इतिहास

नालंदा विद्यापीठाचा अध्यापक आर्यभट

‘नालंदा’ या जगप्रसिद्ध विद्यालयाची स्थापना आणि भरभराट गुप्तकाळात झाली. गुप्त सम्राटांनी त्याकाळी ‘नालंदा’ विद्यापीठाला भरभरून अर्थसहाय्य केले. ‘नालंदा’ हे प्रामुख्याने बौद्ध धम्माच्या शिक्षणाचे केंद्र होते. त्याचबरोबर तेथे इतरही विषयांचे शिक्षण दिले जात होते.

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आर्यभट याचा जन्म इसवी सन ४७६ मध्ये इथेच झाला. त्याचे सर्व शिक्षण हे पाटलीपुत्रा पासून जवळ असलेल्या नालंदा विद्यापीठात झाले. अध्ययन पूर्ण झाल्यावर तेथे त्याने ‘आर्यभटीय’ हा खगोलशास्त्राचा ग्रंथ लिहिला. भारताच्या गुप्त राजवटीत उत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. अत्यंत अचूक खगोलीय स्थिरांक हे या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य आहे. तसेच या ग्रंथांमध्ये १२१ सूत्रे दिली असून त्यामध्ये खगोलशास्त्राची माहिती एकत्रित केलेली आहे.

भारतीय व पाश्चात्य विद्वानांनी कबूल केले आहे की हा आर्यभट नालंदा विद्यापीठातील खगोलशास्त्र शाखेचा प्रमुख होता. कारण त्याच्या गाथेमध्ये कुलुप हा शब्द आढळतो आणि तो कुलपती असल्याचे दर्शवितो. अशा या आर्यभटाची अनेक पाश्चात्त्य तसेच भारतीय विद्वानांनी प्रशंसा केली आहे. नालंदा विद्यापीठात बुद्धांच्या शिकवणुकी बरोबर संस्कृत व इतर विषयांचे सुद्धा अध्ययन होत होते. आणि आर्यभट त्या सर्वात पारंगत होता हे अनेकांना ज्ञात नाही.

त्यावेळी नालंदा विद्यापीठाची कीर्ती चहू दिशेला पसरली होती. तिथला अभ्यासक्रम हा महायानापूरता मर्यादित नव्हता. हा अभ्यासक्रम बौद्ध, ब्राह्मणी, धार्मिक, व्यावहारिक, तत्वज्ञान आणि उपयुक्त शास्त्र आणि कला अशा वेगवेगळ्या शाखांतून तयार केला होता. सर्व धर्मांच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळे. बौद्ध आणि ब्राह्मणांच्या अनेक ग्रंथांचा इथे अभ्यास केला जाई. तसेच विविध विषय शिकवले जात होते. त्यात आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित, व्यवस्थापन, चिकित्साविद्या, तर्कशास्त्र, शिल्पकला, अध्यात्म विद्या असे अनेक विषय होते.

महायान तसेच स्तविरवादाच्या १८ पंथातील ग्रंथाचा सुद्धा तिथे विद्यार्थी अभ्यास करत असत. येथील प्रवेश परीक्षा अत्यंत कडक होती. येथे विद्यार्थी तिबेट, कोरिया, मध्य आशिया, चीन अशा अनेक देशातून शिकण्यासाठी येत असत. नालंदा विद्यापीठातील शीलभद्र, धर्मपाल, चंद्रपाल वगैरे आचार्य आणि कुलपती आपल्या विद्वत्तेने विख्यात होते.

येथील निवासी विश्वविद्यालयातील रत्नसागर, रतनोदधी आणि रत्नरंजक अशा तीन भव्य इमारतीत ग्रंथांचा प्रचंड साठा होता. त्याकाळात साऱ्या जगात एवढे विशाल ग्रंथालय कुठेही नव्हते. अशा या नालंदा विद्यापीठात वेधशाळा सुद्धा होती. आणि अशा संपन्न नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी आर्यभट हा तेथेच विभाग प्रमुख म्हणून होता ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. समुद्रगुप्त,विक्रमादित्य, कुमारगुप्त, स्कंदगुप्त, आणि बुद्धगुप्त अशा गुप्त राजांच्या राजवटीमध्येच भारताच्या बुद्धिमत्तेने उत्कर्षबिंदू गाठला होता. आणि म्हणूनच नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व ज्ञानीजनांस माझे वंदन.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – इतिहास अभ्यासक)

One Reply to “नालंदा विद्यापीठाचा अध्यापक आर्यभट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *