इतिहास

सन्नाती’ हेच सम्राट अशोक यांचे समाधी स्थळ?

इतिहासात सम्राट अशोक यांचा देहांत कुठे झाला या बाबत काहीच उल्लेख सापडत नाही. तसेच ज्या सम्राटाने कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला त्या सम्राट अशोक यांचा स्तूप किंवा समाधीस्थळ देखील आजपर्यंत कुठेच आढळले नाही, हे एक आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ एकर जागेत होत असलेले उत्खनन आणि तेथे सापडत असलेला बौद्ध शिल्पांचा आणि सम्राट अशोक यांच्या शिल्पांचा अमूल्य ठेवा पाहून हे स्थान सम्राट अशोक यांच्याशी अधिक निगडित आहे हे दृष्टिपथात येत आहे.

1)स्वस्तिक चिन्ह, धम्मचक्र आणि त्रिरत्नयुक्त सन्नाती येथील बुद्धपदकमल, 2)सांची येथील स्तुपासारखी गोल संरक्षण भिंत इथे होती. 3)उत्कृष्ट कोरलेले जातक कथेतील प्रसंग

बौद्ध भिक्खू भन्ते तिस्साव्रो हे बोधगयेतील “बौद्ध अवशेष बचाव अभियान” ( Save Buddhist Relics Campaign ) चालवीत असून त्यांनी कर्नाटक मधील सन्नाती येथे पुरातत्व खात्याच्या उत्खनन कामाबाबत व त्याच्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की भारतात आणि परदेशात उत्खननात सापडलेली असंख्य बौद्ध स्थळे त्यांनी बघितलेली आहेत. सन्नती येथे चालू असलेले उत्खनन पाहून त्यांनी संशय व्यक्त केला की सम्राट अशोक जेंव्हा उतारवयात दुसऱ्यांदा दक्षिण भारतात आले होते तेव्हा त्यांचा देहांत सन्नती येथे झाला असावा. कारण येथे सम्राट अशोक यांचे शिल्प, त्यांचा शिलालेख, ‘राया अशोक’ हे नामनिधान आणि असंख्य बौद्ध शिल्पाकृती उत्खननात आढळून आल्या आहेत व अजूनही सापडत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की सम्राट अशोक यांचा स्तुप सन्नती येथेच एखाद्या ढिगाऱ्याखाली झाकला गेला असावा. ASI ने अधिक सुयोग्य आखणी करून अनेक ठिकाणी उत्खनन केले पाहिजे.

सम्राट अशोक यांचा मोठ्या पाषाणावरील शिलालेख.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात चित्तापुर तालुक्यातील सन्नाती जवळ कनगंनहल्ली येथे हे उत्खनन चालू असून बौद्ध संस्कृतीचे असंख्य अवशेष तेथे प्राप्त होत आहेत. पण हा मौल्यवान ठेवा उघड्यावर असुरक्षित पडलेला असून काटेरी झाडाझुडुपांमध्ये दुर्लक्षित होत चालला आहे. लाईमस्टोन पाषाणातील सम्राट अशोक यांचे एकमेव शिल्प, स्तुप, विहार अवशेष येथे आढळून आल्याने मुख्य सचिव के सुधाकर राव यांनी २००८ मध्ये ‘सन्नाती विकास महामंडळ’ स्थापन करण्यात येईल असे सांगितले. यामुळे तेथे विकास होऊन पर्यटनास चालना मिळेल असे सांगितले जात होते. पण हे सर्व शेवटी कागदावरच राहिले. यामुळे सन्नाती स्थळाबाबतची प्रगती सध्यातरी शून्य आहे.

सन्नाती येथे प्राप्त झालेली क्षतीग्रस्त बुद्ध शिल्पे.

सन्नाती स्थळ उजेडात कसे आले त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. १९८६ मध्ये सन्नाती येथील पुरातन चंद्रलांबा मंदिर कोसळल्यावर मंदिराचे नूतनीकरण करताना त्याच्या पायामध्ये तीन तुकडे झालेला गुलाबी वालुकामय शिलालेख आढळला. त्याची तपासणी करण्यासाठी ASI तज्ञांनां हैद्राबादवरून बोलविण्यात आले. त्यावरील धम्मलिपी वाचताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तो शिलालेख सम्राट अशोक यांचेशी निगडित होता. त्या पासून स्फूर्ती घेऊन सन्नाती येथे १४ वर्षे (१९९१ ते २००४ पर्यंत ) उत्खनन करण्यात आले. तेव्हा गोलाकार महाचैत्य आढळला. याचा व्यास २२ मी. व उंची १७ मी. होती व तो मौर्य आणि सातवाहन राजवटीत बांधला असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जातककथा कोरलेल्या ६० स्लॅब आढळून आल्या. त्यावर धम्मचक्र, स्तुप, धम्मचक्र प्रवर्तन, बोधिवृक्ष चिन्हे कोरलेली होती.

सम्राट अशोक स्तुपाचे शिल्प येथे आढळले.

येथील महत्वाचे अवशेष आता गुलबर्गा संग्रहालयात हलविण्यात आले असून अजूनही असंख्य मूर्ती, नक्षीदार खांब, शिलालेख भीमा नदीच्या किनाऱ्यावर उघड्यावर पडले आहेत. सन्नाती सारखे महत्वाचे बौद्ध स्थळ जगाच्या पटलावर आणण्यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे ती तेथील राज्यकर्त्यामध्ये नाही. बौद्ध स्थळाबाबतची उदासीनता त्यांच्यात दिसून येते. याला कारण लोकप्रतिनिधींचा त्याबाबत अभ्यासच नाही. भारताच्या मूळ इतिहासाबद्दल आस्था नाही. धम्म आणि धर्म यातील फरक जो पर्यंत त्यांना कळत नाही तो पर्यंत या भूमीच्या इतिहासाचे आकलन होणे कठीण आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *