सध्या संजीव सन्याल यांचा एक विडिओ प्रसारित झाला आहे ज्यात सम्राट अशोकांच्या अस्तित्वावर आणि कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात सन्याल हे पंतप्रधान कार्यालयात principal economic advisor म्हणून काम करतात. ते खरं तर “बुद्धिभेद” करण्याचा प्रयत्न करतायेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
सम्राट अशोकाच्या कर्तृत्वावर तसेही सध्याचे राजकीय सत्तेदार अनुकूल नाही किंबहुना त्यांना सम्राट अशोकाच्या राग आहे हे त्यांचे विचारसरणीतून अनेक वेळा दिसून आले आहे. ‘सहा सोनेरी पाने’ हे त्याचे उदाहरण आहे. सन्याल यांचा सध्या हाच प्रयत्न दिसतो आहे की इतिहासाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून म्हणजेच मिथकांद्वारे मांडायचा. याचाच अर्थ सत्य नाकारायचे आणि सम्राट अशोकांना एक कर्तृत्वान सम्राट न दाखवता एक अत्याचारी, धर्मांध राजा दाखवायचा. यात सन्याल हे सध्याचे सत्ताधारी यांच्या विचारांना अपेक्षित असलेले भाष्य करतात एवढेच! मात्र अशा स्वयंघोषित इतिहास अभ्यासकांपासून सावध असावे व त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार असावे…
सम्राट अशोकांचे कर्तृत्त्व माहीत असूनही सन्याल सारख्या व्यक्ती डोळेझाक करून लोकांमध्ये मुद्धाम संभ्रम निर्माण करतात. त्यांच्या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊच पण त्यांनी जे दिव्यवदानम् चा उल्लेख केला आहे त्यासंदर्भात बोलूयात.
दिव्य घटनांच्या गोष्टी (divine stories)असलेला दिव्यावदानम् हा संस्कृत भाषेतील ग्रंथ इ.स. 2 शतकात लिहिलेला आहे असा समज आहे परंतु त्याचे कथानक आणि स्थळे पाहता तो इ.स. 7 व्या शतकातील किंवा त्यानंतरच्या काळातील लिहिला असावा असे वाटते.
काय आहेत या कथा? तर यातील 38 कथा या अत्यंत कल्पक घटना साधारणतः मूलसर्वास्तीवाद या उपपंथाच्या विचारधारेशी जुळलेल्या वाटतात. या कथांमध्ये तथ्य + काल्पनिक विचार बेमालूमपणे घुसवले आहेत. त्यामुळे न कळत सर्वसामान्यांना या कथा वाचताना त्या सत्य वाटतात.
यात 11वी कथा “अशोकावदान” नावाची आहे. याची रचना 5व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत झाल्याचे पुरावे आहेत. या कथेत सम्राट अशोक याचे कौर्य, त्याचे बुद्ध धम्माशी असलेले नाते आणि त्याने बौद्ध धम्म वाढविण्यासाठी कशी क्रूरपणे निगण्ठांची हत्या केली याचे वर्णन आहे. मुळात यात कुठलेही ऐतिहासिक तथ्य नाही. यात सम्राट अशोकाने अजीविकांची केलेली हत्या वर्णित आहे.
जर सम्राट अशोकाने अजीविकांची हत्या केली असेल तर भारतातील सर्वात प्रथम लेणीं त्याने अजीविक संघाला दान दिली असती का? या व अशा अनेक कथा या ग्रंथात लिहिल्या आहेत ज्या काल्पनिक आहेत. याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे शुंग (बृहदरथचा हत्यारा) हा मौर्य वंशाचा दाखविला आहे! कसा विश्वास ठेवायचा या कथांवर ? आणि बुद्धिभेद करण्यासाठी सन्याल आणि मंडळी मुद्दामपणे या गोष्टी मांडतात कारण सम्राट अशोकांच्या कार्याचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांना हेच हवे आहे. (धम्मलिपि ला विरोध हा त्याचाच एक भाग असावा)
फारफार तर या सर्व कथा साहित्य कल्पनेसाठी योग्य ठरतील किंवा स्थळांबाबत योग्य नावे कळतील, मात्र त्या घडल्या आहेत याला काहीही प्रमाण नाही. प्राचीन काळी एखाद्या व्यक्तिरेखेला दिव्यत्व बहाल करण्यासाठी, रंजकता आणण्यासाठी ज्या घटना साहित्यात घातल्या जात त्यातीलच हा प्रकार आहे.
दिव्यवदानम् या मिथक आहेत आणि म्हणूनच या कथांना आपण किती महत्त्व द्यायचे हे ठरविले पाहिजे. या अनैतिहासिक घटनांच्या गोष्टी आहेत आणि त्यांना केवळ एक काल्पनिक साहित्यकृती म्हणून बघायला पाहिजे मात्र त्याच बरोबर सम्राट अशोकांचे कर्तृत्त्व आपण जगाला ठासून सांगायला हवे मिळेल त्या माध्यमातून…
अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०
(लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)