इतिहास

अरियालुर – प्राचीन बौद्ध संस्कृतीचे तामिळनाडूतील केंद्र

तामिळनाडूत अरीयालूर जिल्ह्यात सुद्धा असंख्य बुद्धमूर्ती आणि शिल्पे प्राप्त झाली आहेत. प्राचीन काळी हे एक मोठे बौद्ध संस्कृतीचे धार्मिक केंद्र असावे. येथील ‘विक्कीरामंगलम’ या गावात अप्रतिम बुद्धमूर्ती आहेत. मात्र त्याचे महत्व गावकऱ्यांना माहीत नसल्याने या मूर्ती रस्त्याच्या कडेला नाल्याच्या बाजूस पिंपळवृक्षाखाली दुर्लक्षित अवस्थेत आहेत.

तेथे बुद्धांच्या दोन शिल्पमूर्ती असून एक ५ फूट व दुसरी ३ फुटाची आहे. एका मूर्तीची शिरावरील उश्नीशा तुटलेली दिसते. या मूर्ती १२ व १३ व्या शतकातील असाव्यात. या मूर्तींना संग्रहालयात ठेवण्यासाठी पुरातत्व खात्याने हालचाली केल्या होत्या परंतु तेथील अडाणी गावकऱ्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे या मुर्ती तेथेच पडून आहेत. तेथील चौथरा व त्यांच्या सभोवताली असलेले कुंपणसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे.

हे पण वाचा : तामिळनाडूतील पेरंबलूर – बौद्ध संस्कृतीचे केंद्र

“अरियालूर” नावाचा तामिळ भाषेतील अर्थ अध्ययनाची जागा ( The Place of Learning ) असा होतो. यावरून तेथे प्राचीन काळी मोठे बौद्ध शैक्षणिक केंद्र असावे असे दिसते. बौद्ध संघासाठी तेथील जुन्या तामिळी बौद्ध साहित्यात “अरिवार” असा शब्द आढळतो. याचाच अर्थ People of Wisdom असा होतो.

जयनकोंडम गावातील बुद्धमूर्ती

अरियालूर येथे अनेक बौद्ध शिल्पे आढळतात. सध्या तेथे पाषाणातील आठ मोठ्या बुद्धमूर्त्या प्राप्त झाल्या आहेत. अकराव्या शतकातील महायान पंथाची बोधिसत्वाची मूर्तीसुद्धा मिळाली आहे. आश्चर्य म्हणजे अरियालूर जिल्ह्यातील “गंगाईकोंडा चोलापुरंम” हे ठिकाण इ.स. १०२५ मधील चोला राजवटीची राजधानी असावी असे अलीकडे झालेल्या उत्खननातून उजेडात आले आहे. येथील संग्रहालयात बौद्ध संस्कृतीचे अवशेष दिसून येतात.

सुथमल्ली गावातील ही बुद्धमूर्ती चेन्नई म्युझिअममध्ये आहे. किलकोलाथूर गावातील बुद्धमूर्ती गंगाईकोंडा चोलापूरम म्युझिअममध्ये आहे.

अरियालूर जिल्ह्यातील “जयनकोंडम” येथील बुद्धमूर्ती सुद्धा एक अद्वितीय शिल्प आहे. मूर्तीच्या शिरेमागे आभा आहे. तसेच शिरावर बोधिछत्र दाखविण्यात आले आहे. ११ व्या शतकातील राजेंद्र चोला -१ यांच्या राजवटीतील ही मूर्ती आहे. या मूर्तीची उंची ५ फूट असून ती तेथील तालुका कार्यालयाच्या जवळ असलेल्या तलावाजवळ आहे. व ASI च्या देखरेखीखाली आहे. जवळच असलेल्या सुथामल्ली गावात मिळालेली बुद्धमूर्ती सुद्धा सुंदर आहे. ती सध्या चेन्नई संग्रहालयात ठेवलेली आहे. थोडक्यात या भारताची दडविलेली मूळ संस्कृती उजेडात येत चालली आहे.

हे पण वाचा : तामिळनाडूतील नागपट्टिनम – एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.
https://www.wayofbodhi.org/buddhism-in-ariyalur/

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)