पाकिस्तानामध्ये स्वातखोऱ्याच्या उत्तर भागात मोठे बौद्ध विहार तसेच शैक्षणिक केंद्र उत्खननात नुकतेच उघडकीस आले. हे विहार दोन हजार वर्षांपूर्वी कुशाण राजवटीत बांधले गेले असावे असा कयास आहे. त्याकाळी कुशाण राजवटीचा अंमल आताच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताच्या मोठ्या भागात होता.
स्वात खोऱ्यातील हे विहार पूर्वी १९३० मध्ये इटालियन पुरातत्त्ववेत्ता यांनी शोधले होते. परंतु त्यावेळी पूर्ण उत्खनन झाले नव्हते व मोहीम अर्धवट राहिली होती. आता ९० वर्षांनी पाकिस्तानी पुरातत्त्व खात्याने या क्षेत्रावर पुन्हा उत्खनन पुन्हा चालू केले, तेव्हा भव्य स्तूप, विहार, साधना कक्ष आणि भिक्खुंसाठी असलेली निवासस्थाने यांचे अवशेष प्राप्त झाले. या विहाराची भव्यता लक्षात घेता इथे मोठे बौद्ध शैक्षणिक केंद्र असावे असे पुरातत्व अधिकारी साकिब रझा यांनी सांगितले. तसेच या विहारात मोठा बैठकीचा कक्ष आढळून आला आहे. यामुळे येथे पुर्वी चर्चासत्रे व ज्ञानार्जनाची कामे होत असावीत.
मुख्य म्हणजे इथे भित्तीलेपचित्रे देखील आढळली आहेत. या अगोदर ती आबा -सैब-चेन या प्राचीनस्थळी मिळाली होती. यातील सहा भित्तीलेपचित्रे अगदी उत्तम अवस्थेत आहेत. फ्रेस्को पेंटिंग स्वात खोऱ्यात पहिल्यांदाच आढळली असल्याने इटालियन पुरातत्ववेत्ते प्रो. लूका एम ऑलिव्हेरी यांनी सांगितले की यामुळे बौद्ध इतिहासाची अनेक नवी दालने स्वातखोऱ्यात उघडकीस आली आहेत.
स्वातखोरे आणि गंधारा कलाकृतीचा विकास यांचे अतूट नाते यामुळे अधोरेखित झाले आहे. सदर स्तूपाच्या उत्खननाची दृश्यफीत सर्वांच्या माहितीसाठी येथे देत आहे. त्यावरून स्तूपाची भव्यता आणि बौद्ध धम्माचा विखुरलेला स्वातखोऱ्यातील खजिना यांचे दर्शन होईल.
दृश्यफीत लिंक – https://gandhara.rferl.org/a/31084195.html
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)