इतिहास

जेव्हा दिल्लीचा सुलतान अशोक स्तंभाच्या प्रेमात पडतो…

भारताच्या इतिहासात अनेक वेगवेगळे किस्से आपल्याला वाचायला मिळतात. असाच एक किस्सा फिरोज शहा तुघलक (१३०९ – १३८८) आणि अशोक स्तंभाच्या बाबतीत आहे. फिरोजशहाला फेरफटका मारताना एक सोनेरी स्तंभ नजरेस पडतो. स्तंभाचे आकर्षण आणि त्यावर लिहिलेले लेख पाहून इतके प्रेमात पडतो की त्या स्तंभावरील लेख समजून घेण्यासाठी केलेली धडपड, मोठ्या मेहनतीने भव्य स्तंभ दिल्लीला घेऊन जाणे आणि आपल्या किल्यावर उभा करणे. विशेष म्हणजे एवढा खटाटोप करूनही शेवटपर्यंत त्याला या स्तंभाचे गूढ काही कळलेच नाही…शेवटी इंग्रज आल्यानंतरच स्तंभाचे गूढ बाहेर आले. तो अशोक स्तंभ आजही फिरोज शहाच्या किल्ल्यावर दिमाखात उभा आहे.

फिरोज शहा तुघलक कोण होता?

फिरोजशाह कोटला म्हंटलं की बहुतेक लोकांना आठवतं क्रिकेटचं मैदान! अनिल कुंबळेनी दहा विकेट टिपण्याचा पराक्रम ज्या मैदानात केला तेच! आता त्या क्रिकेट मैदानाचे (स्टेडियम) नाव अरुण जेटली ठेवण्यात आलं आहे. त्या मैदानाच्या अगदी बाजूलाच एक ऐतिहासिक स्थळ आहे. ते म्हणजे फिरोजशाह कोटला नावाचा किल्ला. खरंतर या मैदानाला फिरोजशहा कोटला हे नाव मिळण्याचं कारण म्हणजे दिल्लीचे तख्त तुघलक वंशाचे तिसरे शासक फिरोज शाह तुघलक होय.

फिरोज शहा तुघलकला इतिहासकारांनी धर्मांध आणि असहिष्णू शासक म्हटले आहे. दिल्लीचे तख्त तुघलक वंशाचे तिसरे शासक फिरोज शाह तुघलक याने ३७ वर्ष चालवले. फिरोज शहा देशभरात ३०० शहरांची स्थापन केली होती. त्याला कट्टर मुस्लिम शासक मानले जायचे, ज्याने इस्लाम स्वीकार न केल्याबद्दल जजिया कर लावला होता. फिरोजशाहने भारताच्या अनेक भागात राज्य केले. त्याच्या शासनकाळात दिल्लीत चांदीचे शिक्के चलनात होते. फिरोजशहा तुघलक याने १३६० मध्ये ओडिशावर हल्ला केला. तेथील शासक भानुदेव तृतीय होते. त्यांना हरवून त्याने जगन्नाथपुरी मंदिर उद्ध्वस्त केले होते.

फिरोजशहाला बांधकामे करण्याचा छंद तर होताच शिवाय जुनी बांधकामे जतन करण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याचं महत्त्वही त्याला पटलेलं होतं. कुतुब मिनार, हौज खास, अल्लाउद्दीन खिलजी आणि शमसुद्दीन इल्तमशच्या कबरी या बांधकामांची डागडुजी त्याने केल्याच्या नोंदी आहेत. भारतातील सर्वात जुना मकबरा म्हणजे महिपालपूरचा सुलतान गढीचा मकबरा…त्याचीही दुरुस्ती फिरोजशहाने केली होती.

बशीरउद्दीन अहमदच्या नोंदीप्रमाणे आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत फिरोजशाह तुघलकाने ४० मशिदी, ३० मदरसे, २० खानका (बहुतेक अन्नछत्रे), २०० सराई, ३० गावे, १०० तलाव, ४० धरणे, १०० राजवाडे, १५० पूल आणि अनेक बगीचे बांधले. (The Forgotten Cities of Delhi – Rana Safvi (p.124) यमुना नदीकाठी गाविन नावाच्या गावाजवळ फिरोजशहाने १३५४ च्या सुमारास फिरोजाबाद शहर बांधायला घेतले. तत्कालीन पद्धतीप्रमाणे हे बांधकाम करण्यासाठी सिरी, जहाँपनाह, किला राय पिथौरा शहरांतील बांधकामे पाडून सामग्री गोळा करण्यात आली.

अशोक स्तंभांकडे पाहून फिरोज शहा आश्चर्यमुग्ध

सुलताना फिरोज शहाला दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात फेरफटका मारण्यासाठी जाण्याची सवय होती. अशाच भ्रमंती मध्ये त्याला टोप्रा येथे सोनेरी स्तंभ दिसले. या स्तंभांकडे पाहून सुलतान आश्चर्यमुग्ध झाला. स्तंभ चकचकीत चमकदार सोन्यासारखा लखलखीत होता. विशेष म्हणजे या स्तंभावर काहीतरी लिहिलेले होते. ते कोणत्या भाषेत होते हे कोणालाच कळेना…फिरोजशहाला स्तंभांवरील लेख समजून घेण्याची उत्सुकता लागली होती.

या स्तंभांचे महत्व काय होते हे समजून घ्यायचा प्रयत्न त्याने केला. यासाठी काही पंडितांना बोलावून घेतले. पंडितांनी टोप्रा येथील स्तंभ पाच पांडवांमधील सर्वात शक्तिमान असलेल्या ‘भीमा’ची काठी असून भीमाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे खांब उभे करून ठेवले असल्याचे सांगितले. मात्र या गोष्टतीत फिरोजशहाला काही तथ्य वाटले नाही पण स्तंभाचे कौतुक वाटून फिरोझशाहने ते स्तंभ दिल्ली मध्ये त्यांच्या राजधानीच्या शहरी हलवायचे ठरविले.

