ब्लॉग

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस; ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन

सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य मिळाला. शाळेत त्यांचे पदकमल उमटले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुद्धा त्यांना प्राप्त झाले. आज, ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन त्यानिमित्ताने…

सातारची माती कसदार आहे. या मातीत भीमराव आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दिपले. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून चंदनाच्या सुगंधाप्रमाणे त्यांची ख्याती पसरली. आज याच महामानवाच्या प्रेरणेतून नवऊर्जा घेऊन संबंध देशभरातील युवा विद्यार्थी पिढी घडतेय, वाढतेय हे एका अर्थाने सातारच्या मातीचाच विजय होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला पहावयास मिळाले. खेळण्या-बागडण्याची साधारणपणे ८ ते ९ वर्षे लहानग्या भिवाची साताऱ्यात गेली. लहानपणी त्यांना भिवा म्हणत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने या पुण्यभूमीतून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी भीमरावाने छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. हा त्यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून दरवर्षी ७ नोव्हेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आज देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी ही शाळा पहायला येतात. हायस्कूलच्या प्रशासनाला आणि एकूणच साताऱ्याला ठाऊक आहे की, येथे असा विद्यार्थी शिकून गेलाय की ज्याने अखंड देशाचे जगातील सर्वात मोठे संविधान निर्माण करून या भारताला सर्वात प्रगल्भ अशी आदर्श लोकशाही बहाल केली. काही वर्षांपूर्वी ‘जगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेला’ यासंबंधीचे संशोधन करण्यात आले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, ऑक्सफर्ड अशा नामांकित विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला. हे संशोधन बरेच दिवस सुरू राहिले. नामवंत विद्यापीठांमधली तज्ज्ञ यात सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून पहिल्या क्रमांकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे आले.

जगभर अनेक महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु जगात इतर कोणत्याच महापुरुषाच्या पुतळ्याखाली ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे कोट करण्यात आलेले नाही. कोलंबिया विद्यापीठात मात्र बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ कोरले आहे. हा गौरवास्पद संदर्भ इथे एवढ्यासाठी द्यावासा वाटतो की, सातारच्या या हायस्कूलमध्ये शिकलेला एक विद्यार्थी जगातला सर्वात हुशार विद्यार्थी ठरला. अफाट अन् अचाट बुद्धिमत्ता लाभलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजही हायस्कूलच्या रजिस्टरमध्ये भिवा रामजी आंबेडकर असे नाव असून १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पुसटशी कल्पनाही नसेल की हा बाल भिवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारे भिवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरे ठरवले.

भीमराव लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचा मुलगा होता. भीमरावाच्या असामान्य बुद्धिमत्तेने प्रतापसिंह हायस्कुलातील कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी आकर्षित झाले. देशाची भावी पिढी निर्माण करण्यासाठी विद्यादानाचे पवित्र कार्य समर्पित भावनेने ते करीत होते. भीमरावावर त्यांचे अतोनात प्रेम जडले. ते त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करू लागले. गुरू-शिष्याचे पवित्र नाते उभयतात निर्माण झाले. आंबेडकर गुरुजी लाडक्या भीमरावाच्या शिक्षणाकडे, खाण्या-पिण्याकडे जातीने लक्ष देत असत. माध्यान्ह भोजनाचा डबा देखील ते भीमरावासाठी आपुलकीने रोज आणीत. गुरू-शिष्याचा ऋणानुबंध दृढ व्हावा, बाबासाहेबांचा रूपाने आपली ओळख राहावी म्हणून गुरुजीने बाबासाहेबांचे आडनाव आंबावडेकर ऐवजी आंबेडकर ठेवले. सरकार दरबारी त्याची नोंद केली. बाबासाहेबांना भेटण्याकरिता आंबेडकर गुरुजी १९२७ साली मुंबईला आले होते. तेव्हा बाबासाहेबांचे ऑफिस दामोदर हॉलच्या मागील शाळेच्या इमारतीत तळ मजल्यावर होते. गुरुजी ऑफिसात आल्याबरोबर बाबासाहेब तत्काळ उभे राहिले अन् गहिवरलेल्या स्वरात ‘मास्तर’ असे उद्गार काढून त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले.

बहरलेल्या वेलीच्या फुलातून जसा मध टपकावा तसे गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी बाबासाहेबांची पाठ थोपटली. आपल्या पराक्रमी विद्यार्थ्याला ‘चिरंजीव भव’ असा आशीर्वाद दिला. बाबासाहेबांची भव्य लायब्ररी पाहून ते हर्षाने सद्गदित झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नव्हे तर या जगाचे अखंड स्फूर्ती आणि प्रेरणेचे दीपस्तंभ ठरली आहे. म्हणूनच बाबासाहेबांचा शाळा प्रवेश हा भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्याच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. या दिवसाचे स्मरण चिरंतन ठेवायला हवे. शाळेत जाणे किती महत्त्वाचे आहे हे यानिमित्ताने विद्यार्थी मनात रुजवायला हवे. कारण, उद्याचा नवा, समृद्ध, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित-वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. यातून समाजाला शिक्षणाची जबरदस्त प्रेरणा आणि चालना मिळणार असून व्यापक स्तरावर शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान होत राहणार आहे.

बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस संपूर्ण देशभर शाळा-महाविद्यालयातून साजरा होणे महत्वाचे असल्याने दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सातारचे युवा, तडफदार कार्यकर्ते अरुण विश्वभर जावळे सातत्याने करीत आहेत. अलीकडेच शासनस्तरावर भरीव मदत होत असताना व्यवस्थापन प्रशासन स्तरावर हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी या हायस्कूलचे ऐतिहासिक महत्त्व आणि गांभीर्य ओळखून ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. दोन अंकी पटसंख्या असणाऱ्या हायस्कूलची पटसंख्या दीडशेच्या पुढे नेली. गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमता वाढवली. लेखन-वाचन प्रकल्प, अध्ययन समृद्धी असे अनेकविध कल्पक उपक्रम राबवून हायस्कूलचा चेहरा बदलवला. या ऐतिहासिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठीचा आग्रही सूर संपूर्ण देशातून उमटत आहे.

मिलिंद मानकर, नागपूर मो,८०८०३३५०९६