बातम्या

लॉकडाऊनच्या काळात आदर्श भीमजयंती साजरी करण्यासाठी “भीमजयंती मार्गदर्शक तत्वे-२०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दर वर्षी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या वर्षी मात्र संपूर्ण जगात COVID – 19 या जीवघेण्या विषाणूने थैमान घातले आहे. भारताचे संविधानवादी आदर्श नागरिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची ओळख समस्त भारतीयांना आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपण जिथे आहोत तिथेच भीमजयंती साजरी करण्याचा संकल्प करावा. आपण आदर्श आंबेडकर अनुयायी असल्याचा परिचय द्यावा असे आवाहन ‘फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम), जागल्या, राऊंड टेबल इंडिया, धम्मचक्रडॉटकॉमच्या तर्फे करण्यात येत आहे.

गर्दीच्या ठिकाणी किंवा एकत्र जमल्याने हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच घरातूनच आदर्श भीमजयंती साजरी करण्यासाठी “भीमजयंती मार्गदर्शक तत्वे-२०२०” आपणांस उपयुक्त ठरतील.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आपण ‘सलग १८ तास अभ्यास’ हा उपक्रम आपल्या राहत्या घरी आयोजित करून सहपरिवार त्यात सहभागी व्हावे. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आपल्या अभ्यासाचे, ऑफिसचे, बाबासाहेबांचे साहित्य किंवा इतर महापुरुषांचे साहित्य वाचावे. एकाच दिवशी १८ तास अभ्यास करणे शक्य होणार नाही, म्हणून आतापासूनच थोडा थोडा कालावधी वाढवत न्यावा.

२) कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर येऊन अथवा ढोल-ताशे, डीजे, बाईक रॅली, मिरवणूक इ. प्रकारे सामूहिक जयंती साजरी करू नये. काही अतिउत्साही लोकांच्या हुल्लडबाजीमुळे समस्त आंबेडकरवादी अनुयायी बदनाम होणार नाहीत याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे.

३) भीमजयंती आपण लोकवर्गणीच्या माध्यमातून साजरी करत असतो. यावर्षी मात्र आपण शक्य झाल्यास आपल्या परिसरातील बुद्धविहारांना अभ्यासिका, वाचनालय आणि ज्ञानाची केंद्रे यात रूपांतरित करण्याचा संकल्प करावा. लोकवर्गणीतून विहारांचा कायापालट करावा !

४) भीमजयंतीच्या लोकवर्गणीचा सदुपयोग आपल्या परिसरातील सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना Personal Protection Equipment (PPE) किट्स भेट म्हणून द्याव्यात. जेणेकरून कोरोना लवकरात लावकर आटोक्यात आणण्यासाठी डाॅक्टर्स, नर्सेस, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना यश मिळेल.

५) लॉकडाऊन च्या काळात ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करणे.

६) इथून पुढे भीमजयंतीच्या अध्यक्षपदी महिलांनाच प्रथम प्राधान्य द्यावे.

७) भीमजयंतीसाठी जमा झालेल्या वर्गणीतून आणखी काय करता येऊ शकते?

अ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे यांचे सर्व खंड आपापल्या परिसरातील बुद्धविहारात सार्वजनिक वाचनासाठी उपलब्ध करून घ्यावे.

ब) तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत साहित्य, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बडोदानरेश सयाजीराव गायकवाड महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीज्योति सावित्रीमाई फुले, राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जननायक बिरसा मुंडा, राजमाता अहिल्याबाई होळकर, संतशिरोमणी रोहिदास महाराज, संत सेवालाल महाराज, ब्लॅक पँथर, दलित पँथर, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ, प्लेटो, सॉक्रेटिस, कंफुशियस, टॉलस्टॉय, दावोस्की, चोम्स्की, कार्ल सिगन, टोनी मॉरिसन, गेल ऑम्वेट, सुखदेव थोरात, World power made easy, Day to day economics, Rich Dad, Poor Dad, बोर्ड रूम-अच्युत गोडबोले, The Alchemist – पाउलो कोएलो, win friend influence people the magic of thinking big, इ. साहित्य, विज्ञान, कला, तत्वज्ञान विषयाच्या पुस्तकांनी सज्ज अशी लायब्ररी तयार करणे.

क) सामाजिक सभागृहात किंवा बुद्धविहारात शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, यांना अद्ययावत जगाची माहिती मिळावी यासाठी कम्प्युटर, इंटरनेट, स्पीकर, वेब कॅमेरा, प्रिंटर इ. ची सुविधा असावी.

ड) बुद्धविहारात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी व्हाईट बोर्ड लावलेला असावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवता येईल.

इ) बुद्धविहारात दर रविवारी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक अद्ययावत माहितीपट दाखवण्यासाठी प्रोजेक्टर आणि स्क्रीन विकत घेणे.

ई) बुद्धविहारे ही ज्ञानकेंद्रे व्हावीत यासाठी भीमजयंतीला जमा झालेली लोकवर्गणी उपयोगात आणावी.

विनित :
फेस ॲाफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम)
जागल्या
राऊंड टेबल इंडिया
धम्मचक्र