इतिहास

भगवान बुद्धांचा दहावा वर्षावास – रक्खीत वनखंड, भाग 12

नववा वर्षावास संपल्यानंतर, बुद्धांनी कोसंबी मध्ये काही काळ व्यतीत केला. त्याच काळात, दहाव्या वर्षावासाची सुरुवाती दरम्यान बुद्धांच्या भिक्खू संघात दोन गट पडले. एका शुल्लक कारणांवरून – एका छोट्याश्या चुकीमुळे त्या भिक्खूला कोणता दंड द्यावा, यावरून भिक्खू संघामध्ये वाद झाले आणि दोन गट पडले.

बुद्धांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही दोन्ही बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हे पाहिल्यानंतर, या दोन्ही गटाने आपसात बसून वाद मिटवावा असे सांगून , बुद्धांनी एकांतवासात जाण्याचे ठरविले.

घोसिताराम विहारातून बुद्ध श्रावस्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत ते बालकलोणकर या गावी थांबले. इथे त्यांना भिक्खू अनिरुद्ध, नंदिय, किंबिल आणि इतर भिक्खू संघ भेटला. बालकलोणकर हे कोसंबी नगरीच्या जवळ व पाचीनवंसदायवन च्या अलीकडे होते. आत्ताचे “सिरथू” हे गाव त्याकाळातील बालकलोणकर असू शकते.

अनाथपिंडकाच्या स्तूपाचे अवशेष

पाचीनवंसदाय वन हे आत्ताचे गंगा नदीच्या तीरावर असलेले “माणिकपूर गंगा घाट” किंवा “इदगाह गढी” असू शकते. तेथे काही काळ बुद्धांनी व्यतीत केला व येथील भिक्खूसंघाला मार्गदर्शन केले. नंतर ते पारिलेल्याक वनाकडे जाण्यास निघाले.

पारिलेल्याक वन हे कोसंबी जवळ असलेल्या पारिलेल्याक नगरीतील एक मृगदाव वन होते. येथील रक्खीत वनखंड मध्ये बुद्धांनी दहावा वर्षावास केला. येथील भद्दसाल (एक प्रकारचा शाल वृक्ष) नावाच्या वृक्षाखाली बुद्धांनी आपला वर्षावास व्यतीत केला.

उत्तर प्रदेशातील “परियावाँ” है गाव पूर्वीचे पारिलेल्याक गाव आहे. याच गावाजवल असलेले सध्याचे “रेवली” हे गाव पूर्वीचे रक्खीत वन असावे. (उत्तर प्रदेशातील पावसाळ्यात या गावाला मोठा पूर आला होता)

या वर्षावासानंतर भ. बुद्ध श्रावस्ती मधील अनाथपिंडाकाच्या जेतवनराम विहारात जायला निघाले.

बुद्ध वर्षावासासाठी कोसंबीत न थांबता श्रावस्तीला निघून गेले हे समजल्यानंतर भिक्खुंच्या दोन्ही गटाला पश्चाताप झाला आणि मग ते सगळे बुद्धांना भेटायला श्रावस्तीला गेले आणि क्षमा याचना झाल्यानंतर, संघामध्ये पुन्हा एकी निर्माण झाली जी बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतरही अबाधित राहिली.

अतुल भोसेकर

संदर्भ:
विनय पिटक
अंगुत्तर निकाय
The Life of the Buddha
DPPN
Geography of Early Buddhism

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *