ब्लॉग

बुद्ध सर्वांना सामावून घेणारा…..!

एक लहानशी मुलगी बुद्धाच्या मूर्तीवर पाय देऊन खांद्यावर चढतीये आणि त्याच वेळी तिचे वडील तिच्यावर ओरडतात असं दृश्य असलेला व्हिडिओ पाहिला…अवघ्या 25 सेकंदाचा तमिळ भाषेतला हा व्हिडिओ. सुरुवातीला या बाप-लेकीचा संवाद भाषेच्या अडचणीमुळे समजला नाही…मात्र, या पंचवीस सेकंदाच्या दृश्यांनी मनावर प्रचंड प्रभाव पाडला…

बुद्धाच्या मूर्तीवर चढणाऱ्या मुलीला बघून बाप तिच्यावर ओरडत “तू खाली उतर देवावरून..!” असं सांगतो, त्यावर आता मुलगी घाबरुन खाली उतरले असं वाटत असतानाच, मुलगी ठामपणे बापाला उत्तर देत प्रतिप्रश्न विचारते, “बुद्धानी सांगितले आहे की इथे कोणी देव नाही, तुम्ही बुद्धांना देव का म्हणता?” अन या अवघ्या 25 सेंकदात बुद्ध तुम्हाला काय देतो असा प्रश्न जे जे विचारतात, त्यांना उत्तर मिळते….बुद्ध आम्हाला दया, क्षमा, शांती, प्रेम याबरोबरच आत्मविश्वासही देतो…

दक्षिणेतील प्रचंड ताकदीचा दिग्दर्शक पा. रणजिथ याच्या ‘व्हिक्टीम’ या वेबसिरीजच्या ‘धम्मम’ या एपिसोड मधला हा व्हिडीओ आज दिवसभर ट्रेंडिंगमध्ये आहे….अवघ्या 25 सेंकदाच्या या व्हिडिओने काहींच्या भावनाही दुखावल्याचीही चर्चा वाचली… पण बुद्धाच्या खांद्यावर चढून समोर बघणं ही कल्पनाच केवढी कमालीची आहे…अन ती तितक्याच ताकदीने त्यातल्या निरागसपणाला कोणताही धक्का न लावता पा. रणजिथ आपल्या समोर मांडतो…हे सगळं बघताना नेमक्या भावना काय आहेत, हे शब्दात मांडणं निव्वळ कठीण आहे…पण एवढं नक्की की ही 25 सेंकद तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, स्वतःशी संवाद करायला, स्वतःलाच प्रश्न विचारायला भाग पाडतात…

डॉ. आ.ह. साळुंखे म्हणतात, “बुद्ध कुणी परका नाही.कोणत्याही अर्थाने परका नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर तो आपल्याच अंतशक्तीचे साकार रूप आहे. अस्सल सार आहे. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे.किंबहुना आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत आणि तो आपले विकसित उत्तर रूप आहे.” याचीच अनुभूती ही 25 सेकंद देतात…

ती 25 सेकंद मनात आणि डोक्यात घोळत असतानाच, बुद्धाच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा 33 कोटी देव यांच्यापैकी कोणाचीही मूर्ती असती तर..? या विचारानेच धस्स झालं…काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही… कारण या सगळयांना आम्ही आमच्या खोट्या अस्मितेत, जातीत जखडून ठेवलं आहे…. त्यामुळं बुद्धाला जस मी हा बुद्ध म्हणते तसं सहजपणे या महापुरुषांना एकेरीत बोलता येत नाही…आपल्याच खुज्या, खोट्या अस्मितांमध्ये या महापुरुषांना आपण बंदिस्त केलयं…

पण बुद्ध याहून वेगळा भासतो…त्याची परखड चिकित्सा करता येते, त्याला प्रश्न विचारता येतात… तो सर्वात जवळचा वाटतो…भरभरून प्रेम करायला शिकवतो…चुकताना सावरतो…आपल्या बापासारखा…!जसा बाप आपल्याला त्याच्या खांद्यावर घेऊन सगळं जग दाखवतो, तसचं बुद्धाच्या खांद्यावर बसून आपल्या जग बघता येत…आपल्या बापासारखाच तो आपला आधार, वाटाड्या बनतो, एकमेकांवर भरभरून प्रेम करायला शिकवतो….त्याच्यातील करुणा थोडी तरी माझ्यात यावी…. द्वेष गळून पडावा…

अश्विनी सातव डोके. (टीव्ही जर्नालिस्ट, पुणे) यांच्या फेसबुक वॉलवरून 

Leave a Reply

Your email address will not be published.