माहिती देत रहा त्याचा आम्हाला व बुध्द धम्मीयांना नक्कीच धम्माविशयी माहिती होइल…
    # नमोबुध्दाय #

  3. बुध्द धम्माचे राज्य त्या वेळेचे जम्बू द्विपात आजच्या भारतात जवळ-पास बाराशे (1200)वर्ष राहिले आहे. हा सत्य इतिहास कोणिच सांगत नाही. आजच्या काळात जिथे-जिथे धार्मिक स्थळे आहेत ते मुळ बुध्द स्तुपावर/विहारावर अतिक्रमण करून बांधलेले आहेत. आपन उत्खनन करुन जो सत्य जगासमोर आणत आहात त्याबद्दल बौद्ध समाज आपला आभारी आहे/राहिल. जयभीम-जयबुध्द.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *