आवाज इंडिया, जीबीसी इंडिया आणि धम्मचक्र फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ५ वे वर्ष असून ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने जगभरातील अनुयायांना घरी बसून पाहता येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भिमांजली’ कार्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार आपल्या शास्त्रीय संगीताच्या स्वरांतून बुद्धं शरणं गच्छामिची सुमधुर धून तसेच बाबासाहेबांवरचे एक गीत सादर करून आदरांजली अर्पण करतात. २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद दिलशाद खान, पंडित भवानी शंकर, पंडित मुकेश जाधव यांच्या स्वप्त स्वरांतून ‘भीमांजली’ कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर रोजी ‘भीमांजली’चे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ६ वाजता करण्यात येते.
यापूर्वी ‘भीमांजली’च्या कार्यक्रमात दिग्गज कलावंतांनी महामानवाला स्वरांजली अर्पण केली आहे. २०१७ साली उस्ताद शाहिद परवेझ, प्रिया सिस्टर्स, पंडित प्रभाकर धाकडे, पंडित मुकेश जाधव आदी. २०१८ साली अमेरिकन संगीतकार फ्ल्यूट वादक नॅश नेबर्ट, उस्ताद रफिक खान, उस्ताद शफिक खान, डॉ.संगीता शंकर आणि पंडित मुकेश जाधव आदी.
२०१९ मध्ये पंडित रोनू मुजुमदार, सुप्रसिद्ध बासुरी वादक, शाकीर खान, तेजस उपाध्यय, पंडित मुकेश जाधव या मान्यवर कलावंतांच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला स्वरांजली अर्पण करण्यात आले.
यंदा पाचवे वर्ष : ‘या’ दिग्गज कलावंतांकडून महामानवाला आदरांजली
यंदा ‘भिमांजली’ उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खान, प्रसिद्ध बासरी वादक पंडित राकेश चौरासिया, व्हायलिन वादक रितेश तागडे आणि प्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव यांच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला स्वरांजली अर्पण करणार आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीताद्वारे बाबासाहेबांना आदरांजली हा पहिल्यांदाच जगप्रसिद्ध कलाकारांना सोबत घेऊन डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घडवून आणला. संगीताला जात धर्म नसतो.. तर ते लोकांच्या आंतर मनात जाऊन एक खूप चांगल्या लहरी, विचार निर्माण करतात. म्हणूनच ही आदरांजली शास्त्रीय संगीताद्वारे देण्याचे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सुरु केले आहे. ‘भीमांजली’च्या निमित्ताने ह्या जगप्रसिद्ध कलाकारांना सुद्धा डॉ.बाबासाहेब कळायला लागलेत हेही काही कमी नाही.
भीमांजलीचे लाईव्ह प्रक्षेपण
कोरोनामुळे यावर्षी चैत्यभूमीला न येता घरूनच महामानवाला अभिवादन करावे. तसेच या वर्षी हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे सुद्धा दाखविण्यात येणार असून आवाज इंडिया, जीबीसी इंडिया आणि धम्मचक्र यासह अनेक फेसबुकपेजवर आपल्याला कार्यक्रम दिसेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होण्याची विंनती राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबई आणि तालविहार संगीत संस्था यांनी केली आहे.