इतिहास

बुद्धजन्म आणि असितमुनि : बौद्ध साहित्यातील हा प्रसंग खरोखर अद्वितीय!

बौद्ध साहित्यात बुद्ध जन्माची गोष्ट ही अतिशय सुंदर आणि हृदयगम्य आहे. समर्पक आहे. विचार प्रवर्तक आहे. एका महान व्यक्तिरेखेचा, व्यक्तिमत्त्वाचा जन्म होतो तो सर्वसाधारण माणसाप्रमाणे नाही. निसर्ग सानिध्यात माता शालवृक्षाची फांदी पकडून भूमीला पावलांनी स्पर्श करून उभी आहे. अशा अवस्थेत पूर्व दिशेस सन्मुख होऊन खुल्या वातावरणात सिद्धार्थ बालकाचा जन्म झाला. एका महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला आहे हे तात्काळ हिमालयात राहणाऱ्या वयोवृद्ध मुनिनां कळले ज्यांचे वय १२० वर्षे आहे.

त्यांना उमगले की सृष्टी आनंदाने डोलत आहे. वातावरणात धिरगंभीर तरंग पसरत आहेत. एक महान व्यक्तिमत्व पृथ्वीवर अवतरले आहे. धडपडत ते मुनि तात्काळ उठून तरंगाच्या दिशेने, बालकाचा जन्म जेथे झाला त्या दिशेस चालू लागले. त्यांच्या शिष्यांनी विचारले “मुनिवर्य कुठे चाललात ? थांबा..!” मुनि म्हणाले “मला आता सांगायला वेळ नाही” शिष्यही गुरूंच्या पाठीमागून बुचकळ्यात पडून चालू लागले. दरमजल करीत ते वयोवृद्ध मुनि अंतःप्रेरणेने कपिलवस्तू येथे शुद्धोधन राजाच्या राजवाड्यात आले. राजा शुद्धोधन चकित झाला. एवढे वयोवृद्ध मुनि जे पन्नास वर्षात कुठे गेले नाहीत ते इथे अचानक कसे?

आल्याआल्या मुनिनीं विचारले “राजा तुझे बालक कुठे आहे ? त्याचे दर्शन मला घेऊ दे.” मुनिंच्या डोळ्यातील आतुरता पाहून ते जन्मलेले बालक मुनिंच्या समोर आणले गेले. त्याला पाहताच मुनिनां परमानंद झाला. जवळ जाऊन बालकास न्याहाळले व त्याच्या पायास स्पर्श करून ते मुनि रडू लागले. राजाच्या काळजाचे पाणीपाणी झाले. काही वाईट भविष्य तर बालकाचे नाही ना ? या काळजीने त्यांनी मुनिंना रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले “काही अघटित घडणार म्हणून मी रडत नाही. मी आता या बालकास पाहीले. त्याचा पुढील उज्ज्वल काळ ही मला समजला. पण आता मी त्याला पूर्ण उमलण्या अगोदर पाहत आहे.

हे राजा मी बुद्धाला बालक रूपात बघत आहे म्हणून मी आनंदाने रडत आहे. तसेच त्याला बुद्ध झालेला मी बघू शकणार नाही, म्हणून ही मला वाईट वाटत आहे. माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे. बुद्धाने जगाला केलेला उपदेश मला ऐकता येणार नाही. बुद्धामुळे पुढे या जगात अनेक अहर्त होणार आहेत. ज्ञानप्राप्तीचा प्रकाश सर्वत्र पसरणार आहे. राजा चिंता करू नकोस. आनंदी रहा. लाखो वर्षातून एखादा असा बुद्ध जन्माला येतो, जो सर्व मानव जातीला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवितो. विश्वाचे कल्याण करतो.”

बौद्ध साहित्यातील हा प्रसंग खरोखर अद्वितीय आहे. कारण एका महान व्यक्तीमत्वाचा जन्म झाला आहे, हे त्याच्या आई बापाला कळले नाही परंतु हिमालयात राहणाऱ्या वयोवृद्ध असित मुनी यांना कळले. त्यांची ही दिव्यदृष्टी राजाला बालकाचे भविष्य सांगून गेली. जे ज्ञानी तपस्वी असतात त्यांनाच जगात घडणाऱ्या घडामोडींचे आकलन होत असते आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करीत असतात. नेपाळमध्ये कपिलवस्तू जिल्ह्यात तिलौराकोट हे ठिकाण शुद्धोधन यांची कपिलवस्तू नगरी असल्याचे मान्य झाले आहे आणि तेथेच असितमुनि यांचा स्तुप देखील मिळाला आहे. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी नेपाळ पुरातत्व खाते, लुम्बिनी प्रशासन आणि डरहॅम युनिव्हर्सिटी UK यांनी तेथे पहिल्यांदाच कपिलवस्तू महोत्सव साजरा केला. आणि ५० हजाराच्यावर पर्यटकांनी तेथे हजेरी लावली.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)