जगभरातील बुद्ध धम्म

बगान येथे ३५०० पेक्षा जास्त स्तूप, बुद्ध विहार व बौद्ध मठ; जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

शनिवार दिनांक ६ जुलै २०१९ रोजी म्यानमारमधील ‘बगान’ शहराचे नाव जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. कारण बगान येथे ३५०० पेक्षा जास्त स्तूप, बुद्ध विहार व बौद्ध मठ आहेत आणि त्यातील दोन हजाराचे वर सुस्थितीत आहेत. त्यांची बांधणी ११व्या ते १३व्या शतकात झाली असून ते बघण्यास व तेथील धम्माचा अभ्यास करण्यास जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक ‘बगान’ इथे येतात.

जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक ‘बगान’ इथे येतात.

युनेस्कोने सांगितले की म्यानमारमध्ये बौद्ध पुरातन स्थळांबाबत नवीन कायदा लागू केला आहे आणि त्यामुळे या पुरातन स्थळांजवळ उभारण्यात येणारी हॉटेल्स, रिसॉर्ट यांना चाप बसेल. त्यामुळे पर्यटन स्थळांची सुरक्षितता राखली जाईल. या अगोदर १९९५ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘बगान’चे नाव अंतर्भूत करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. परंतु त्यावेळी देशात लष्करशाही असल्यामुळे तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. मात्र आता प्रस्ताव मंजूर झाल्याने म्यानमारचे प्रतिनिधी कॅन झेया यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की हा आनंदाचा दिवस आहे. यापुढे निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा दैदिप्यमान वारसा हजारो वर्षे टिकेल असे आम्ही प्रयत्न करू. तसेच त्यामुळे तेथील पर्यटन नक्कीच बहरणार आहे.

बगान

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील फक्त चार स्थळे आहेत. त्यात अजिंठा लेणी, कैलास लेणी, घारापुरी लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांची नावे आहेत. पण बोरिवली नजीक असलेल्या वैभवशाली काळ्या कातळातील कान्हेरी लेण्यांचा त्यात समावेश नाही याची खंत वाटते. पर्यटन व्यवसाय जर खऱ्या अर्थाने भरभराटीला आणायचा असेल तर पुरातत्व खाते आणि पर्यटन विभागाने कान्हेरी लेणी , जुन्नर लेणी, नाशिक लेणी व कार्ला-भाजे-बेडसे लेणी यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी निकराचे प्रयत्न केले पाहिजेत. कारण बुद्ध जगभर पसरला असून बौद्ध पर्यटन ही संकल्पना जगात रुजली गेली आहे आणि केंद्र सरकारने बुद्धिस्ट सर्किट योजनेअंतर्गत बौद्ध स्थळांचा विकास करण्यासाठी निधी इतर राज्यांना यापूर्वीच दिला आहे. मग माझा महाराष्ट्र मागे का ?

संजय सावंत, नवी मुंबई

One Reply to “बगान येथे ३५०० पेक्षा जास्त स्तूप, बुद्ध विहार व बौद्ध मठ; जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

Comments are closed.