ब्लॉग

अशोक – भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

चार्ल्स एलेन हे ब्रिटिश लेखक आणि नावाजलेले इतिहासकार होते. यांच्या घराण्यातील पूर्वजांनी ब्रिटिशकालीन भारतात नोकरी केली होती. यांचे बरेचसे लिखाण हे भारत आणि आशिया खंडातील देशांबाबत आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेल्या प्रिपहवा स्तूपाच्या उत्खननाचा त्यांनी पुन्हा आढावा घेतला होता. कारण त्यावेळी संशयाचा धुरळा जाणीपूर्वक उडविण्यात आला होता. त्यामुळे तेथे सापडलेले अस्थिकलश हे शाक्यमुनी बुध्दांचेच होते हे संशोधन करून त्यांनी ठामपणे मांडले.

फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांचे ‘Ashoka : the Search for Indias Lost Emperor’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याचा मराठी अनुवाद डॉ. धनंजय चव्हाण यांनी केला. सदर पुस्तक ‘अशोक : भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध’ या नावाद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झाले. नुकतेच हे पुस्तक हाती पडले तेव्हा सर्व कामे बाजूला ठेवून अगोदर वाचून काढले. अनेक नव्या गोष्टी व काही पुरावेयुक्त गृहतीके या पुस्तक वाचनाने ध्यानात आली.

दुसऱ्या शतकात रचलेल्या अनेक ब्राम्हणी पुराणांमध्ये बुद्धांची शिकवण व बौद्ध शासक यांच्याबद्दल वैरभाव प्रगट केलेला दिसून येतो. राजतरंगिणी ही ११८ कवितांची काश्‍मिरी राज्यांची काव्यात्मक बखर आहे. १२व्या शतकातील कवी कल्हण याने ती रचली. यामध्ये व अशा अनेक प्राचीन संस्कृत साहित्यात देखील हा वैरभाव कायम जोपासल्याचे दिसून येते.

राजा नेहमीच क्षत्रिय असावा व ब्राह्मण मंत्र्याच्या सल्ल्याने राज्य करणारा असावा असे पुराणात नोंद करून ठेवल्याने या अटी पाळणाऱ्या राज्यांच्याच नोंदी ठेवल्या गेल्या. आणि म्हणूनच भारतीय इतिहासातून अनेक शतकांचा बौध्द इतिहास वगळण्यात आला. वंशावळीची नोंद ठेवणाऱ्या अनेक ब्राह्मणी पंडितांनी इतिहासाचे पुनर्लेखन करून सम्राट अशोकाची भव्य गाथा निशब्द केली व सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातून पुसून टाकण्यात आले. वर ब्राम्हणी नियम तोडले तर दैवी शक्तीचा कोप होतो असे ही नमूद करुन ठेवले. यामुळे अनेक पराक्रमी राजे व सामान्य रयतवर्ग ब्राम्हण वृंदाला वर्षांनुवर्षे घाबरून राहिला.

पुस्तकातील हे उतारे वाचल्यावर सम्राट अशोक भारतीय इतिहासातून का दिसून येत नाही याचा उलगडा झाला. परंतु या भारत भूमीवर सर्वत्र इतिहासाच्या पाऊल खुणा होत्या. या खुणा ओळखून त्यांना प्रयत्नपूर्वक जोडून अनेक ब्रिटिश उत्साही संशोधकांनी भारताचा इस्लामपूर्व इतिहास शोधायला सुरुवात केली. हे कार्य दोन शतके चालू राहिले आणि या कष्टाची परिणीती म्हणजेच सम्राट अशोक राजाचा दैदिप्यमान कालखंड उजेडात आला.

संपूर्ण आशिया खंडाच्या घडवणूकीत त्यांचा किती मोठा वाटा होता याची ओळख झाली. त्यांचे शिलालेख, स्तंभ, स्तूप आणि लेण्यांमधील शिल्प आणि चित्रे पाहून सम्राट अशोकांच्या कालकिर्दीचा विस्मयकारक जीवनपट उभा राहतो. हे वाचताना वाचक रोमांचित होऊन जातो. एका पोष्ट मधून त्यांचा आलेख मांडणे कुणालाच शक्य नाही. यास्तव सम्राट अशोक राजा संबंधी पुराव्यानिशी मांडलेल्या पुस्तकातील अनेक गोष्टींची माहिती आपण पुढील काही पोष्ट मधून घेवू.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)