बातम्या

भीमा कोरेगावच्या लढाईवर हिंदी चित्रपट बनणार; अर्जुन रामपाल महार योद्धा होणार?

१ जानेवारी १८१८ साली महार सैनिक आणि पेशव्यांमध्ये झालेल्या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईवर लवकरच हिंदी चित्रपट येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपट बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अर्जुन रामपाल हा महार योद्धाची भूमिका साकारणार आहे.

ऑनलाईन माध्यमांच्या वृत्तानुसार या चित्रपटाचे नाव ‘द बैटल ऑफ भीमा कोरेगांव’ असे आहे. हा चित्रपट ब्रिटिश महार सैनिक आणि पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यात झालेल्या भीमा कोरेगाव युद्धावर आधारित असेल.

चित्रपटात अर्जुन रामपाल हा महार समुदायाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. इतिहासात नोंदवलेली ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती, त्यावेळी 28 हजार पेशव्यांच्या सैन्याचा ब्रिटिशांकडून लढलेल्या ८०० महार सैनिकांनी पराभव केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशु त्रिखा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील बौद्ध म्हणजेच पूर्वीचा महार समाज भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये विजयी झालेल्या महार योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण म्हणून विजय दिवस साजरा करतो. दलित समाजासाठी ही घटना पेशव्यांनी केलेल्या जातीय दडपशाही आणि त्यांच्यावरील अन्याय यावर विजय दर्शविणारी आहे.

याप्रसंगी भीमा कोरेगाव येथे बौद्ध आणि दलित समाजातील लोक या लढाईत शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमतात. आता या ऐतिहासिक घटनेवर तयार होणाऱ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल किती न्याय देऊ शकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.