ब्लॉग

प्राचीन संस्कृती अवशेष जतन करणारे पुरातत्वखाते

ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा येथील समाजाची प्राचीन संस्कृती व सांस्कृतिक ठेव पाहून चकित झाले. येथील भाषांची व लिप्यांची संख्या बघून ते गोंधळले होते. एवढ्या भाषा असूनही समाजात संघर्ष आणि गोंधळ कसा होत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या वेळेला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या कारकिर्दीत (१७७३-१७८५) पुरातत्त्व विषयी एक स्थायी स्वरूपाचे खाते हवे हा विचार रुजू झाला. त्यानुषंगाने बंगालच्या एशियाटीक सोसायटीची स्थापना १५ जानेवारी १७८४ रोजी झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बीज रोवले गेले. मात्र भारतीय स्वातंत्र्य लढ्याला झालेली सुरुवात आणि १८५७ चा उठाव यामुळे प्रत्यक्षात खाते सन १८७१ मध्ये आकारास आले.

या खात्यातर्फे भारतीय भूखंडात पुरातन स्थळांवर जेव्हा सर्वेक्षण केले गेले तेव्हा जमिनीवर तसेच जमिनीखाली असंख्य पुरातन अवशेष असल्याचे दिसून आले. यातील काही ठिकाणी उत्खनन देखील झाले होते. पण त्याला शिस्त नव्हती. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव होता. मात्र नंतर अलेक्झांडर कनिंगहॅम, जेम्स बर्जेस आणि जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत पुरातत्व खात्याची कामगिरी खूप चांगल्या प्रकारे झाली.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने मोहोन्जो दडो- हडप्पा, बौद्ध, जैन, हिंदूं, आणि मुस्लिम स्थळे, प्राचीन मंदिरे, मशिदी, लेण्यां आणि शिलालेख अशा अनेक सांस्कृतिक बाबींची काळजी घेतली. त्याचप्रमाणे इजिप्त, कंबोडिया, व्हिएतनाम, म्यानमार अशा देशातील पुरातत्व खात्यांना सुद्धा मदत केली आहे.

आपल्या देशातील ३६७५ पुरातत्त्वीय अवशेषांची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाची तर २००० अवशेषांची जबाबदारी राज्य सरकारांच्या संरक्षणाखाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरविण्याकरिता नेमलेल्या समितीचा अहवाल विस्कळीत व भोंगळ असल्याने पुरातन अवशेषांकडे कुणी लक्ष देत नाही. तसेच लोकप्रतिनिधी यांचा सांस्कृतिक ठेव्याबाबतचा अभ्यास शून्य असल्याने अर्थसंकल्पात संग्रहालयासाठी पुरेशी तरतूद केली जात नाही.

मनुष्यबळाची कमतरता असल्याने सुधारणा होत नाही. त्याचप्रमाणे या खात्याला असलेले अधिकार खूपच मर्यादित आहेत आणि खात्यात काम करणाऱ्यांना पदोन्नती व प्रगती करण्यास देखील वाव नाही. हे सर्व बदलले गेले पाहिजे. प्राचीन अवशेष सुस्थितीत राखले गेले तरच पुढच्या पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास कळेल.

तसेच दरवर्षी उत्खननात अनेक प्राचीन अवशेष मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन संग्रहालये स्थापित करण्याची गरज आहे. भारतातील अनेक संग्रहालयाच्या गोदामात अनेक प्राचीन अवशेष उजेडात येण्याची वाट पाहत आहेत. ब्रिटिश समाजाला इतिहासाचे प्रचंड भान होते आणि आहे आणि म्हणूनच इंग्लंड सारख्या छोट्या आकारमानाच्या देशात १३०० संग्रहालय आहेत. ( भारतातील प्राचीन संस्कृतीचे अवशेष येथे खूप आहेत )

या संग्रहालयामध्ये स्थानिक आणि परदेशी पर्यटक वर्षभर मोठ्या संख्येने येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी संग्रहालयामध्ये बदल करण्यात येतात. नूतनीकरणाची प्रक्रिया सतत राबवली जाते. म्हणूनच ब्रिटिश संग्रहालये जगातील समृद्ध संग्रहालये झाली आहेत. आपल्या भारतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक संग्रहालय असतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतर्फे संग्रहालयाची वाट वर्षातून एकदा तरी दाखवली पाहिजे. त्यामुळे तरुण नागरिकांना पुरातत्वची गोडी लागून व माहिती मिळून आपल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल आणि इतिहासाबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण होईल.

पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सुद्धा संग्रहालये लोकप्रिय करण्याच्या मोहिमा आखल्या पाहिजेत. जेणेकरून सामान्य नागरिकांना मुलांबाळां समवेत संग्रहालयात जाण्यास रस वाटेल. संग्रहालय उभे करणे म्हणजेच आपला इतिहास जागृत ठेवणे होय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

( संदर्भ :- जॉन मार्शल-एक असामान्य पुरातत्वज्ञ, लेखक जयंत खेर )

-संजय सावंत, नवी मुंबई , (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)