ब्लॉग

खरंच आम्ही बुद्ध विचार “जाणले” आहेत की बुद्ध विचार फक्त कवटाळून बसलो आहोत?

१६व्या शतका अखेर जपान मध्ये “बाशो” नावाचा एक प्रसिद्ध बुद्ध विचारांचा कवी होऊन गेला. एकदा तो त्या काळातील एक प्रसिद्ध बौद्ध आचार्य “टाक ऊआन” यांना भेटायला गेला. टाक ऊआन जेव्हा कुठल्या मुद्द्यावर बोलायचे तेव्हा बाशो त्यांना बुद्ध वचने उद्धृत करायचा. काही वेळाने टाक ऊआन त्याला म्हणाले, “बाशो, तू खूप अभ्यासू आहेस. अनेक बुद्ध वचने सांगतोस मला. पण स्वतः काय जाणले ते सांगशील का? मला ते ऐकायचे आहे”

यावर बाशो निरुत्तर झाला. टाक ऊआन म्हणाले, “भ.बुद्धांचे विचार का कवटाळतोयस? ते फक्त मार्गदर्शनासाठी आहेत, ते अंतिम स्थळ नव्हे.”

अनेकदा आम्हीं बुद्धांचे विचार तोंडपाठ करतो, त्रिपिटकाचे उतारे सांगतो, पण त्याने काही आपण बुद्धत्वापर्यंत पोहचू नाही शकत. कारण मूळ प्रश्न हा आहे की आम्हीं बुद्ध विचार किती जाणतो. आमच्या “जाणण्यावर” आमचा प्रवास आणि आमचे “अंतिम स्थळ” अवलंबून आहे.

म्हणूनच बुद्ध म्हणतात, “एवमेव खो, भिक्खवे, कुल्लूपमो मया धम्मो देसितो नित्थरणत्थाय, नो गहणत्थाय। कुल्लूपमं वो, भिक्खवे, धम्मं देसितं, आजानन्तेहि धम्मापि वो पहातब्बा पगेव अधम्मा” (मज्झिम निकाय)

माझ्या धम्माचा उपयोग एका नावेप्रमाणे करा. जसे नावेचा उपयोग आपण नदी पार करण्यासाठी करतो, मात्र नंतर नावेला डोक्यावर घेऊन मिरवत नाही किंवा तिच्याबद्दल आसक्ती ठेवत नाही, तसेच माझ्या विचारांचा उपयोग फक्त एक मार्गदर्शन म्हणून करा. माझ्या विचारांना कवटाळून बसू नका”

-अतुल मुरलीधर भोसेकर (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)