ब्लॉग

पीपल्स एज्युकेशन सोसायटी : स्वातंत्र्य, बंधुभाव रुजविण्याचे कार्य

‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’, मुंबई या संस्थेची स्थापना ८ जुलै १९४५ रोजी केली. देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्चशिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. याच ध्येयानुसार मुंबईत १९४६ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला सांगायला आनंद वाटतो, की अवघ्या चार वर्षांच्या अवधीत विद्यार्थ्यांची संख्या, देशी-विदेशी खेळ आणि शैक्षणिक दर्जा या सर्वच बाबतींत सिद्धार्थ महाविद्यालयाने मुंबई राज्यात महत्त्वाचे स्थान पटकाविले आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाने सकाळचे वर्ग सुरू केल्यामुळे विविध कार्यालयीन सेवेतील विद्यार्थ्यांना नोकरी करीत उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध झाली. काही वर्षांतच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वृद्धी झाली.

पुढे केंद्र शासनाच्या शैक्षणिक कर्जातून खरेदी केलेल्या दोन जपानी इमारती ‘बुद्धभवन’ व ‘आनंदभवन’ यामुळे महाविद्यालयाचा विस्तार होऊ शकला. यावेळी ए. बी. गजेंद्रगडकर हे पहिले प्राचार्य होते.

१९ जून १९५० रोजी मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. मिलिंद महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाडके ‘अपत्य’. या महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १ सप्टेंबर १९५१ रोजी बसविण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्‍य आणि गोरगरीब समाजात करीत असलेल्या शिक्षणप्रसार-प्रचार कार्याबद्दल गौरवोद्गार काढून कौतुक केले.

डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना विद्या, विनय आणि शील बनविणे हेच मिलिंद महाविद्यालयाचे ध्येय आहे, असे सांगितले. जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळ लेणी या दोन्हींमध्ये औरंगाबाद शहर वसलेले आहे. शहराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या पर्वतांच्या रांगा येथील शुद्ध हवा, आल्हाददायक वातावरण या सर्व गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेबांना हे शहर फारच आवडत असे. म्हणून या ठिकाणी जनजागृतीचे केंद्र मिलिंद महाविद्यालय स्थापन केले.

पुढे १९५३ मध्ये सोसायटीने सिद्धार्थ आणि वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाला पुढे वृत्तपत्र विद्याशाखा जोडली. १९५६ मध्ये सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा उत्कर्ष, विस्तार व लौकिकाचे प्रमुख कारण म्हणजे घटनेत निश्चित केलेल्या उद्दिष्ट व धोरणाची प्रामाणिक अंमलबजावणी केल्यामुळे होऊ शकला. १९५७ पासून अध्यक्ष झालेले न्यायमूर्ती आर. आर. भोळे यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल. त्यांनी जवळपास १५ वर्षे संस्थेच्या कार्याची धुरा यशस्वीरीत्या सांभाळून संस्थेला प्रगतिपथावर आणले. त्यानंतर श्री. डी. जी. जाधव, सी. एन. मोहिते, जी. टी. परमार आणि के. बी. तळवटकर या बाबासाहेबांच्या विश्वासातील प्रथम संचालक मंडळातील संस्थेच्या सदस्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार उल्लेखनीयरीत्या सांभाळला आहे.

१९२७ च्या ऐतिहासिक मानवमुक्तीचा महाड तलावाच्या पाण्यासाठी केलेला सत्याग्रह त्यांच्या स्मृती आगामी पिढ्यांना मार्गदर्शक ठराव्यात म्हणून ८ मार्च १९५८ मध्ये मनुस्मृती समिती गठित करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त न्यायमूर्ती आर. आर. भोळे व इतर सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक महाविद्यालय स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेतला. मुंबई व महाड येथील कार्यकर्त्यांनी दान-देणग्या जमा करून महाविद्यालयाची इमारत केवळ दीड महिन्यात उभी केली. २२ जुलै १९६१ मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक स्मृती तेवत ठेवण्यासाठी बोधिसत्त्व आंबेडकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. रा. भि. जोशी हे होते. त्याचबरोबर बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुण्यातील येरवडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे १९९१ ला सुरू करण्यात आले.

