इलाहाबाद ( मागील वर्षी नाव बदलून प्राचीन नाव ‘प्रयागराज’ ठेवले ) येथे ३ ऱ्या शतकातील एक अशोकस्तंभ आहे. या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक राजाचे धम्मलिपीत केलेले लिखाण त्यावरती आहे. त्याच्याखाली गुप्त राजवटीतील व समुद्रगुप्त राजवटीत झालेले लिखाण तेथे आढळते. त्यानंतर १५ व्या शतकात जहांगीरच्या काळात अशोक लेखातील काही ओळी नष्ट करून त्यावर केलेले लिखाण आढळते.
हा अशोकस्तंभ एकसंघ वालुकामय दगडातील असून पॉलिश केलेला आहे. त्याचा खालील व्यास ०.९ मी. असून वरील व्यास ०.७ मी. आहे. वरच्या भागात स्पष्ट कमळचक्र असून त्यावरील भाग मात्र गायब आहे. सर कॅंनिंगहॅम यांनी म्हटले आहे की त्यावर फक्त एका सिहांची प्रतिकृती असावी. काही इतिहासकारांनी म्हटले आहे की हा मुळस्तंभ प्रयाग पासून ५० कि. मी.असलेल्या कौशंबी येथे होता. कारण या स्तंभावर कौशिंबिचा अस्पष्ट उल्लेख आहे.
मुस्लीम राजवटीमध्ये हा स्तंभ इलाहाबादला हलविण्यात आला. व गंगा-जमुना संगमावरील इलाहाबाद किल्ल्यात प्रवेशद्वाराजवळ त्याची पुनर्स्थापना केली. १७९८ मध्ये जनरल कीड याने हा स्तंभ उखडून काढला. १८३८ मध्ये कॅप्टन स्मिथने हा स्तंभ सिहांची प्रतिकृती लावून परत उभारला. अशा तर्हेने १३ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अनेकवेळा या स्तंभाची स्थित्यंतरे झाली.
१९३५ मध्ये कृष्णास्वामी आणि घोष यांनी हा स्तंभ मूळचा इलाहाबाद इथलाच असल्याची थियरी मांडली. १९७९ मध्ये जॉन इरविन यांनीसुद्धा ही थियरी योग्य असल्याचे प्रतिपादन केले, कारण त्यावर माघमेळ्याचा ( म्हणजेच माघ पौर्णिमेला संगमावर स्नान करण्याचा किंवा कुंभमेळ्याचा किंवा दीड हजार वर्षांपूर्वीच्या संगमावर भरत असलेल्या बौद्ध महामोक्ष परिषदेचा ) उल्लेख आहे असे त्यांचे म्हणणेआहे. जेम्स प्रिन्सेप यांनी या अस्पष्ट झालेल्या लिपीचे वाचन १८३४ मध्ये केले.
या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा विविध कालावधीतील लेख यावर आहेत. स्तंभ अनेकदा लोखंडी साखळ्या, दोरखंड यांनी हलविल्यामुळे त्यावरील लिपी आता अस्पष्ट झाली आहे. सम्राट अशोकाच्या दोन धम्मलेखानंतर कारुवाकी राणीची धम्मकार्ये लिपीबद्ध आहेत. त्यानंतर समुद्रगुप्त राजाच्या लेखा नंतर सन १६३२ मध्ये बिरबलाने संगमावर माघ स्नान केल्याचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर जहांगीर मुघल राजाच्या काळात मीर अब्दुल्ला कलाम याने सम्राट अशोकाचे लेखातील काही ओळी नष्ट करून पर्शियन भाषेत अकबराची वंशावळ लिहिली आहे.
सद्यस्थितीत हा अशोकस्तंभ प्रयाग किल्ल्यात असून तो भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात असल्याने पाहता येत नाही. सुदैवाने स्तंभ अजून एकसंघ आहे याचे समाधान आहे.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)