बातम्या

भीमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार…

मुंबई : औरंगाबाद येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वीतेनंतर अजून एका उपक्रमाचा लाभ बौद्ध बांधवाना घेता येणार आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा होणार आहे.

दरवर्षी ‘भिमांजली’ कार्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार आपल्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बुद्धं शरणं गच्छामिची सुमधुर धून तसेच बाबासाहेबांवरचे एक गीत सादर करून आदरांजली अर्पण करतात. २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद दिलशाद खान, पंडित भवानी शंकर, पंडित मुकेश जाधव यांच्या स्वप्त स्वरांतून ‘भीमांजली’ कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर रोजी ‘भीमांजली’चे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ६ वाजता करण्यात येते.

२०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी आपल्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली दिली होती. यावेळी डॉ.हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजना व्हनीच कांबळे.

यापूर्वी ‘भीमांजली‘च्या कार्यक्रमात दिग्गज कलावंतांनी महामानवाला स्वरांजली अर्पण केली आहे. यामध्ये २०१७ साली उस्ताद शाहिद परवेझ, प्रिया सिस्टर्स, पंडित प्रभाकर धाकडे, पंडित मुकेश जाधव, तर २०१८ मध्ये अमेरिकन संगीतकार फ्ल्यूट वादक नॅश नेबर्ट, उस्ताद रफिक खान, उस्ताद शफिक खान, डॉ.संगीता शंकर आणि पंडित मुकेश जाधव या मान्यवर कलावंतांच्या स्वरातून अभिवादन करण्यात आले.

यंदा चौथे वर्ष : ‘या’ दिग्गज कलावंतांकडून महामानवाला आदरांजली…

राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने तालविहार प्रस्तुत ‘भीमांजली’ हा कार्यक्रम ६ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमात पंडित रोनू मुजुमदार, सुप्रसिद्ध बासुरी वादक, शाकीर खान, तेजस उपाध्यय, पंडित मुकेश जाधव यांच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताद्वारे बाबासाहेबांना आदरांजली हा पहिल्यांदाच जगप्रसिद्ध कलाकारांना सोबत घेऊन डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घडवून आणला. संगीताला जात धर्म नसतो.. तर ते लोकांच्या आंतर मनात जाऊन एक खूप चांगल्या लहरी, विचार निर्माण करतात. आणि म्हणूनच ही आदरांजली शास्त्रीय संगीताद्वारे देण्याचे डॉ. कांबळे सरांनी सुरु केले आहे. ‘भीमांजली’च्या निमित्ताने ह्या जगप्रसिद्ध कलाकारांना सुद्धा बाबासाहेब कळायला लागलेत हेही काही कमी नाही. हरिप्रसादजी चौरासिया, विश्वमोहन भट्ट ह्या सारख्या खूप नाव असलेल्या कलाकारांना एकत्रित आणून त्यांच्या कडून बाबासाहेबांना आदरांजली फक्त डॉ.हर्षदीप कांबळेच करू शकतात.

‘भीमांजली’ का?

२०१६ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली देण्यात येते. बाबासाहेबांना संगीत ऐकण्याची आवड होती. संगीत हे जाती धर्माच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाते. मानसिक शांततेसाठी संगीताची आवशक्यता असते, शास्त्रीय संगीत हे भारतीय संस्कृती असून तिला जपण्याचे काम केले जाते. या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या स्वरलहरीने आदरांजली वाहण्यात येते.

डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस) यांनी प्रशासकीय कामासोबतच सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं आहे. त्यांनी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वांच्या स्मरणात राहील अशी साजरी करून सर्वांची मने जिंकली. या जयंतीच्या कार्यक्रमाला बॉलीवूडचा सुपरस्टार अमीर खान हे सुद्धा उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आयु डॉ.हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच कांबळे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. यासाठी औरंगाबाद येथे चौका येथे आंतरराष्ट्रीय भिक्खू ट्रेनिंग सेंटर उभं केलं आहे.

त्यांच्या प्रयत्नातून औरंगाबाद येथे २२ ते २४ नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषद घेण्यात आली. या परिषदेला जागतिक धम्मगुरु दलाई लामा, श्रीलंकेचे धम्मगुरु डॉ.वाराकागोडा धम्मसिद्धी गणरत्न महानायक महाथेरो यांची उपस्थिती होती त्यासोबतच जगभरातील १० देशातील बौद्ध भिक्खू या परिषदेला आले होते. एक लाखापेक्षा जास्त लोकांनी ही भव्य धम्म परिषद पाहिली. या धम्म परिषदेमुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रबुध्द कुटुंबाची व पर्यायाने प्रबुध्द भारताची निर्मिती करण्यासाठीची ऊर्जा बौद्ध बांधवाना मिळाली.

त्यासोबतच ‘जन्माने बौद्ध होत नाही तर आचरणाने बौद्ध व्हा’…असा संदेश डॉ.कांबळे आपल्या कार्यातून देत असतात. त्यामुळे डॉ.हर्षदीप कांबळे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, असेच म्हणावे लागेल.

त्यांच्या अनेक कार्यक्रमापैकी एक असलेल्या ह्या ‘भीमांजली’च्या कार्यक्रमात आपण सहकुटुंब, सकाळी ६ वाजता, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई, येथे यावे ही विनंती. जय भीम!