डॉ. एस. पी. गायकवाड हे १९७९ ला संचालक मंडळात सदस्य म्हणून काम पाहत होते. न्यायमूर्ती आर. आर. भोळे यांच्यानंतर संस्थेची धुरा महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्याकडे आली. ते चार वेळा अध्यक्षपदी विराजमान झाले. १९८४ ते १९८६ व १९९४ ते १९९६ या काळात औरंगाबादच्या नागसेनवनात पी.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक व बीपीएड महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्य श्रेय डॉ. एस. पी. गायकवाड यांना जाते.

आजपर्यंत डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज, मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल (१९५४), रमाबाई आंबेडकर हायस्कूल, अजिंठा मुलांचे वसतिगृह, सुमेध वसतिगृह, रामजी सुभेदार रंगमंदिर, प्रज्ञा मुलींचे वसतिगृह, नालंदा, तक्षशिला, वल्लभी अशा विद्याशाखांनी एकशे पासष्ट एकरचा भूभाग ज्ञानदानाचे कार्य करीत आहे; तसेच नांदेड येथील नागसेन हायस्कूल संस्थेच्या मान्यतेने १९८१ मध्ये स्थापन केली. आता तेथे शाळेची भव्य इमारत उभी राहिलेली आहे. २००७ ते २००९ या काळात संस्थेचे अध्यक्षपद कर्नाटक राज्याचे अर्थमंत्री के. एच. रंगनाथन यांनी भूषविले. त्यांनी आपल्या कार्यकाळात म्हैसूरच्या महाराजांनी १९५५ मध्ये पी.ई.एस.ला बंगळूरमधील रमण विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्थेच्या मधोमध असलेल्या पाच एकर भूखंडावर नागसेन इंग्लिश हायस्कूल आणि डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बुद्धिस्ट सेमिनरीची इमारत उभारून महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्याच्या राजधानीत पुनरुज्जीवित बुद्धधम्माचे कार्य आरंभिले.

पी.ई.एस.चे सदस्य, बौद्ध धम्माचे एक विद्वान एम. एस. मोरे हे दोन वेळा सोसायटीच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात बुद्धगया या जागतिक श्रद्धास्थानाच्या परिसरात बुद्धगया येथे महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालय सुरू करून बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत बुद्धधम्म पुनरुज्जीवन चळवळीचा धम्मध्वज सिद्धार्थ गौतमाच्या जन्मभूमीपर्यंत पोचविण्यात डॉ. एस. पी. गायकवाड यांचाही सिंहाचा वाटा आहे.

बुद्धगया येथे डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्यावरील निष्ठेने बुद्धगया येथील महंतांकडून पी.ई.एस. मुंबईस शाळा, महाविद्यालयाच्या शाखा काढून शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी १ एकर २० गुंठे जमीन उदार अंतःकरणाने दान देण्यात आली आहे. बीजकिशोर एकबाल चौबे यांचे या कामातील प्रयत्न अनमोल आहेत.

८ मे २०१७ मध्ये एम. एस. मोरे यांच्या आकस्मिक निधनानंतर मा. एस. पी. गायकवाड हे आजपर्यंत चौथ्यांदा सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. मिलिंद महाविद्यालय हे केवळ ज्ञान देणारे महाविद्यालय नाही तर ते एक संस्कार केंद्र आहे. यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. याशिवाय भविष्यामध्ये महाविद्यालयाजवळच लायब्ररीची इमारत उभी राहावी. पाणचक्कीजवळ एखादे छोटेसे आम्रवन तयार करण्याची त्यांची कल्पना होती. नागसेनवनात सुंदर बुद्धविहार, देशी-विदेशी प्रवाशांची सोय व्हावी म्हणून गेस्ट हाऊस, अनाथाश्रम गरीब आणि परित्यक्ता किंवा कुमारी मातांनी टाकलेली मुले, मिलिंद महाविद्यालय इमारतीच्या मध्यभागी उंच असा एक टॉवर बांधावा व त्यावर एक मोठे घड्याळ बसवावे. या सबंध बाबींवर चिंतन होण्याची गरज यानिमित्ताने व्हावी, असे मला वाटते. उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

डॉ. प्रा. भदंत एस. सत्यपाल
(दै.सकाळ 2020 मध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे.. )

Photo Art : Siddhesh Gautam