टोप्रा गाव दिल्लीहून ९० कोस दूर होते. तेथून स्तंभ हलविण्यासाठी आवश्यक ती सामग्री गोळा करण्याचे आदेश गावकऱ्यांना देण्यात आले. सावरीच्या कापसाचे गठ्ठे मागवले. स्तंभाला धक्के पोहोचू नये म्हणून त्याच्या सर्व बाजूंनी कापूस गुंडाळला. स्तंभ पायातून उखडल्यावर, उपटल्यावर एकदम पडू नये म्हणून आधीच योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. स्तंभाच्या पायात विशाल चौकोनी शिळा सापडली. तीही खणून काढण्यात आली. त्यानंतर स्तंभाच्या सर्व बाजूंनी वेत व जनावरांची कातडी गुंडाळण्यात आली.

हजारो माणसांनी मोठया दोऱ्यांच्या साहाय्याने स्तंभ खेचून तो ४२ चाकांच्या गाडयावर चढविला. ८,४०० माणसांनी तो गाडा खेचून यमुनेच्या तीरावर आणला. यमुनेच्या पात्रात विशाल नौकांचा ताफा तयार होता. त्यावर चढवून स्तंभ फिरोजाबादला आणला. स्तंभ त्या ठिकाणी उभारण्यासाठी पुष्कळ मेहनत घ्यावी लागली. मजबूत दोऱ्यांनी स्तंभशीर्ष बांधून तो हजारो माणसांनी जमिनीच्या अर्धा गज वर उचलला. मग त्याखाली ओंडके व कापसाचे गठ्ठे सरकविले. अशा प्रकारे स्तंभ थोडा थोडा वर उचलत त्याखाली आधार सरकवत उभा केला गेला. त्यानंतर तो उभ्या स्थितीत पक्का राहावा, म्हणून त्याच्या भोवती मजबूत लाकडी पराती बांधल्या गेल्या. दगड व चुना वापरून स्तंभाचा पाया मजबूत करण्यात आला. त्या स्तंभाला एक नवीन धार्मिक ओळख ‘मिनार’ म्हणून मिळाली.

सोनेरी स्तंभाची उभारणी करतानाचा साक्षीदार बारा वर्षे वयाचा शम्स-इ-सिराज-अफीफ हा होता. तो सुलतान फिरोजशहाचे जीवनचरित्र लिहिले. त्यात फिरोजशहाने स्वतःच्या देखरेखीखाली पार पडलेल्या स्तंभाच्या वाहतुकीचा व पुनर्स्थापनेचा ‘आँखो देखा हाल’ लिहून ठेवला आहे. ही जड व मोठया आकाराचे अनेक स्तंभ सम्राट अशोकाच्या काळी दूर दूर अंतरावर कसे वाहून नेले असतील व उभारले असतील? याविषयी नक्कीच आश्चर्य वाटेल.

फिरोजशहाला दोन्ही स्तंभावरील शिलालेख पाहून अत्यंत कुतूहल वाटत होते. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. देशभरातील अनेक विद्वान पंडितांना बोलवून हे शिलालेख वाचण्यास सांगितले परंतु कोणालाच या स्तंभावर काय लिहिले आहे किंवा या निर्मितीचे मूळ कोण आहे हे सुद्धा माहिती नव्हते. मात्र सोनेरी रंगाच्या स्तंभाचे फिरोझशाहच्या जीवनात व कल्पनाविश्वात खूप मोठे स्थान होते. पण हे स्तंभ म्हणजे नेमके काय? याचे उत्तर न मिळाल्यामुळे स्वर्गातून देवदूतांनी पाठवलेले असावेत असा समज फिरोजशहाला झाला होता. तो तासनतास या स्तंभावरील शिलालेख पाहत थांबायचा. त्याच्यासाठी हा सोनेरी स्तंभ शेवटपर्यंत आकर्षण होते.

इ.स. १८३७ पर्यंत अशोकाच्या लेखांविषयी भारतात कोणालाही विशेष माहिती नव्हती. कारण लेखांसाठी वापरलेली ब्राह्मी (धम्मलिपी) किंवा खारोष्टी लिपी लोक विसरले होते. पाश्चात्त्य विद्वान जेम्स प्रिन्सेप यांनी ग्रीक व खरोष्टी या दोन्ही लिपीत मजकूर असलेल्या प्राचीन नाण्यांच्या साहाय्याने प्राचीन भारतीय लिपीचे वाचन केले. त्यानंतरच म्हणजे जवळपास ४५० वर्षांनंतर फिरोजशहाच्या किल्यावर स्थापित केलेल्या सोनेरी स्तंभाचे कोडे उलगडले.

इंग्रजांनी केलेल्या उत्खननात संपूर्ण भारतासोबतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये शेकडो ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख, अवशेष आणि स्तंभ सापडले. फिरोजशहाला सापडलेला सोनेरी स्तंभ दुसरे तिसरे काही नसून भारताचा महान सम्राट अशोकाचा स्तंभ असल्याचे समोर आले. इंग्रजांनी भारताचा प्राचीन इतिहासाचा शोध लावला नसता तर आजही त्या अशोक स्तंभाला ‘भीमाची लाटी’ म्हटले गेले असते. आजही उभे असलेले अशोक स्तंभ महान सम्राट अशोकाच्या महानतेचे पुरावे देतात.

-जयपाल गायकवाड, नांदेड